Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 October 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ ऑक्टोबर २०२० दुपारी १.०० वा.
****
केंद्रीय
अन्वेषण विभागाला राज्यातल्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी यापुढे राज्य सरकारची परवानगी
घ्यावी लागणार आहे. राज्यातल्या कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण
विभागाला देण्यात आलेली सर्वसाधारण संमती राज्य सरकारनं मागं घेतली आहे. राज्याच्या
गृह विभागानं या संबधींचे आदेश आज जारी केले आहेत.
****
देशात
कोरोना विषाणू संसर्गाचे ६८ लाख ७४ हजार ५१८ रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून रुग्ण बरे
होण्याचं प्रमाण ८९ पूर्णांक २० शतांश टक्के एवढं झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य
मंत्रालयानं दिली आहे. देशात या संसर्गामुळे होत असलेल्या मृत्यूचा दर सातत्यानं कमी
होत असून सध्या तो एक पूर्णांक एकावन्न शतांश टक्के आहे. गेल्या चोवीस तासांमधे ७९
हजारांहून अधिक रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण
वाढत असून नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण कमी होत असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
दिली आहे. एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत केवळ नऊ पूर्णांक २९ शतांश टक्के रुग्ण सध्या
उपचार घेत आहेत. सध्या सात लाख १५ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात गेल्या चोवीस
तासांमधे ५५ हजार ८३८ नवे रुग्ण आढळले असून आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या
सत्त्याहत्तर लाखांहून अधिक आहे. गेल्या चोवीस तासांमधे ७०२ रुग्णांचा या संसर्गामुळे
मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख १६ हजार ६१६ झाली
आहे.
****
देशात
गेल्या चोवीस तासांमधे कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी १४ लाख ६९ हजारांहून अधिक रुग्णांच्या
नमुन्यांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं
दिली आहे. आतापर्यंत नऊ कोटी ८६ लाखांहून अधिक नमुन्यांच्या तपासण्या करण्यात आल्या
असल्याचंही या परिषदेनं म्हटलं आहे.
****
परभणी
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे नवे २२ रुग्ण आज आढळले आहेत. जिल्ह्यातली एकूण रुग्ण
संख्या आता सहा हजार ३३४ झाली आहे. यापैकी पाच हजार ८२७ रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन
बरे झाले असून २५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या परभणी जिल्ह्यात २५० रुग्णांवर
उपचार सुरु असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
माजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्यासाठी एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात येत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
प्रवीण दरेकर यांनी केली आहे. त्यांनी आज सातारा इथं अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची
पाहणी केली. ते त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. दरेकर यांनी त्या आधी खासदार उदयनराजे
भोसले यांची सातारा इथल्या जलमंदिर महाल इथं भेट घेऊन चर्चा केली.
****
मुंबई
पोलिसांनी अभिनेत्री कंगना रानौत आणि तिची बहीन रंगोली चंदेल यांना नोटीस बजावून येत्या
२६ आणि २७ तारखेला वांद्रे पोलिंसांसमोर हजर रहायला सांगितलं आहे. पोलिसांनी न्यायालयाच्या
निर्देशांनुसार त्यांना ही नोटीस बजावली आहे. सामाजिक संपर्क माध्यामांवरुन समाजात
जातीय तेढ निर्माण करण्याच्या कारणावरून वांद्रे न्याय दंडाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात
या दोघींविरुद्घ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या दोघी हिंदू आणि मुस्लीम कलावंतांमधे
फूट निर्माण करत असल्याचा आरोप करत चित्रपट सृष्टीतले एक दिग्दर्शक मुनव्वर अली यांनी
न्यायालयात दाद मागितली होती.
****
बीड
जिल्ह्यात भगवानगडावर दरवर्षी साजरा होणारा दसरा मेळावा या वर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या
पार्श्र्वभूमीवर सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे आपापल्या घरी राहून साजरा करावा असं
आवाहन संयोजक, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
****
लाचलुचपत
प्रतिबंधक विभागानं औरंगाबाद इथल्या सिटी चौक पोलीस ठाण्यातला फौजदार संतोष पाटे याला
पन्नास हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये
सहआरोपी न करण्यासाठी तसंच अटक न करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. त्यावरून
दाखल तक्रारीनुसार फौजदाराला अटक करण्यात आलं असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं
कळवलं आहे.
****
यंदा
उस गाळपासाठी सांगली जिल्ह्यातल्या पंधरा साखर कारखान्यांनी परवाने घेतले आहेत. गाळपासाठी
एक लाख एक हजार ९४५ हेक्टर उसाची नोंद झाली असल्यामुळे यंदा उसाचं गाळप आणि साखर उत्पादन
वाढेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातले ऊस उत्पादक शेतकरी दुष्काळ,
महापूर आणि अतिवृष्टी अशा तिहेरी संकटात असल्यानं साखरेचं उत्पादन १७ लाख टनांनं घटलं
होतं.
****
No comments:
Post a Comment