Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 October 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ ऑक्टोबर २०२० सायंकाळी ६.००
****
**
केंद्रीय अन्वेषण विभागाला राज्यातल्या चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार-
गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
**
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे चार रुग्णांचा मृत्यू
**
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्याशिवाय सरसकट मदत करण्याची पंकजा मुंडे यांची मागणी
आणि
**
धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचं आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जय मल्हार सेनेतर्फे मानवी
साखळी
****
केंद्रीय
अन्वेषण विभागाला यापुढे राज्य सरकारच्या परवानगीशिवाय राज्यात चौकशी करता येणार नसून
राज्याच्या गृहविभागानं तसे निर्देश जारी केले असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री
अनिल देशमुख यांनी दिली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग ही अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं
काम करणारी महत्वाची संस्था असली तरी या संस्थेचा उपयोग राजकीय हितासाठी होत असल्याची
शंका असल्यामुळे राज्य सरकारनं हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस जो तपास करत होते, त्याचा तपास
केंद्रीय अन्वेषण विभागानं स्वतःकडे घेतला होता. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा लौकिक
सर्वांना माहिती असून याप्रकरणात त्यांना बदनाम करण्यात आल्याची टीका त्यांनी यावेळी
केली. केंद्रीय अन्वेषण विभागाला आता अशा प्रकारे हस्तक्षेप करता येणार नसल्याचं ते
म्हणाले. याआधी केंद्रीय अन्वेषण विभागाला राज्यात येऊन चौकशी करण्याचे सर्वसाधारण
अधिकार देण्यात आले होते मात्र, हे अधिकार आता या आदेशाद्वारे काढून घेण्यात आले असल्याचं
गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी नमुद केलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे चार रुग्णांचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता एक हजार ४७
झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ३७ हजार दोन झाली असून एक हजार ६६ रुग्णांवर
उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
****
आता
ऐकूया कोरोना विषाणू संसर्ग जनजागृतीबाबत नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी
आंबुलगेकर यांनी केलेलं आवाहन
****
गेल्या
१६ एप्रील रोजी पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले इथं झालेल्या साधूंच्या तिहेरी हत्याकांड
प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागानं आज २४ आरोपींना डहाणुच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात
हजर केलं असता त्यांना चौदा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या तिहेरी हत्याकांड
प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या १८० असून आतापर्यंत २८ आरोपींना जामीन
मिळाला आहे तर ७० आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
****
सरकारनं
पावसामुळंल नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसकट मदत करावी, अशी मागणी
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज केली आहे. त्या आज बीड जिल्ह्यात
पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत
होत्या. आपण ज्या भागात दौरा केलाय, त्या भागात अद्याप सरकारमधले मंत्री तसंच प्रशासनतलही
कोणी पोहोचलेलं नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांची येणारी दिवाळी गोड
करा अन्यथा पंचनाम्याची होळी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मुंडें यांनी यावेळी
राज्य सरकारला दिला. गेवराई तालुक्यात आगर नांदूर, नागझरी, धोंडराई तर बीड तालुक्यातल्या
हिरापूर गावात झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची मुंडे यांनी यावेळी पाहणी केली. आमदार
लक्ष्मण पवार तसंच पक्षाचे पदाधिकारी यावेळी त्यांच्या सोबत होते. औरंगाबाद जिल्ह्यात
पैठण तालुक्यातल्या पाचोड -दरेगाव इथल्या अतिवृष्टीनं
नुकसान झालेल्या पिकांचीही मुंडे यांनी पाहणी केली. त्यांनी यावेळी महिला शेतकऱ्यांशी
संवाद साधला. आगामी पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या अनुशंगानं औरंगाबाद शहरातल्या भारतीय
जनता पक्षाच्या मराठवाडा पदवीधर संपर्क कार्यालयालाही मुंडे यांनी आज भेट देऊन निवडणुकीसंबंधी
आढावा घेतला.
****
लातूर
जिल्ह्यातल्या औसा मतदारसंघात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची आमदार अभिमन्यू पवार
यांनी आज पाहणी केली. औसा तालुक्यातील उंबडगा आलमला हा पूल पुरानं वाहून गेल्यानं तातडीनं
या पुलाची दुरुस्ती करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या. महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना शेतरस्ते आणि पशुपालकांना गोठे देण्यात
येणार असल्याची माहिती आमदार पवार यांनी यावेळी दिली.
****
परतीच्या
पावसानं शेतातल्या उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून संपूर्ण मराठवाड्यात
ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे विभागीय उपाध्यक्ष केशव मुद्देवाड
यांनी केली आहे. त्यांनी आज परभणी इथं पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. मराठवाड्यातल्या
अनेक भागात अजुनही नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरु झालेले नाहीत तसंच हे पंचनामे
करुन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची तत्काळ मदत करावी असंही मुद्देवाड यावेळी
म्हणाले.
****
धनगर
समाजाला अनुसूचीत जमातीचं आरक्षण द्यावं, यामागणीसाठी जय मल्हार सेनेतर्फे आज मानवी
साखळी आंदोलन करण्यात आलं. फलोत्पादन आणि रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांच्या
औरंगाबादमधील निवासस्थानापासून केंद्रीय ग्राहक संरक्षण तथा अन्न पुरवठा राज्यमंत्री
रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन इथल्या निवासस्थानापर्यंत या आंदोलनामधे मानवीसाखळी
तयार करण्यात आल्याचं संघटनेचे सरसेनापती लहु शेवाळे यांनी सांगितलं. आंदोलकांकडे यावेळी
आरक्षण मागणीचे फलक होते.
****
जालना
जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या वाटूर इथल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या
शाखेची भिंत फोडून चोरट्यांनी सहा लाख ६२ हजार रोख रक्कम असलेली तिजोरी चोरली. बँकेतले
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर, प्रिंटर, संगणक, पंखे आदी साहित्यही चोरंट्यांनी
चोरून नेलं आहे. आज सकाळी ही चोरी उघडकीस आली असून या प्रकरणी बँक व्यवस्थापक शिवाजी
सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
धुळे
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे नवे २४ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातल्या शिरपूर
आणि धुळे तालुक्यात आज नवा रुग्ण आढळलेला नाही. आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या
१३ हजार १७७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यातल्या दहा रुग्णांना उपचार घेऊन बरे झाल्यानंतर
आज घरी सोडण्यात आलं असून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १२ हजार ४७२ झाली आहे.
सध्या ३३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून या संसर्गाचा
एकही रुग्ण मृत्यूमुखी पडलेला नसून मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या ३७१
झाली आहे.
****
जालना
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पथकानं आज अवैध सावकारीबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुशंगानं
तालुक्यातल्या साळेगाव नेर इथल्या गणेश सीताराम चव्हाण यांच्या घरावर छापा टाकला. जमीन
खरेदी, व्याज व्यवहार संबंधित आक्षेपार्ह कागदपत्रं
यावेळी जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली आहे.
****
No comments:
Post a Comment