Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 November 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० नोव्हेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
देशात कोविड बाधितांचं या
संसर्गातून मुक्त होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यांवर पोहोचलं आहे. सध्या देशात या संसर्गानं
बाधित झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९० लाख ४ हजार ३६६ वर पोहचली आहे. यापैकी ८४
लाख २८ हजार ४१० रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून मुक्त झाले आहेत. सध्या देशात ४ लाख
४३ हजार ७९४ सक्रीय रुग्ण असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांमधून उपचार सुरू आहेत.
देशभरात काल ५८४ रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला, त्यामुळे या संसर्गानं झालेल्या
मृत्यूंची एकूण संख्या आता १ लाख ३२ हजार १६२ झाली आहेत.
दरम्यान, १९ नोव्हेंबरपर्यंत
देशात १२ कोटी ९५ लाख ९१ हजार ७८६ नमुन्यांची कोविड तपासणी करण्यात आली आहे. यापैकी
१० लाख ८३ हजार ३९७ नमुने काल तपासण्यात आले. सणासुदीच्या काळात लोकं मोठ्या प्रमाणावर
घराबाहेर पडल्यानं कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण देशात पुन्हा काहीसं वाढल्याचं दिसून
आलं आहे.
****
‘वंदे भारत मोहिमे’च्या आठव्या
टप्यात ७६३ विमान उड्डाणांच्या मदतीनं २४ देशातून एक लाख ४० हजार भारतीय मायदेशी परतले
आहेत. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ३० लाखाहून अधिक भारतीय मायदेशी आले असल्याची माहिती
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली.
****
मुंबईत गेल्या २४ तासांत
९२४ नवीन कोरोना विषाणूबाधित रुग्णांची नोंद झाली असून १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत रुग्णांची संख्या २ लाख ७२ हजार ४४९ झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात एकूण
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२ हजार ८४ झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील ४० हजार २४०
कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण १ हजार १२८ जणांचा
मृत्यू झाले असून, सध्या ७१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
शिक्षकांना शाळांवर रुजू
होण्यापूर्वी कोरोना विषाणू विषयक आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याची सक्ती रत्नागिरी
जिल्हा प्रशासनानं मागे घेतली आहे. येत्या सोमवारपासून शाळांमध्ये नववी ते बारावीपर्यंतचे
वर्ग सुरू करण्यात येणार असून, शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी
आरटीपीसीआर चाचणी करून घेणं, बंधनकारक करण्यात आलं होती. रत्नागिरी जिल्ह्यात या शिक्षकांची
संख्या पाच हजार ८९० असून, दररोज आरटीपीसीआरच्या २०० नमुन्यांचीच तपासणी करण्याची सुविधा
आहे. सर्व शिक्षकांची चाचणी करायची झाली, तर एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. हे लक्षात
घेऊन शिक्षकांनी अँटिजेन चाचणी करून घ्यावी, असं रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी
निशादेवी वाघमोडे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.
****
येत्या २३ तारखेपासून ९ वी
ते १२ वीच्या शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथं महापालिकेच्या शाळेत
थर्मल गन, ऑक्सीमीटर, सॅनिटायझर, मुलांना हात धुण्यासाठी साबण आदी साहित्य उपलब्ध करून
देण्यात आल्या आहेत. शाळेतील कर्मचाऱ्यांकडून सर्व शालेय परिसर, वर्गखोल्या तसंच कार्यालयाचं
निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे. दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिकेनं शिक्षकांच्या चाचणीसाठी
१६ केंद्रं उभारली आहेत. काल एक हजार ४४ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर
चाचणी केली आहे.
****
विधान परिषदेवर राज्यपाल
नियुक्त सदस्य म्हणून आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारने शिफारस केलेल्या काही
नावांवर आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. वरिष्ठ सभागृहाला
वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा मिळावा, सामाजिक सेवा,
विज्ञान, कला, साहित्य, आदी क्षेत्रांतलं विशेष ज्ञान तसंच अनुभव असलेल्या व्यक्तींची
राज्यपालांमार्फत नियुक्ती करण्याची तरतूद घटनेत आहे. मात्र, या तरतुदीला बगल देत राजकीय
पार्श्वभूमी असलेले एकनाथ खडसे, राजू शेट्टी, रजनी पाटील, सचिन सावंत आदींच्या नावांची
शिफारस मुख्यमंत्र्यांनी केली, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे. यावर येत्या २४ नोव्हेंबरला
सुनावणी होणार आहे. सदर व्यक्तींना याचिकेत प्रतिवादी करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांना
देण्यात आली आहे.
****
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत
मतदानासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात ७४ मतदान केंद्र उभारण्यात येत आहेत, येत्या एक डिसेंबरला
होणाऱ्या मतदान प्रक्रियेत या ७४ केंद्रांवर ३३ हजार ६३२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
या सर्व मतदान केंद्रावर नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांसाठी
आणि मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी
तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्थानिक प्रशासनाला दिले
आहेत.
****
No comments:
Post a Comment