Tuesday, 11 May 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 May 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 May 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ मे २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची हिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** मराठा आरक्षणाचा कायदा सक्षम असता, तर तो सर्वोच्च न्यायालयात का टिकला नाही - मुख्यमंत्र्यांचा सवाल; राष्ट्रपती आणि केंद्राने आरक्षण देण्याच्या मागणीचं पत्र राज्यपालांना सादर

** राज्यात १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या कोविड लसीकरणाचा वेग मंदावण्याची शक्यता

** जालना जिल्ह्यात आज १० तर औरंगाबाद जिल्ह्यात आज २३ कोविडग्रस्तांचा मृत्यू

आणि

** लातूर जिल्ह्यात उदगीर इथं कोविड चाचणीसाठी स्वतंत्र आरटीपीसीआर प्रयोगशाळा मंजूर

****

मराठा आरक्षणाचा कायदा सक्षम असता, तर तो सर्वोच्च न्यायालयात का टिकला नाही, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आधाडीच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राष्ट्रपती तसंच केंद्र सरकारने मराठा आरक्षण द्यावं, अशा मागणीचं पत्र दिलं. त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. यासंदर्भात पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मराठा समाजाला न्याय्य हक्क मिळावा, हीच आपली भूमिका असल्याचं, मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केलं.

****

राज्यात १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या कोविड लसीकरणाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. या वयोगटासाठी खरेदी केलेल्या तसंच केंद्राकडून मिळालेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या मात्रा, ४५ वर्षांवरील वयोगटासाठी वापरणार असल्याचं, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यात ४५ वर्षावरील वयोगटातले सुमारे पाच लाखावर नागरिक कोविड लसीच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत आहेत. चार ते सहा आठवड्यात दुसरी मात्रा देणं आवश्यक असल्यानं, या गटाच्या दुसऱ्या मात्रेला प्राधान्य देत असल्याचं, टोपे यांनी सांगितलं. राज्यात टाळेबंदीत वाढ करण्यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना, टोपे यांनी, या बाबत उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं. राज्यातल्या कोविड प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर ११ जिल्ह्यांमध्ये ५ ते १० दिवसांची टाळेबंदी सध्या लावण्यात आलेली आहे.

****

केंद्र सरकारने आतापर्यंत राज्यांना कोविड लसींच्या सुमारे १८ कोटीहून अधिक मात्रा मोफत पुरवल्या आहेत. यापैकी, वापरण्यात आलेल्या आणि वाया गेलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ९ लाख ७१ हजार ४२९ एवढी आहे. राज्य सरकारांकडे अद्याप ९० लाखाहून अधिक मात्रा शिल्लक असल्याचं, केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं. याशिवाय पुढच्या तीन दिवसांत राज्यांना कोविड लसीच्या ७ लाख २९ हजारावर मात्रा दिल्या जाणार असल्याचं, या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जगातल्या विविध देशांकडून भारताला मदतीचा ओघ सुरू  आहे. या मदतीचं विविध राज्यांना तात्काळ वितरण आणि पुरवठा होण्यासाठी केंद्र सरकार  सतत प्रयत्नशील आहे. आतापर्यंत विविध देशांकडून एकूण आठ हजार नऊशे ऑक्‍सीजन कान्‍सन्‍ट्रेटर, पाच हजाराहून अधिक ऑसीजन सिलेंडर्स, १८ ऑक्सीजन उत्पादन संयंत्र, पाच हजार ६९८ व्हेंटीलेटर्स तीन लाख चाळीस हजाराहून अधिक रेमडेसीवीरचा पुरवठा विविध राज्यांना करण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.   

****

केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना विषाणू संबंधीची सर्व ताजी माहिती नागरिकांना उपलब्ध होईल अशी यंत्रणा तयार करावी, असे निर्देश राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं दिले आहेत. रुग्णालयातल्या खाटांची उपलब्धता, लसींची, प्राणवायूची, औषधांची उपलब्धता यांची सविस्तर माहिती या यंत्रणेद्वारे नागरिकांना मिळू शकेल, अशी सक्षम यंत्रणा तयार करावी. २४ तास ही यंत्रणा कार्यरत राहील याकडेही लक्ष द्यावं.

****

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आज साजरा होत आहे. १९९८ च्या पोखरण परीक्षणाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या दिनानिमित्त सर्व अभियंते, शास्त्रद्ध तसंच तंत्रज्ञांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस आपल्या शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञानात साधलेली प्रगती आणि मिळवलेल्या यशाचं स्मरण करून देत असल्याचं, जावडेकर यांनी ट्विटरवरच्या आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

****

राज्याचे माजी गृहमंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसूली संचालनालयानं प्राथमिक माहिती अहवाल एफआयआर दाखल केला आहे. देशमुख यांनी काळा पैसा वैध केल्याप्रकरणी, केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयने केलेल्या चौकशीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. देशमुख यांचे काही बनावट कंपन्यांशी संबंध असल्याचं, या चौकशीत समोर आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात १० कोविड बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता ८८३ झाली आहे. दरम्यान, आज ३९४ नवीन कोविडबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ५३ हजार ८२६ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या ९०४ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ४६ हजार ७२५ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ६२१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज २३ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या १४, अहमदनगर आठ आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ७९३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू दर दोन पूर्णांक नऊ दशांश टक्के आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ३३ हजार २४ झाली असून रुग्ण वाढीचा दर हा १३ पूर्णांक २३ टक्के आहे. सध्या जिल्ह्यात सात हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ३१ शतांश टक्के असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. जिल्ह्यात एक लाख २२ हजार ७९१ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी गणित विभागप्रमुख तसंच मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.ज्ञानोबा भाऊराव धायगुडे याचं आज सकाळी पुणे इथं निधन झालं ते ७० वर्ष वयाचे होते.धायगुडे यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. विद्यापीठाच्या गणित विभाग आणि उपयोजित गणित विभागासाठी त्यांनी मोठे योगदान दिलं होतं. धायगुडे यांनी विद्यापीठात अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं होतं.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं कोविड चाचणीसाठी स्वतंत्र आरटीपीसीआर प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. देशमुख यांनी आज जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तसंच अधिकारी यांच्या समवेत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. लातूर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, जिल्ह्यासाठी आणखी १० रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. जिल्ह्याला लोकसंख्येच्या प्रमाणात टप्याटप्याने कोविड लस उपलब्ध होईल, असंही देशमुख यांनी सांगितलं. गावनिहाय लसीकरण मोहिम राबवावी, ग्रामीण तसंच प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यक्षेत्रातीलच नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य दयावं, आरोग्य केंद्रावर कोविड आजारावरील उपचार व्यवस्था करावी, ग्रामीण भागातही टाळेबंदीची योग्य अंमलबजावणी व्हावी, आदी सूचनाही देशमुख यांनी केल्या.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातला प्राणवायू प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वीत व्हावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी प्रतिकात्मक मात्र निषेधात्मक उद्धाटन केलं. मार्च महिन्यात या रुग्णालयात प्राणवायूचा पुरवठा अनियमीत झाल्यामुळे चार रुग्णांना प्राण गमवावे लागले होते, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून मृतांच्या नातेवाईकांना न्याय दयावा अशी मागणी केनेकर यांनी यावेळी केली. येत्या आठ दिवसांच्या आत शासनानं हे प्राणवायू प्रकल्प उभारले नाही तर भारतीय जनता पक्ष लोकशाही मार्गानं, कोरोनाच्या नियमांचं पालन करून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शहराध्यक्ष केनेकर यांनी यावेळी दिला.

****

परभणी जिल्ह्याला मागील वर्षी नऊ हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्यांचा पुरवठा होऊन देखील मोठ्या प्रमाणात बियाणे कमी पडलं, या पार्श्वभूमीवर यंदा शासनाकडे महाबीजच्या माध्यमातून १५ हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्यांची मागणी नोंदवली असल्याचं, मदार डॉ. राहुल पाटील यांनी सांगितलं आहे. पाटील यांनी नुकतीच महाबीजच्या मुख्य कार्यालयाला भेट देऊन बियाण्यांच्या पुरवठ्यासंदर्भात आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी वाढीव बियाण्यांची मागणी केली.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये एक एप्रिलपासून ते आजपर्यंत कोविड निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टाळेबंदीदरम्यान दुकाने उघडी ठेवणाऱ्या २३४ दुकानदारांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विनामास्क फिरणाऱ्या चार हजार ४३६ नागरिकांना चार लाख १२ हजार ७५० रुपये तर संचारबंदीचं उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्या १० हजार ६४३ वाहनधारकांना मोटर वाहन कायद्यानुसार २३ लाख ६७ हजार ३५० रूपये दंड ठोठावण्यात आला आहे.

//*************//

 

 

  

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...