Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 May
2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ मे २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत
पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं
आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली
मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन
करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
** कोविड स्थिती आणि लसीकरण मोहिमेचा पंतप्रधानांकडून उच्चस्तरीय बैठकीत आढावा
** हिंगोली
जिल्ह्यात औंढा नागनाथ पोलिस स्थानकावर दगडफेक; आठ पोलिस
जखमी
** औरंगाबाद इथं आज २१
कोविड बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
आणि
** तौक्ते चक्रीवादळ आज रात्री उशीरा महाराष्ट्राच्या
किनारपट्टीला धडकण्याची शक्यता
****
देशातली कोरोनाविषयक स्थिती आणि कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. घरोघरी जाऊन
कोरोनासंबंधीच्या चाचण्या आणि तपासणी कराव्यात, आरोग्य
कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपकरणं हाताळण्याचं प्रशिक्षण द्यावं, ग्रामीण
क्षेत्रातल्या आरोग्यविषयक सुविधा वाढवण्यावर भर द्यावा, अंगणवाडी
कार्यकर्त्यांना अधिक सक्षम करावं, अशा सूचना पंतप्रधानांनी यावेळी केल्या.
****
संरक्षण संशोधन आणि विकास प्रणाली डीआरडीओनं एक प्राणवायू
दक्षता प्रणाली विकसित केली आहे. यामुळे रुग्णाच्या शरीरातील प्राणवायूचं प्रमाण स्थिर ठेवता येऊ शकतं. या प्रणालीद्वारे रुग्णाच्या शरीरात कमी
दबाव आणि इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणालीच्या सहय्याने आपोआप प्राणवायू पोहोचतो, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी उद्या रविवारी
दुपारी १२ वाजता सामाजिक संपर्क माध्यमांवर एका विशेष
कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
राज्याच्या कृती दलातले तज्ञ डॉक्टर्स यावेळी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील वैद्यकीय चिकित्सकांना मार्गदर्शन करणार आहेत.
****
गडकिल्ल्यांचं
संवर्धन करतांना त्यांचं पावित्र्य जपत, ऐतिहासिक आणि पुरातत्व वारशाला कोणताही धक्का
लागू देऊ नये, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज दुर्गप्रेमी संस्थांच्या पदाधिकाऱ्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे
बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या किल्ल्यांच्या खालील परिसरात आवश्यक सुविधा
निर्माण कराव्यात, पर्यटन केंद्र उभारून पर्यटकांना वैभवशाली वारशाची माहिती द्यावी,
अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाचे सनियंत्रण
मुख्यमंत्री सचिवालयातल्या संकल्प कक्षातून व्हावं, असेही निर्देश त्यांनी दिले.
****
काँग्रेसचे
नेते आणि खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांना कृत्रीम
जीवरक्षक यंत्रणा - व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं आहे. सातव यांच्यावर पुण्यात जहांगीर
रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच सातव कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झाले होते. मात्र, त्यांना आता न्यूमोनियाचा संसर्ग झाला असल्याचं, रुग्णालय प्रशासनाकडून
सांगण्यात आलं आहे. दरम्यान, सातव लवकरच बरे होतील, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब
थोरात यांनी म्हटलं आहे. आज जहांगीर रुग्णालयात सातव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची
भेट घेतल्यानंतर थोरात पत्रकारांशी बोलत होते.
****
चंद्रपूर जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे २६ रुग्ण
आढळून आले आहेत. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता
विभागात असलेल्या तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांना या आजाराचा
धोका असतो. मात्र, कोविडमुळे आता या
आजाराचा धोका बळावला आहे. त्यामुळे कोविड मधून बरे झालेल्या रुग्णांनी न चुकता
आरोग्य तपासणी करून घ्यावी, असं आवाहन आरोग्य विभागानं
केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ पोलिस स्थानकावर आज एका
जमावानं केलेल्या दगडफेकीमध्ये आठ पोलिस अधिकारी तसंच कर्मचारी जखमी झाले. एका समाजाला डिवचणारे फोन कॉल आल्यानं याबाबत दोन दिवसांपूर्वी औंढा पोलीस ठाण्यात काही जणांनी तक्रार नोंदवली होती. या बाबत पोलिस प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याचा
आरोप करत दीडशे ते दोनशे जणांच्या जमावाने आज दुपारी बारा वाजेदरम्यान दगडफेक केली.
जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला, त्यानंतर जमाव
पांगल्याचं सूत्रांनी सांगितलं. या प्रकारानंतर शहरात शोधमोहीम सुरु करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात किनवट इथल्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला आता अकरावी आणि बारावी वर्गासाठी श्रेणीवाढ करुन संलग्न कनिष्ठ महाविद्यालयाचा दर्जा
देण्यात आला आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून या आश्रमशाळेमध्ये अकरावीचे वर्ग सुरु करण्यात यावेत
आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून बारावीचे वर्ग सुरु करण्यात
यावेत असं या संदर्भातल्या शासन निर्णयात निर्देशित करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद शासकीय
वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज २१ कोविड बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये
औरंगाबाद १८, जालना, अहमदनगर प्रत्येकी तीन, आणि उस्मानाबाद तसंच बीड जिल्ह्यातल्या
प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, घाटीत आज ५४ नवे रुग्ण दाखल झाले तर २३
रुग्णांना बरे झाल्यानं सुटी देण्यात आली.
