Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 May 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ०७ मे २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण
काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या
नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी,
नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं.
नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने
धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित
रहा.
****
·
यंदा मान्सून एक जूनला केरळमध्ये तर दहा जूनपर्यंत कोकणात दाखल होण्याचा हवामान
विभागाचा अंदाज.
·
देशातल्या कोविड स्थितीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा; आरोग्यविषयक पायाभूत सुविधा
वाढवण्यासाठी राज्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याचे निर्देश.
·
राज्यात कोविडचे रुग्ण अधिक असलेल्या भागात पूर्ण आणि कठोर टाळेबंदी करण्याची
मुंबई उच्च न्यायालयाची सूचना.
·
आरोग्य विभागात १६ हजार पदांची तातडीनं भरती करणार.
·
राज्यात ६२ हजार १९४ नविन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १६८ जणांचा मृत्यू
तर सहा हजार ७३८ बाधित.
·
केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासंदर्भात दोन
दिवसात उपसमितीची बैठक.
आणि
·
राज्यातल्या अनधिकृत बांधकामांवर ३० जून पर्यंत कारवाई न करण्याचे मुंबई उच्च
न्यायालयाचे आदेश.
****
यंदा मान्सून एक जूनला केरळमध्ये आणि दहा जूनपर्यंत कोकणात दाखल होईल, असा अंदाज
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव आणि हवामान शास्त्रज्ञ माधवन राजीवन यांनी वर्तवला
आहे. मान्सूनचं कोकणात आगमन झाल्यानंतर पाच ते दहा दिवसात महाराष्ट्राच्या उर्वरित
भागात हजेरी लावेल, असं हवामान विभागानं सांगितलं. यंदा मान्सून समाधानकारक असून, सरासरीच्या
९८ टक्के इतका असेल, असंही विभागानं सांगितलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातल्या कोविड स्थितीचा विस्तृत आढावा घेतला.
एक लाखापेक्षा जास्त सक्रीय रुग्ण असणाऱ्या १२ राज्यांबाबत तसंच कोरोना विषाणू संसर्गाचा
जास्त प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांबाबत त्यांनी माहिती घेतली. आरोग्यविषयक पायाभूत
सुविधा वाढवण्यासाठी राज्यांकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांना या बैठकीत
देण्यात आली. याबाबत राज्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी
यावेळी दिले. लसीकरणाचा वेग कमी होऊ नये यासाठी राज्यांना जागरुक ठेवण्याचीही गरज मोदी
यांनी यावेळी व्यक्त केली.
****
राज्यात ज्या ठिकाणी कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, अशा सर्व ठिकाणी
पूर्ण आणि कठोर टाळेबंदी लावण्याचा विचार करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं
राज्य सरकारला केली आहे. कोविड-19 संबंधित दाखल विविध याचिकांवर काल मुख्य न्यायाधीश
दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाकडे सुनावणी झाली. सांगलीच्या
खासगी रुग्णालयातल्या ऑक्सिजन प्रकल्पाप्रमाणे राज्यातल्या खासगी रुग्णालयांनीही असा
प्रकल्प उभारायला हवा, तसंच कोविड उपाययोजनांबाबत मुंबई महानगरपालिकेचा आदर्श अन्य
महानगरपालिकांनीही घ्यावा, असं खंडपीठानं म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर
या लाटेविरोधात लढण्यासाठी तयार राहण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला
केली आहे. लहान मुलांसाठी ही लाट हानिकारक असेल तर आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज
असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळं राज्यातल्या आरोग्य यंत्रणांवर
ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेवेळी मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होऊ नये,
यासाठी आरोग्य विभागात १६ हजार पदांची भरती तातडीनं करण्यात येणार असल्याची माहिती
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते म्हणाले –
साधारणपणे दोन हजार डॉक्टर्स ‘एम ओ’ ज्याला म्हणू आपण मेडिकल
ऑफिसर आणि दोन हजार ‘स्पेशालिस्ट’ आणि जवळ जवळ बारा हजार ‘क’ आणि ‘ड’ वर्ग म्हणजे टेक्नीशियन्स,
नर्सेस आणि वार्ड बॉईज पासून ते शिपाया पर्यंतचे सर्व ड्रायव्हर आणि सगळे लोक हे सुद्धा
आपण भरण्याचा निर्णय घेत आहोत. अॅडमिनीस्ट्रेशनचे, प्रशासनातले अन्य लोक असतील त्यांच्या
सुद्धा जागा भरण्याच्या संदर्भातील निर्णय झालेला आहे. त्याची संपूर्ण शासन स्तरावरील
कारवाई आम्ही आठवडाभराच्या आत पूर्ण करु, कारण आता फक्त मुख्यमंत्री स्तरावरवरच निर्णय
घ्यायचा आहे. कॅबिनेटला जाण्याची गरज नाही.
नव्या प्राणवायू प्रकल्पांचे प्रस्ताव तपासण्याचं काम कृती दलाला दिलं असल्याचं
सांगतानाच कर्नाटकातल्या बेळ्ळारी प्रकल्पातून महाराष्ट्राला होणारा प्राणवायूचा पुरवठा
पूर्ववत करण्याची मागणीही टोपे यांनी यावेळी केली.
****
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीच्या सर्वाधिक मात्रा
देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातल्या २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही
मात्रा देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही राज्य प्रथम क्रमांकावर असल्याचं आरोग्य
विभागानं म्हटलं आहे. आजपर्यंत लसीकरण मोहिमेत एक कोटी ६७ लाख ८१ हजार ७१९ मात्रा देण्यात
आल्या आहेत. राज्यामध्ये आतापर्यंत एक कोटी ३९ लाख १५ हजार ८८ नागरिकांना लसीची पहिली
मात्रा देण्यात आली आहे तर २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही मात्रा देण्यात आल्या
असल्याचं आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितलं.
****
राज्यात काल ६२ हजार १९४ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या
कोविडबाधितांची एकूण संख्या ४९ लाख ४२ हजार ७३६ झाली आहे. काल ८५३ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ७३ हजार ५१५
झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे. काल ६३ हजार ८४२ रुग्ण या
संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ४२ लाख २७ हजार ९४० रुग्ण, कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८५ पूर्णांक ५४ शतांश टक्के झाला आहे.
सध्या राज्यभरात सहा लाख ३९ हजार ७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल सहा हजार ७३८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर
१६८ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या ३६, बीड २९,
औरंगाबाद २५, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी २४, नांदेड १७, हिंगोली
७ आणि जालना जिल्ह्यातल्या सहा रुग्णांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात एक हजार ४३७ रुग्ण आढळले.लातूर एक हजार १९५, औरंगाबाद जिल्ह्यात
९४६ जालना ९०८, उस्मानाबाद ८१३, नांदेड ६६१, परभणी ६५०, तर हिंगोली जिल्ह्यात १२८ रुग्ण
आढळले.
****
केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत राष्ट्रपतींकडून मराठा आरक्षणाला मान्यता मिळवण्याचा
मार्ग सर्वोच्च न्यायालयानं दाखवला आहे. याबाबत चाचपणी केली जात असून, दोन दिवसात मराठा
आरक्षण उपसमितीची बैठक घेऊन पुढील धोरण ठरवण्यात येईल, असं उपसमितीचे अध्यक्ष अशोक
चव्हाण यांनी काल सांगितलं. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या
निकालाबाबत मराठा समाजाला दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
सप्टेंबर २०२० पर्यंतचे प्रवेश अबाधित राहणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं, मात्र
त्याकाळात प्रक्रिया सुरु झाली आणि शेवटच्या टप्प्यातले प्रवेश जाहीर होणं बाकी होतं,
त्या तरुण तरुणींना कशा पद्धतीने दिलासा देता येईल, याचीही चाचपणी सुरु असल्याचं चव्हाण
यांनी सांगितलं.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा
निर्णय घेतला असल्याचं, याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलं आहे. आर्थिक दुर्बल
घटकांसाठीचं आरक्षण, तसंच अन्य राज्यांनीही आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली
असल्याची बाब प्रामुख्याने न्यायालयात मांडली जाणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज आता मूक नाही, तर ठोक मोर्चा आक्रोश
मोर्चा काढणार असून, टाळेबंदी संपल्यानंतर बीडमध्ये पहिला मोर्चा काढणार असल्याचं,
शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी सांगितलं.
****
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे काल ठिकठिकाणी पडसाद उमटले. हिंगोली
जिल्ह्यातल्या नांदेड - हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावर डोंगरकडा फाटा इथं मराठा
समाजाचं आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आलं. यावेळी
आंदोलकांनी पोलीसांना निवेदन सादर केलं. नांदेड इथं युवक नेते मारुती वाघ मित्र मंडळानं
आसना चौरस्ता इथं ‘चक्काजाम’ आंदोलन केलं. यावेळी आसना पुलाच्या दुतर्फा वाहतूक एक
ते दीड तास खोळंबली होती. लोहा इथंही आंदोलन करण्यात आलं. परभणी जिल्ह्यातल्या मानवत
इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर केंद्र सरकार आणि राज्य
सरकारचा निषेध करणारं आंदोलन झालं.
****
राज्यातल्या अनधिकृत बांधकामांवर ३० जून पर्यंत कारवाई न करण्याचे आदेश मुंबई
उच्च न्यायालयानं विविध महानगरपालिका, नगरपरिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले
आहेत. यापूर्वी ही मुदत सात मे पर्यंत होती. राज्यातला कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव
पाहता तूर्तास कोणालाही बेघर करणं योग्य नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागानं दाखल
केलेल्या गुन्ह्याप्रकरणी देशमुख यांना अटकेपासून हंगामी संरक्षण द्यायला मुंबई उच्च
न्यायालयानं नकार दिला आहे. या विभागानं भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली हा गुन्हा नोंदवला
आहे. तो रद्द करावा यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काल
या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं केंद्रीय अन्वेषण विभागाला आपलं म्हणणं दाखल
करायला सांगितलं आहे. यावेळी हंगामी संरक्षणाचा आदेश द्यायला न्यायालयानं नकार दिला
असून अगदीच तातडी असेल तर त्यासाठी देशमुख सुट्टीकालीन पीठाकडे जाऊ शकतात, असंही न्यायालयानं
म्हटलं आहे.
****
१८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांच्या पहिल्या डोससाठी औरंगाबाद महानगरपालिकेच्या
आरोग्य विभागानं शहरात सहा आरोग्य केंद्रावर सुविधा सुरु केली आहे. लसीकरणासाठी कोविन
वेबपोर्टलवर नोंदणी केल्यानंतर लसीकरण सत्राची निश्चितीचा एसएमएस आलेल्या नागरिकांनीच
लसीकरण केंद्रांवर यायचे आहे. लसीकरणाबाबत काही शंका असल्यास कोरोना हेल्पलाईन क्रमांक
८९ ५६ ३० ६० ०७ वर संपर्क करायचा आहे. तसंच ही नोंदणी रात्री साडे आठ ते दहा वाजेदरम्यान
करण्याचं आवाहन महानगर पालिकेच्या आरोग्य विभागानं केलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून महानगरपालिकेनं
नियोजन केलं आहे. ही तिसरी लाट रोखण्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्वास औरंगाबाद महानगरपालिका
प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी व्यक्त केला आहे. दुरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित
करण्यात आलेल्या बैठकीत ते काल बोलत होते. या बैठकीत कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या
लाटेच्या अनुषंगानं चर्चा झाली. यावेळी माजी महापौर, उपमहापौर, इतर पदाधिकारी आणि नागरिकांशी
पाण्डेय यांनी संवाद साधला.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात पुरेशा प्रमाणात रक्तसाठा उपलब्ध ठेऊन गरजू
रुग्णांना वेळेत रक्त मिळण्याच्या दृष्टीनं रक्तदानासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे
पुढं येण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. काल औरंगाबाद
इथं वाळूज इथल्या उद्योगांतल्या कर्मचाऱ्यांच्यासाठी रक्तदान शिबीराचं उद्घाटन चव्हाण
यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. चव्हाण यांनी स्वत: देखील यावेळी रक्तदान
केलं. हेगडेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढी इथं हे शिबीर पुढील दोन दिवस चालू
राहणार आहे.
****
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई इथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार येणारे दोन
दिवस मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट आणि पावसाची
शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे
केळीच्या बागा मोडून पडल्या आहेत. आंबा, चिकु या फळबागांसह चिंच, हळद, ऊन्हाळी ज्वारी
आदि पिकांच मोठं नुकसान झाले आहे.
****
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजनं आगामी खरीप हंगामासाठी सोयाबीन
बियाण्यांचे दर मागील वर्षीचेच कायम राहतील असं जाहीर केलं आहे. महाबिजच्या या निर्णयाचं
स्वागत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी
केलं आहे. तसंच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला
आहे. हे लक्षात घेऊन खाजगी कंपन्यानी महाबीज प्रमाणे कोणतीही भाववाढ न करता मागील वर्षीच्याच
भावात बियाणं विक्री करावी असं आवाहन देवसरकर यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आगामी खरीप पेरणी हंगाम पूर्व तयारी लक्षात घेऊन कालपासून
सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळात कृषी साहित्य विक्री दुकानं सुरू ठेवण्यात येणार
आहेत. जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन ईटनकर यांनी या संदर्भातले आदेश दिले आहेत. यात बि-बियाणं,
खतं, किटक नाशक, औजारं दुरूस्ती आणि विक्री यांचा समावेश आहे.
****
औरंगाबाद शहराला सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी १ हजार ६८० कोटी
रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचं काम वेळेपूर्वी पूर्ण करण्याची मागणी खासदार इम्तियाज
जलिल यांनी केली आहे. औरंगाबाद इथं काल खासदार जलिल यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र जीवन
प्राधिकरण मंडळाची पाणीपुरवठा बाबत आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
****
नांदेड इथले जुन्या पिढीतले काँग्रेस पक्षाचे नेते मधुकरराव जालनेकर यांचं काल
सकाळी वृध्दापकाळानं निधन झाले. ते ८८ वर्षे वयाचे होते. जालनेकर हे नांदेड नगरपालिकेचे
माजी अध्यक्ष तसंच नांदेड मंर्चट्स को- ऑपरेटीव्ह बँकेचे माजी अध्यक्ष होते.
****
औरंगाबाद शहरात हेल्मेट सक्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं
दिलेल्या आदेशाचा भंग केल्यामुळे वाहतूक शाखेचे पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी लेखी
माफी मागावी असा आदेश खंडपीठानं दिला आहे. कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय
सोयी सुविधांबाबतच्या सुमोटो याचिकेच्या ऑनलाईन सुनावणीवेळी खंडपीठानं हा आदेश दिला.
या याचिकेवर आज विशेष सुनावणी होणार आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या सिडको एन ७ अयोध्यानगर इथं राहत्या घरी गुटख्याचा साठा करणाऱ्या
आई आणि मुलाला काल अटक करण्यात आली. संध्या भांगड आणि सचिन भांगड अशी त्यांची नावं
आहेत. त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या गुटख्याचा चार लाख ३० हजार ८८४ रुपयांचा साठा
करुन ठेवलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचं पोलीसांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment