Wednesday, 12 May 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 12.05.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 May 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.

****

·      लसीकरण मोहिमेत दुसरी मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य देण्याचे केंद्र सरकारचे निर्देश.

·      लसीच्या पुरेशा मात्रा मिळत नसल्यानं राज्यात १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांना कोव्हॅक्सिन लस न देण्याचा निर्णय.

·      मराठा आरक्षणाचा कायदा सक्षम असता, तर तो सर्वोच्च न्यायालयात टिकला असता - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

·      मराठा आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी, उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन.

·      राज्यात ४० हजार ९५६ नवीन कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात १२८ जणांचा मृत्यू तर चार हजार ७१७ बाधित.

·      आगामी ईद - उल - फित्र साजरी करण्यासंदर्भात राज्य सरकारचे दिशानिर्देश जारी.

आणि

·      माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात, सक्तवसूली संचालनालयाचा गुन्हा दाखल.

****

राज्यांनी लसीकरण मोहिमेत दुसरी मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य द्यावं, असे निर्देश केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी दिले आहेत. देशातल्या कोविड परिस्थितीसंबंधी काल राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत झालेल्या बैठकीत गौबा यांनी हे निर्देश दिले. लसीकरणासंबंधी चुकीची माहिती पसरवली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्राणवायुच्या पूर्ततेसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात जनतेला वारंवार माहिती दिली पाहिजे, असं गौबा म्हणाले. राज्यांनी कोविड चाचण्यांवर अधिक भर द्यावा आणि या महामारीला स्थानिक पातळीवर रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यावेळी म्हणाले. लसीच्या दोन्ही मात्रा घेण्यासंदर्भात जनजागृती करावी, असंही त्यांनी सांगितलं.

****

राज्यात १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांना कोविडची कोव्हॅक्सिन लस न देण्याचा निर्णय, राज्य सरकारनं घेतला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. या लसीच्या पुरेशा मात्रा मिळत नसल्यानं, राज्य सरकारनं सध्या खरेदी केलेल्या, तसंच केंद्राकडून मिळालेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या मात्रा, यापुढे फक्त ४५ वर्षांवरील वयोगटाला दुसरी मात्रा देण्यासाठी वापरणार असल्याचं, टोपे यांनी सांगितलं. राज्यात ४५ वर्षांवरील वयोगटातले सुमारे पाच लाखावर नागरिक, या लसीच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना चार ते सहा आठवड्यात दुसरी मात्रा देणं आवश्यक असल्यानं, या गटाच्या दुसऱ्या मात्रेला प्राधान्य देत असल्याचं, टोपे यांनी सांगितलं. राज्यात टाळेबंदीत वाढ करण्यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना, टोपे यांनी, या बाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं. राज्यातल्या कोविड प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर ११ जिल्ह्यांमध्ये, पाच ते १० दिवसांची टाळेबंदी सध्या लावण्यात आलेली आहे.

****

केंद्र सरकारने आतापर्यंत राज्यांना कोविड लसींच्या, सुमारे १८ कोटीहून अधिक मात्रा मोफत पुरवल्या आहेत. यापैकी, वापरण्यात आलेल्या आणि वाया गेलेल्या मात्रांची एकूण संख्या, १७ कोटी नऊ लाख ७१ हजार ४२९ एवढी आहे. राज्य सरकारांकडे अद्याप ९० लाखाहून अधिक मात्रा शिल्लक असल्याचं, केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. याशिवाय पुढच्या तीन दिवसांत राज्यांना कोविड लसीच्या सात लाख २९ हजारावर मात्रा दिल्या जाणार असल्याचं, या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

मराठा आरक्षणाचा कायदा सक्षम असता, तर तो सर्वोच्च न्यायालयात का टिकला नाही, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, राष्ट्रपती तसंच केंद्र सरकारने मराठा आरक्षण द्यावं, अशा मागणीचं पत्र दिलं. त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. यासंदर्भात पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले –

महाराष्ट्राच्या विधीमंडळात एकमताने, एकमुखाने सर्वपक्षाने तो जो काही निर्णय घेतलेला आहे, तो पूर्ण विचार करून निर्णय घेतला आहे. त्या विचाराचा किंबहुना त्या निर्णयाचा केवळ आमचा निर्णय म्हणून नव्हे तर जनतेचा हा निर्णय आहे अन्‌ त्याचा आदर करून या समाजाला त्यांचा न्यायहक्क, आरक्षणाचा जो आहे, तो मिळायला पाहिजे ही आमची भावना आहे. जसं आज आम्ही हे पत्र माननीय राज्यपाल महोदयांना दिलेलं आहे, त्याचप्रमाणे आम्ही लवकरात लवकर माननीय पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेऊनसुध्दा ही विनंती त्यांना करू.

 

मराठा समाजानं नेहमीच समजूतदारपणा दाखवला आहे, आरक्षण प्रश्नी सरकार समाजाच्यासोबत असल्याची, समाजाला कल्पना आहे, त्यामुळे ते सरकारच्या विरोधात नाहीत, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

मराठा आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, समिती स्थापन करण्यात आली आहे. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. अशा प्रकारची समिती स्थापन करण्याचा निर्णय, गेल्या आठ मे रोजी झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची समीक्षा आणि विश्लेषण करून, त्याबाबतचं समग्र मार्गदर्शन करणं, तसंच पुढील दिशा ठरवण्यासाठी ही समिती अहवाल तयार करून, तो ३१ मे पर्यंत शासनाला देणार आहे.

****

राज्यात काल ४० हजार ९५६ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ५१ लाख ७९ हजार ९२९ झाली आहे. काल ७९३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ७७ हजार १९१ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे. काल ७१ हजार ९६६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ४५ लाख ४१ हजार ३९१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८७ पूर्णांक ६७ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात पाच लाख ५८ हजार ९९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल चार हजार ७१७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १२८ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या ३०, बीड २१, परभणी १८, औरंगाबाद १७, नांदेड १४, उस्मानाबाद ११, जालना दहा, तर हिंगोली जिल्ह्यातल्या ७ रुग्णांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार २५८ रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात ७४८, उस्मानाबाद सहाशे शहात्तर, परभणी ६१९, लातूर ५९२, जालना ३९४, नांदेड २९०, तर हिंगोली जिल्ह्यात काल १४० नवे कोविड बाधित आढळले.

****

कोविन-अ‍ॅपमधल्या तांत्रिक अडचणींमुळे लाखो लोकांची गैरसोय होत आहे, त्यामुळे केंद्र सरकारनं लसीकरण अ‍ॅपचं संपूर्ण विकेंद्रीकरण करावं, अशी मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. लसीकरण नोंदणी प्रणाली मर्यादित स्वरूपाची असून, त्यातील त्रुटी या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत, असंही पाटील यांनी नमूद केलं. 

****

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं कोविड चाचणीसाठी स्वतंत्र आरटीपीसीआर प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. देशमुख यांनी काल जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तसंच अधिकारी यांच्या समवेत, दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. लातूर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी, शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, जिल्ह्यासाठी आणखी १० रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. जिल्ह्याला लोकसंख्येच्या प्रमाणात टप्याटप्याने कोविड लस उपलब्ध होईल, असंही त्यांनी सांगितलं.

****

आगामी ईद-उल-फित्र साजरी करण्यासंदर्भात राज्य सरकारनं दिशानिर्देश जारी केले आहेत. मुस्लिम बांधवांनी मशिदींमध्ये गर्दी न करता आपापल्या घरातच नमाज अदा करावी, अशी सूचना राज्य सरकारनं केली आहे. नागरिकांनी टाळेबंदीच्या नियमांचं पालन करावं आणि स्थानिक प्रशासनानं ठरवून दिलेल्या वेळेतच खरेदी करावी, असं या आदेशात म्हटलं आहे. ईदनिमित्त कोणत्याही सामुहिक कार्यक्रमाचं आयोजन होणार नाही, याची काळजी स्थानिक प्रशासनानं घ्यावी, असं गृह विभागानं सांगितलं आहे.

****

राज्याचे माजी गृहमंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात, सक्तवसुली संचालनालयानं गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला केला आहे. देशमुख यांनी काळा पैसा वैध केल्याप्रकरणी, केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं केलेल्या चौकशीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. देशमुख यांचे काही बनावट कंपन्यांशी संबंध असल्याचं, या चौकशीत समोर आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केलेला, मुंबई पोलीस दलातला अधिकारी सचिन वाझे याला, पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. यासंदर्भातला आदेश काल मुंबई पोलीस आयुक्तांनी जारी केला.

****

खासगी मालकीच्या किंवा शासकीय जागेत असलेल्या जागी रमाई घरकुल योजनेचा लाभ देता यावा, याबाबतचं धोरण, गृहनिर्माण विभाग, ग्रामविकास, महसूल विभाग आणि वित्त विभाग यांच्याशी समन्वय साधून तयार करावं, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी, समाज कल्याण आयुक्तांना दिले आहेत. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातल्या झोपडपट्ट्यांना, रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देण्यासंबंधीच्या, आमदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीसंदर्भात झालेल्या ऑनलाईन बैठकीत, मुंडे बोलत होते. यासाठीचा प्रस्ताव आठ दिवसांच्या आत सादर करण्यात यावा, असंही मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ३१ शतांश टक्के असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. जिल्ह्यात एक लाख २२ हजार ७९१ रुग्णांनी, या विषाणू संसर्गावर मात केली आहे.

दरम्यान, औरंगाबाद इथल्या सर्व लसीकरण केंद्रांवर, आज फक्त कोविड लसीची दुसरी मात्रा दिली जाणार आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली.

****

लातूर जिल्ह्यात आज एकूण १२ लसीकरण केंद्रावर, कोविड लसीकरणाचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. यामध्ये १८ ते ४४ वयोगटासाठीच्या चार लसीकरण केंद्रांवर, कोविशील्ड या लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. उपजिल्हा रुग्णालय उदगीर, उपजिल्हा रुग्णालय निलंगा, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर आणि ग्रामीण रुग्णालय औसा इथं, हे लसीकरण होणार आहे. नागरिकांनी कोविन संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे, तर लातूर शहर महानगर पालिकेच्यावतीनं आज शहरातल्या १४ ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यात ८९ केंद्रांवर कोरोना लसीकरण मोहीम सुरु असून, कालपर्यंत सुमारे पावणे चार लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांनी ही माहिती दिली. जिल्ह्याला आतापर्यंत कोविशिल्ड लसीच्या, तीन लाख २३ हजार ७३० आणि कोव्हॅक्सिन लसीच्या ९६ हजार ४४०, अशा एकूण चार लाख २० हजार १७० मात्रा मिळाल्या आहेत. त्यापैकी तीन लाख ७२ हजार ५०२ मात्रा लाभार्थींना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी ईटनकर यांनी दिली.

****

परभणी इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीनं, शहरातल्या अक्षता मंगल कार्यालयात कोविड केअर केंद्रात, कोविडग्रस्तांसाठी सात दिवसीय समुपदेशन आणि योग वर्गास सुरूवात झाली आहे. या उपक्रमाला रुग्णांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वर्गात विविध खेळ, कोडी, हास्य योग, प्रार्थना घेतली जात आहे, यामुळे रुग्णांचं शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम होत आहे.

****

परभणी तालुक्यातल्या प्रत्येक आरोग्य केंद्रास एक रुग्णवाहिका दिली जाईल, आरोग्य विभागानं यासंदर्भात तातडीने प्रस्ताव दाखल करावेत, असे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. झरी इथल्या आरोग्य केंद्रात उभारलेल्या ५० रुग्णखाटांच्या कोविड केंद्राचं लोकार्पण, काल सत्तार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. हे रुग्णालय कोविडबाधितांसाठी निश्चितच दिलासादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये एक एप्रिलपासून कालपर्यंत कोविड निर्देशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी, ३७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टाळेबंदीदरम्यान दुकानं उघडी ठेवणाऱ्या २३४ दुकानदारांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. विनामास्क फिरणाऱ्या चार हजार ४३६ नागरिकांना, चार लाख १२ हजार ७५० रुपये, तर संचारबंदीचं उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्या १० हजार ६४३ वाहनधारकांना, २३ लाख ६७ हजार ३५० रूपये दंड ठोठावण्यात आला.

****

परभणी इथं टाळेबंदीचं उल्लंघन करत दुकानं सुरु ठेवणाऱ्या ११ दुकानांवर कारवाई करत, ३३ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. विना मास्क फिरणाऱ्या २६ नागरिकांना, पाच हजार २०० रुपये दंड ठोठावण्यात आला.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी गणित विभागप्रमुख, तसंच मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीचे अध्यक्ष, डॉ. डी. बी. धायगुडे याचं काल सकाळी पुणे इथं निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. धायगुडे यांच्यावर कोरोना विषाणूचा संसर्गासाठीचे उपचार सुरू होते. विद्यापीठाच्या गणित विभाग आणि उपयोजित गणित विभागासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं होतं. धायगुडे यांनी विद्यापीठात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं.

****

परभणी जिल्ह्याला मागील वर्षी नऊ हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्यांचा पुरवठा होऊन देखील, मोठ्या प्रमाणात बियाणे कमी पडलं, या पार्श्वभूमीवर यंदा शासनाकडे महाबीजच्या माध्यमातून, १५ हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्यांची मागणी नोंदवली असल्याचं, आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सांगितलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...