आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१२ मे २०२१ सकाळी ११.००
वाजता
****
महाराष्ट्रातल्या ऑक्सिजन मॉडेलची राष्ट्रीय स्तरावर प्रशंसा होत आहे. एप्रिल महिन्यापासून
राज्यात राबवण्यात येणाऱ्या ऑक्सिजन मॉडेलमुळे राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासत नसल्याचं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यांनी लसीकरण मोहिमेत दुसरी मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य द्यावं, असे निर्देश
कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी दिले आहेत. देशातल्या कोविड परिस्थितीसंबंधी काल राज्य
आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत झालेल्या बैठकीत गौबा यांनी हे निर्देश दिले.
कोव्हॅक्सिन लस न देण्याचा निर्णय, राज्य सरकारनं घेतला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री
राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. या लसीच्या पुरेशा मात्रा मिळत नसल्यानं, राज्य सरकारनं
सध्या खरेदी केलेल्या, तसंच केंद्राकडून मिळालेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या मात्रा, यापुढे
फक्त ४५ वर्षांवरील वयोगटाला दुसरी मात्रा देण्यासाठी वापरणार असल्याचं, टोपे यांनी
सांगितलं.
****
आगामी ईद - उल - फित्र साजरी करण्यासंदर्भात राज्य सरकारनं दिशानिर्देश जारी केले
आहेत. मुस्लिम बांधवांनी मशिदींमध्ये गर्दी न करता आपापल्या घरातच नमाज अदा करावी,
अशी सूचना राज्य सरकारनं केली आहे. नागरिकांनी टाळेबंदीच्या नियमांचं पालन करावं आणि
स्थानिक प्रशासनानं ठरवून दिलेल्या वेळेतच खरेदी करावी, असं या आदेशात म्हटलं आहे.
****
शासनाच्या महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना, शेतीशी निगडीत सर्व योजनांचा लाभ एकाच
अर्जाद्वारे मिळण्याच्या दृष्टीने, अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी
एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. तसंच या पोर्टलवर शेतकरी योजना या
शीर्षकाअंतर्गत, “बियाणे” या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून
देण्यात आली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात कोविड बधितांची संख्या कमी होत असली, तरी ती पुन्हा वाढू नये यासाठी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नाशिक जिल्ह्यात आज दुपारपासून २३ मे पर्यंत
कडक टाळेबंदी लागू केली आहे. या काळात नागरिकांना केवळ वैद्यकीय कारण असेल तरच बाहेर
पडता येणार आहे.
****
औरंगाबाद इथल्या सर्व लसीकरण केंद्रांवर, आज फक्त कोविड लसीची दुसरी मात्रा दिली
जाणार आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली.
****
No comments:
Post a Comment