****
हिंगोली इथं आज मराठा शिवसैनिक सेनेच्या
वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मराठा आरक्षण
विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे
मारा आंदोलन केलं. मराठा आरक्षण प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात योग्य भूमिका मांडली
नसल्याचा आरोप करत, मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक विनायक भिसे पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी
अचानक केलेल्या या आंदोलनामुळे हिंगोली शहर पोलिसांची धावपळ झाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना
ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात स्थानबध्द केलं आहे.
****
औरंगाबाद मधील संपूर्ण बाजारपेठा उद्या १६
मे पासून सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी देण्याची विनंती जिल्हा
व्यापारी महासंघानं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना केली आहे. याबाबतचं निवेदन आज
त्यांना सादर करण्यात आलं. व्यवसाय बंद असल्याने बँकांचे कर्जहप्ते, दुकान भाडे, कर
भरणा आणि वीज देयकं भरण्यासाठी अडचणी येत आहेत. पावसाळा लवकरच सुरू होणार असल्यानं दुकानांची देखभाल करण्यासाठी
बाजारपेठा उघडण्याची परवानगी देण्यात यावी. कोट्यावधी रुपयांच्या मालाचं नुकसान होण्याची
शक्यता या निवेदनात वर्तवण्यात आली आहे.
****
परभणी
महानगरपालिका क्षेत्रातील ९ केंद्रांवर उद्या, ४५ वर्षांपुढील नागरीकांना
कोविशिल्ड लसीची पहिली आणि दुसरी मात्रा दिली जाणार आहे. नागरिकांनी
लसीकरणाचा लाभ घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावं, असं आवाहन
आयुक्त देविदास पवार यांनी केलं आहे.
****
कोविड विषाणू संसर्गाची
तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता मुख्यमंत्राचे सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर यांनी
वर्तवली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विशेष ऑनलाईन व्याख्यानात
ते आज बोलत होते. जोपर्यंत ७० ते ७५ टक्के लसीकरण होत नाही तो पर्यंत कोविड विषाणू
संसर्गाच्या लाटा येतच राहतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. जोपर्यंत या विषाणू
संसर्गावर रामबाण औषध येत नाही तोपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा अवलंब अत्यावश्यक
असल्याचं म्हैसेकर यांनी नमूद केलं.
****
अरबी समुद्रात निर्माण झालेलं तौक्ते चक्रीवादळ आज रात्री उशीरा किंवा उद्या
महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडकू शकतं अशी शक्यता, राष्ट्रीय आपत्ती
प्रतिसाद दलाचे कमांडंट अनुपम श्रीवास्तव यांनी वर्तवली आहे.
ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. सध्या हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या
किनारपट्टीपासून अडीचशे ते तीनशे किलोमीटर दूर आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तीन पथकं मुंबई आणि गोव्यात तैनात आहेत, याशिवाय गरज भासली तर पुणे इथं १४ पथकं सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान
विभागानं १७ तारखेसाठी मुंबई आणि ठाणे जिल्ह्याकरता पिवळा तर पालघर जिल्ह्याकरता
हिरवा इशारा जारी केला आहे.
****
वाशिम जिल्ह्यात टाळेबंदीच्या काळातही दुकानं सुरु ठेवल्या प्रकरणी वाशिम
शहरातल्या तीन कापड दुकानदारांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात
आजपासून फक्त दूध, भाजीपाला, किराणा दुकानं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे,
मात्र ही दुकानं मागच्या बाजूनं सुरु असलेली आढळल्यावर दुकान
मालकांना ८७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
****
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गैरव्यवहार केल्याप्रकरणी धुळे जिल्ह्यातल्या अंजग
कासविहीर गावच्या सरपंच भिमाबाई भदाणे आणि ग्रामसेविका सारीका परदेशी यांच्याविरुद्ध
आज गुन्हा दाखल करण्यात आला. २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षात ग्रामपंचायतीला
४३९ शौचालयं बांधण्यासाठी ५२ लाख ६८ हजार रुपयांचं अनुदान मिळालं होतं. यापैकी फक्त
२३४ शौचालयं बांधून आणि २०५ शौचालयांची कामं
अपूर्ण ठेवून या दोघींनी एका खाजगी ठेकेदाराच्या
बँक खात्यात या कामाचे पैसे जमा केल्याचं समोर आल्यावर ही कारवाई करण्यात आली
//*************//
No comments:
Post a Comment