Thursday, 13 May 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 May 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 May 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ मे २०२१ सायंकाळी ६.१०

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची हिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

** कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक निर्बंधांना एक जूनपर्यंत मुदतवाढ

** देशात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणाअंतर्गत सतरा कोटी ७२ लाखांहून अधिक मात्रांचं वितरण

** कोरोना विषाणू संसर्गामुळे औरंगाबादमध्ये २८ तर जालन्यामध्ये अकरा रुग्णांचा मृत्यू

आणि

** शेळी आणि मेंढीच्या सुधारित खरेदी दराला मान्यता

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू निर्बंध येत्या एक जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. संसर्ग साखळी तोडण्याच्या मोहिमेअंतर्गत परवा- शनिवारपर्यंत लागू असलेले हे निर्बंध वाढवण्यात आल्याचे आदेश आज राज्य सरकारनं जारी केले. बाहेरुन राज्यात येणाऱ्यांना `आरटीपीसीआर` चाचणी यामध्ये बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून काहीशी कमी होत असली तरी धोका कायम असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे. परराज्यातून माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये आता दोन जणांना प्रवास मुभा असेल आणि त्यांच्यासाठीही चाचणी अहवाल गरजेचा असेल. इतर निर्बंध पूर्वीप्रमाणेच लागू असतील. किराणा तसंच फळे, भाजीपाला, मांस, मासे त्या बरोबरच खाद्य पदार्थ, कृषी विषयक दुकानं आदींसह येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकानं सकाळी सात ते अकरा वाजेदरम्यान सुरू ठेवता येणार आहेत. निर्बंध वाढवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाकडे हक्क देण्यात आले असून यासाठी ४८ तास आधी सूचना द्यावी, असं सरकारनं म्हटलं आहे.

****

देशभरात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाअंतर्गत सतरा कोटी ७२ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. सध्या लसीकरणाचा देशव्यापी तिसरा टप्पा सुरू आहे. एकूण सतरा कोटी ७२ लाख १४ हजार २५६ मात्रा देण्यात आल्याचं हिंदुस्थान समाचार वृत्त वाहिनीनं म्हटलं आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं ४५ वर्षे वयोगटावरच्या सर्व नागरिकांना लसीकरण करण्यासाठी जलद आणि मोठ्या प्रमाणात लस पुरवठा उपलब्ध करावा या मागणीचं पत्र उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पाठवलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी १० लाख १३ हजार ८६२ एवढ्या लसीची आवश्यकता असल्याचं त्यांनी या पत्रात नमुद केलं आहे.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज २८ कोविड बाधित रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या १५, अहमदनगर आठ, जालना दोन, बीड, नाशिक आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ८३८ रुग्ण या संसर्गानं दगावले आहेत. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ३४ हजार ४८३ झाली आहे. जिल्ह्यात आतपर्यंत पाच लाख १२ हजार ६११ जणांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.

****

जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे अकरा रुग्णांचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यात या संसर्गानं मृत्यू झालेल्यांची संख्या आता ९०७ झाली आहे. जिल्ह्यात आज ५९१ नवे रुग्ण आढळले असून जिल्ह्यातली या रुग्णांची संख्या ५४ हजार ६६० झाली आहे.  आज ३०४ रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून सध्या पाच हजार ८७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

`प्रधानमंत्री किसान सम्मान निधी` योजनेचा आठवा हप्ता उद्या सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी काही शेतकऱ्यांशी दूर दृष्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. हा आठवा हप्ता नऊ कोटी ५० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून यासाठी १९ हजार कोटी रुपये निधीचं वितरण करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये प्रत्येक चार महिन्यानंतर दिले जात असून आतापर्यंत एक लाख १५ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

****

कमी प्रवासी संख्येमुळे दक्षिण मध्य रेल्वेनं दोन रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द केल्याचं जनसंपर्क विभागानं कळवलं आहे. यामध्ये उद्यापासून गंगानगर- नांदेड - गंगानगर, आणि १७ मे पासून मुंबई - अदिलाबाद-मुंबई या गाड्या पुढच्या आदेशांपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

****

`रमजान ईद` उद्या साजरी केली जाणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही ईद जीवनात आनंद, आरोग्य आणि संपन्नता घेऊन येवो अशी प्रार्थना करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास, प्रार्थना आणि परोपकाराला महत्व दिलं आहे. कोरोना विषाणू संसर्गाचं संकट अद्याप टळलेलं नाही. त्यामुळे यावर्षी देखील रमजान ईदचा सण घरी राहून तसंच शासनानं संसर्ग काळानिमित्त दिलेल्या सूचनांचं पालन करून साजरा करण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं आहे.

****

राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजना आणि जिल्हा वार्षिक योजनांमधील सध्याच्या शेळी आणि मेंढीच्या सुधारित खरेदी दराला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याचं पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी म्हटलं आहे. या सुधारीत योजनेमुळे लाभार्थींना पसंतीनुसार पैदासक्षम शेळ्या आणि मेंढ्या खरेदी करता येणार आहे. २०११ नंतर शेळी मेंढी मांसाच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता, तसंच पशुपालकांना चांगल्या प्रकारच्या शेळ्या उपलब्ध करून देण्यासाठी शेळ्या मेंढ्यांच्या किंमतीत वाढ करणं आवश्यक होतं, असं त्यांनी नमुद केलं आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्मितीला यामुळे चालना मिळणार असल्याचंही केदार यांनी सांगितलं.

****

देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना फ्रान्सच्या नागरीकांना मॉडर्ना कंपनीची लस का देण्यात येत आहे, याचा केंद्र सरकारनं खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. जनतेला परवानगी मिळत नाही मग त्यांना विशेष बाब म्हणून परवानगी दिली का, असा प्रश्र्न त्यांनी उपस्थित केला आहे. विदेशी दुतावासातील नागरीकांचे भारतीय नातेवाईक यांनाही ही लस देण्यात येत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. 

****

उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सामाजिक संपर्क सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातला शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाज माध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नसून माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपर्काची जबाबदारी पार पाडणं शक्य आहे. त्यामुळे बाह्य यंत्रणेची गरज नसल्यानं संबंधित निर्णय रद्द करण्यात येणार असल्याचं उपमुख्यंत्र्यांनी नमुद केलं आहे.

****

गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात सावरगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत मोरचूल जंगलात आज सकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांना ठार केलं. पोलिसांच्या `सी-६०` पथकाचे जवान आज सकाळी सात वाजताच्या सुमारास नक्षलविरोधी अभियान राबवत असताना दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. यावेळी उडालेल्या चकमकीनंतर काही नक्षलवादी फरार झाले तर घटनास्थळी दोन पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. या दोन्ही नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याचं पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी म्हटलं आहे.

****

केंद्रीय लोकसेवा आयोग- `युपीएससी`ची २७ जून रोजी होणारी पूर्वपरीक्षा कोविड परिस्थितीमुळे पुढं ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता दहा ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याचं आयोगातर्फे कळवण्यात आलं आहे.

****

परभणी महापालिका क्षेत्रातल्या नऊ केंद्रांवर उद्या पंचेचाळीस वर्षांवरील वयोगटातल्या नागरीकांना कोविशिल्ड लसीची पहिली मात्रा देण्यात येणार आहे. नागरिकांना सकाळी सात ते दहावाजेदरम्यान या ठिकाणी क्रमांक वाटप करण्यात येणार असून सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेदरम्यान प्रत्यक्ष लस देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी दिली आहे.

****

परभणी जिल्ह्यात गोंधळ महर्षी राजारामबापू कदम आंतरराष्ट्रीय कला संच आणि सेवाभावी संस्थेच्या वतीनं लोककलावंतांना किराणा साहित्य, निर्जंतुकीकरण आणि मास्क आदी साहित्याचं वाटप करण्यात आलं.

//*********//

 

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...