Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 May 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ मे २०२१ दुपारी १.०० वा.
****
सध्या सुरू असलेल्या
लसीकरण मोहिमेद्वारे देशभरात आतापर्यंत, १५ कोटी ८९ लाख ३२ हजार ९२१ जणांचं, लसीकरण
करण्यात आलं आहे. काल दिवसभरात १७ लाख आठ हजार ३९० जणांना, लसीची मात्रा देण्यात आली.
यापैकी १८ ते ४४ या वयोगटातल्या, दोन लाख १५ हजारांहून अधिक जणांना लस देण्यात आली
आहे.
दरम्यान, देशात
सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत, महाराष्ट्रानं प्रथम स्थान राखलं आहे.
तथापि, लस उपलब्ध नसल्यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी लसीकरण थांबवण्यात आलं आहे.
****
देशात काल नव्या
तीन लाख ५७ हजार २२९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर तीन हजार ४४९ रुग्णांचा,
उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या, दोन कोटी दोन लाख
८२ हजार ८३३ झाली असून, या संसर्गानं आतापर्यंत, दोन लाख २२ हजार ४०८ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. काल तीन लाख २० हजार २८९ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत, एक कोटी ६६ लाख
१३ लाख २९२ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ३४ लाख ४७ हजार १३३ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
वाढत्या कोविड
संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या अनुदानित संस्थांनी, या महिन्यात प्रस्तावित
सर्व ऑफलाईन परीक्षा स्थगित कराव्या, असं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे.
उच्च शिक्षण सचिव अमित खरे यांनी यासंदर्भात सर्व अनुदानित संस्थांना पत्र लिहिलं आहे.
या संस्थांनी ऑनलाईन परिक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घ्याव्या, ऑफलाईन परिक्षेसंदर्भात
जूनच्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेतला जाईल, असं खरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
माजी केंद्रीय
मंत्री आणि जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचं आज नवी दिल्लीमध्ये अल्पशा
आजारानं निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. जगमोहन यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणूनही
काम केलं होतं. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी दळणवळण, शहर विकास,
पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. भारत सरकारनं त्यांचा
१९७१ मध्ये पद्मश्री, १९७७ मध्ये पद्मभूषण आणि २०१६ मध्ये पद्मविभूषण सन्मान देऊन गौरव
केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
****
कोरोना विषाणू
संसर्गाच्या अनुषंगानं लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या काळात, राज्यात कृषी विभागाच्या
योजनांमध्ये ३० टक्के प्राधान्य महिला लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती,
कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या खरीप हंगामाच्या नियोजनासाठी
आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी,
कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात येत असल्याचं, भुसे यांनी यावेळी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात
आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर पेरणी करता यावी यासाठी पूर्व तयारीची बैठक,
काल जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. शेतकऱ्यांना
वेळेवर पिक कर्ज उपलब्ध करून देणं, सोयाबीन, कापूस आदी पिकांचं दर्जेदार बीयाणे उपलब्ध
करून देणं, आवश्यक त्या निविष्ठाची कमी पडणार नाही याची काळजी घेणं, आदी सूचना पालकमंत्र्यांनी
यावेळी संबंधित अधिकार्यांना दिल्या. पिक विम्याचं वाटप करण्याचे आदेश देऊनही विमा
कंपन्या टाळाटाळ करत असून, नुकसान भरपाई मिळण्यासाठी न्यायालयात खटले दाखल करावेत,
असं चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुचवलं. नांदेड जिल्ह्यातल्या सुमारे दहा लाख ३३
हजार शंभर हेक्टर शेत जमीन क्षेत्रापैकी, येत्या २०२१- २२ च्या खरीप हंगामामध्ये, सुमारे
आठ लाख दोन हजार ७८० हेक्टर क्षेत्र खरीपासाठी प्रस्तावित करण्यात आलं आहे.
****
महाविकास आघाडी
सरकारने आदिवासी कुटुंबांसाठीची खावटी वाटप योजना पुनरूज्जीवित केल्यामुळे, नांदेड
जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार २८४ अर्ज मंजूर झाल्याची माहिती, पालकमंत्री अशोक चव्हाण
यांनी दिली. नांदेड जिल्ह्यामध्ये या योजनेचा सर्वाधिक लाभ आदिवासी बहुल किनवट तालुक्याला
मिळणार असून, आतापर्यंत इथले पाच हजार १२७ अर्जदार, या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.
या योजनेमध्ये मिळणारी रक्कम ही अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे.
****
गेल्या वर्षीच्या
तुलनेत, या वर्षीच्या रब्बी हंगामात सरकारी संस्थांकडून अंदाजे ७० टक्के जास्त गहू
खरेदी करण्यात आला आहे. दोन मे २०२१ पर्यंत जवळपास २९२ लाख मेट्रिक टनांहून जास्त गहू
खरेदी करण्यात आला असून, त्याचा २८ लाखांहून जास्त शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. केंद्र
सरकारच्या “एक राष्ट्र, एक किमान आधारभूत किंमत, एक बँक खाते हस्तांतरण” या अभियानाअंतर्गत,
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता आधारभूत किमतीचे पैसे थेट हस्तांतरित होण्यास सुरुवात
झाली आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या
त्र्यंबकेश्वर इथली वरुथिनी एकादशीला होणारी, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या उटीच्या
वारीची यात्रा, सलग दुसऱ्या वर्षीही रद्द करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment