Thursday, 19 November 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.11.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१९ नोव्हेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

गेल्या चोवीस तासांत देशात कोरोना विषाणू बाधित ४५ हजार ५७६ नवे रुग्ण आढळले तर ५८५ जण मरण पावले. आतापर्यंत या आजारामुळे देशात एकोणनव्वद लाख ५८हजार चारशे चौऱ्यांशी रुग्ण बाधित झालेले असून सध्या सक्रीय रुग्ण संख्या चार लाख त्रेचाळीस हजार तीनशे तीन असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

****

जम्मू काश्मीरमधल्या नगरोटा भागातल्या बान टोल नाक्याजवळ सुरक्षा दलाचे सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये आज पहाटे झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. या भागात कडक बंदोबस्तात वाहनांची तपासणी केली जात असतांना ट्रकमध्ये हे दहशतवादी आढळले, ते पळून जात असतांना ही चकमक झाल्याचं गुप्तचर विभागानं सांगितलं.

****

वस्तू आणि सेवा गुप्तवार्ता प्राधिकरणाच्या नागपूर विभागीय अधिकाऱ्यांनी आंतरराज्यीय बनावट इनव्हॉईस अवैध व्यवहाराच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या मध्ये कर्नाटकातल्या दोन तर महाराष्ट्रातल्या एकाचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून २६ कोटी ९ लाख रुपयांचे इनपुट टॅक्स असलेले, १३१ कोटी रुपयांचे आंतरराज्यीय बनावट इनव्हॉईस हस्तगत करण्यात आले आहेत.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या भेंडा इथले लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचं काल निधन झालं. ज्ञानेश्वरी सहकारी साखर कारखान्यात काम करत असतांना गेल्या १२ नोव्हेंबरला गरम पाणी अंगावर पडल्यानं घुले गंभीर जखमी झाले होते, औरंगाबाद इथं खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

****

नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातलं नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य उद्या शुक्रवारपासून पर्यटकांसाठी खुलं होणार आहे. हिवाळ्यात विदेशातले पाहुणे पक्षी या अभयारण्यात येत असतात. ते पाहण्यासाठी पक्षीप्रेमी पर्यटकांची गर्दी होते. यंदा मात्र कोविडसंदर्भात शासनाने घालून दिलेल्या अटी आणि आरोग्य नियमांचे पर्यटकांना पालन करावं लागणार आहे.

****

अरबी समुद्राच्या दक्षिण-पश्चिम आणि पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्यामुळे, कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी आज आणि उद्या मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, नाशिक शहरासह जिल्ह्याच्या काही भागात आज सकाळी पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...