Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 May 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ मे २०२१ दुपारी १.०० वा.
****
केंद्र सरकारनं
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १७ कोटी ३५ लाखांहून अधिक लसीच्या मात्रा
दिल्या आहेत. राज्यांनी यापैकी १६ कोटी ४४ लाख मात्रांचा उपयोग केला आहे. राज्यांकडे
सध्या ९० लाखांहून अधिक मात्रा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पुढील तीन
दिवसात राज्यांना १० लाखांहून अधिक मात्रा दिल्या जातील, जेणेकरुन लसीकरण मोहिम सुरळीत
सुरु राहील, असं केंद्रानं म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारनं
त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या गर्भवती आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना ३१ मे पर्यंत
कार्यालयात हजर राहण्यातून सूट दिली आहे. वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर
कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं हा निर्णय घेतला. ज्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून
सूट मिळाली, त्यांना घरुन काम करावं लागणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या केंद्र
सरकारी कर्मचाऱ्यांना देखील कार्यालयात हजार राहण्यापासून सूट देण्यात आली आहे.
****
तामिळनाडूचे
मुख्यमंत्री म्हणून आज द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी शपथ
घेतली. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत
मंत्रिमंडळातल्या ३३ सदस्यांनीही यावेळी शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत
द्रमुक पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.
****
भारताला डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण बनवण्याच्या दृष्टीनं
केंद्र सरकारनं २०२१च्या खरीप हंगामाकरता विशेष धोरण आखलं आहे. याअंतर्गत केंद्र सरकारच्या तसंच राज्य सरकारांच्या बीयाणं विषयक यंत्रणांकडे
उपलब्ध असलेल्या, जास्त उत्पादन देणाऱ्या जातीच्या बियाणांचं मोफत वाटप केलं जाणार आहे. यातून देशभरातल्या
सुमारे चार लाख हेक्टरहून अधिक जमिनीवर उत्पादन
घेण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे.
****
महिला आणि बालविकास
विभागाच्या अंतर्गत असलेली सर्व जिल्हास्तरीय कार्यालयं एकाच ठिकाणी आणून, माहिला आणि
बालकांच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ एकाचं छताखाली देण्यासाठी,
महिला आणि बाल विकास भवन उभारण्यात येईल, अशी माहिती राज्याच्या महिला आणि बाल विकास
मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. त्या काल नाशिक इथं बोलत होत्या. नियोजित भवनाच्या
माध्यमातून त्या ठिकाणी ‘स्मॉल मार्ट’ ही संकल्पना राबवून बचतगटाच्या महिलांना आर्थिक
प्रगती साधण्यासाठी मदत होणार असल्याचं त्या म्हणाल्या.
****
बीड जिल्ह्यातल्या
परळी इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ‘सेवाधर्म - सारं काही समष्टीसाठी’ हे अभियान
सुरु केलं आहे. या अभियानांतर्गत कोविडची सौम्य लक्षणं असलेल्या महिलांसाठी शंभर खाटांचं
स्वतंत्र विलगीकरण केंद्र, त्याचबरोबर कोरोनाबाधित असलेल्या परळीतील गरीब आणि गरजू
कुटुंबातल्या सदस्यांच्या विवाह कार्यासाठी दहा हजार रुपयांची मदत, परळीतल्या नागरिकांना
लसिकरण केंद्रपर्यंत ये-जा करण्यासाठी मोफत सिटी बस सेवा, यासारख्या अत्यावश्यक सेवा
देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारया कोरोना योद्ध्यांना
विमा पॉलिसीचं संरक्षणही देण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीराव
धर्माधिकारी यांनी सांगितलं. या अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं
आवाहन धर्माधिकारी यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात
कोविड-19 लसीकरण जनजागृती एलईडी मोबाईल डिजीटल व्हॅनला काल जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर
यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. राज्य शासनाच्या आरोग्य सेवा अंतर्गत जिल्हा
सामान्य रुग्णालय, शहरी आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमानं ही मोहीम राबवण्यात
येत आहे. या मोहिमअंतर्गत नांदेड शहर, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय, तसंच
जिल्ह्यातल्या वेगवेगळया तालुक्यांच्या ठिकाणी चित्ररथाद्वारे कोरोना लसीकरण विषयक
माहिती दिली जाणार आहे.
****
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी काल
दुरदृश्य प्रणालीद्वारे सन २०२१ खरीप
हंगाम पूर्वनियोजन आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शेतीमध्ये आधुनिक
तंत्रज्ञान, सेद्रिंय, जैविक खतांचा वापर, कृषीउद्योग उभारणी, त्यासाठी नियमित वीज आणि कर्ज पुरवठा आणि विकेल ते पिकेल या धोरणानुसार पिकांची लागवड, या प्रमुख गोष्टी आणि त्याच्याशी निगडीत सर्व बाबींचा
समावेश करून पाच वर्षाचा बृहत विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.
****
कमी प्रवासी संखेमुळे मध्य रेल्वेनं काही
रेल्वे गाड्या रद्द, तर काही अंशत: रद्द केल्या आहेत. नांदेड – जम्मू तावी आणि
जम्मू तावी – नांदेड एक्सप्रेस ३० मे पर्यंत, तर नरसापूर – नगरसोल आणि नगरसोल –
नरसापूर गाडी ३१ मे पर्यंत रद्द करण्यात आली असल्याचं मध्य रेल्वेच्या जनसंपर्क
कार्यालयानं कळवलं आहे.
****
जागतिक ऑलिम्पिक
पात्रता फेरीत काल भारताचा कुस्तीगीर सुमित मलिक याने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला
आहे. यामुळे १२५ किलो वजनी गटात खेळणाऱ्या सुमितला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची
संधी आहे. मलिक याचा सामना आता व्हेनेझुएलाच्या जोस डॅनिएल डायझ याच्याबरोबर होणार
आहे. प्रत्येक वजनी गटातील पहिल्या दोन खेळाडूंना २३ जुलैपासून जपानमध्ये होणाऱ्या
ऑलिम्पिक स्पर्धेला जाता येणार आहे.
****
राज्यात जिल्हा रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं, खासगी रुग्णालयं या ठिकाणी, हवेतून प्राणवायू
शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली बसवण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे ३८
प्रकल्प कार्यान्वित झाले असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दिवसाला सुमारे ५३ मेट्रीक टन प्राणवायूची निर्मिती होत
असल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यान्वित झालेल्या ३८ प्रकल्पांमध्ये बीड, हिंगोली, जालना, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकल्पांचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment