Friday, 14 May 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 14.05.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 May 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १४ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याचा सरकार प्रयत्न करत असून, जैविक शेतीला प्रोत्साहन देणं, याचाच एक भाग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. `प्रधानमंत्री किसान सम्मान निधी` योजनेचा आठवा हप्ता आज पंतप्रधानांनी वितरीत केला, त्यावेळी ते बोलत होते. कोविड महामारीच्या काळात शेतकऱ्यांनी ज्याप्रमाणे उत्तम उत्पादन करुन विक्रम केला, त्याचप्रमाणे सरकार किमान आधारभूत किंमतीवर खरेदीत नवीन विक्रम करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात लस हा एक महत्वाचा टप्पा असून, नागरिकांनी अवश्य लसीकरण करुन घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. हा आठवा हप्ता नऊ कोटी ५० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला असून, यासाठी १९ हजार कोटी रुपये निधीचं वितरण करण्यात आलं.

पंतप्रधानांनी यावेळी लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. लातूरचे शेतकरी बाबा नरारे यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. नरारे यांनी यावेळी बोलताना, आपल्याला केवळ दोन दिवसांत कर्ज मंजूर झालं असून, त्यामुळे सेंद्रीय शेती करता आली, असं सांगितलं.

****

देशात कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट सुरू असताना, त्याविरुद्ध अधिक सक्षमपणे लढण्यासाठी, आता देशात रशियाची स्फुटनिक-व्ही ही लस उपलब्ध झाली आहे. ही लस पुढील आठवड्यात देशातल्या बाजारपेठेत उपलब्ध होईल, अशी घोषणा, नीति आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी केली. स्फुटनिक-व्ही लसीचे दीड लाख डोस भारतात हैदराबाद इथं दाखल झाल्यानंतर १२ दिवसांनी काल ही घोषणा करण्यात आली. रशिया बरोबर यापूर्वी झालेल्या करारानुसार हैदराबाद इथल्या डॉ रेड्डीज लॅब्रोटरीज या संस्थेच्या वतीनं येत्या जुलै मध्ये स्फुटनिक-व्ही या लसीचं देशात उत्पादन सुरू होईल, अशी माहितीही पॉल यांनी दिली. 

****

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्यानं लढायला, स्वाभिमानानं जगायला शिकवलं, असं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, त्यांना अभिवादन केलं आहे.    

****

वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक होण्यासाठी अनिवार्य असलेली राज्य पात्रता परीक्षा - सेट २६ सप्टेंबरला होणार आहे. परीक्षेसाठी १७ मे ते १० जून या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येतील. परीक्षेविषयीची अधिक माहिती सेट एक्झाम डॉट यु एन आय पुणे डॉट एसी डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात आली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण योजना आणि जिल्हा वार्षिक योजनांमधल्या सध्याच्या शेळी आणि मेंढीच्या सुधारित खरेदी दराला, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याचं, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी म्हटलं आहे. या सुधारीत योजनेमुळे लाभार्थींना, पसंतीनुसार पैदासक्षम शेळ्या आणि मेंढ्या खरेदी करता येणार आहे. २०११ नंतर शेळी मेंढी मांसाच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता, तसंच पशुपालकांना चांगल्या प्रकारच्या शेळ्या उपलब्ध करून देण्यासाठी, शेळ्या मेंढ्यांच्या किंमतीत वाढ करणं आवश्यक होतं, असं त्यांनी नमूद केलं आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्मितीला यामुळे चालना मिळणार असल्याचंही, केदार यांनी सांगितलं.

****

आरोग्य विभागानं मान्सून काळातील संभाव्य आजारासंबंधी औषधोपचार आणि उपाययोजना कराव्या, धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण करावं, पाटबंधारे आणि सार्वजनिक विभागानं रस्ते, पुल आणि धरणाच्या दुरूस्तीची कामं हाती घ्यावीत, अशा सूचना, परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते काल बोलत होते. अन्न आणि औषध प्रशासनानं पावसाळ्यात अन्न तपासणी करावी, शाळांच्या इमारतीची पाहणी करुन आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात, अशा सुचनाही यावेळी देण्यात आल्या.

****

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे प्रथम माहिती अहवाल दाखल झालेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना २० मे पर्यंत अटक करण्यात येणार नसल्याची हमी, राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. अकोला इथल्या पोलिस निरीक्षकाने हा आरोप केला असून, त्याविरोधात परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेला उत्तर दाखल करण्यासाठी राज्य सरकारला एका आठवड्याची मुदत द्यावी, तोपर्यंत अटकेसारखी कोणतीही कठोर कारवाई होणार नाही, असं राज्य सरकारच्या वकीलांनी सांगितलं.

****

साडेतीन मुहुर्तापैकी एक अक्षयतृतीया आज साजरी होत आहे. त्यानिमित्त आज पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आकर्षक आणि नयनरम्य आंब्यांची आरास करण्यात आली आहे. भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संकेतस्थळावर दर्शन घेता येईल, असं मंदीर समितीने कळवलं आहे. 

****

राज्यात येत्या १७ तारखेपर्यंत मराठवाड्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...