Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 May 2021
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ मे २०२१ दुपारी १.०० वा.
****
तौक्ते चक्रीवादळाचा
फटका बसलेल्या कोकणाला दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करुन मदत जाहीर केली जाईल, असं आश्वासन,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज रत्नागिरी इथं नुकसानीची
पाहणी केली, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा
घेतल्यानंतर ठरवलं जाईल, असं ते म्हणाले.
****
दरम्यान, तौक्ते
चक्रीवादळामुळे समुद्रात भरकटलेल्या पाच नौकांपैकी पी ३०५ या बार्जवरील २४ कर्मचारी
अद्यापही बेपत्ता असल्याचं नौदलानं सांगितलं आहे. या बार्जवरील १८८ जणांची सुटका करण्यात
आली असून, आतापर्यंत ५१ जणांचे मृतदेह तटरक्षक दलाला सापडले आहेत.
****
गडचिरोली जिल्ह्यात
एटापल्ली तालुक्यातल्या पयडी-कोटमी परिसरातल्या जंगलात झालेल्या चकमकीत १३ नक्षलवादी
ठार झाले. या जंगलात नक्षल्यांचे शिबिर सुरु असल्याच्या माहितीवरुन पोलिसांच्या सी-६०
पथकाचे जवान त्या परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत होते. ठार झालेले नक्षलवादी कसनसूर
दलमचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
कोविड महामारीच्या
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलं आणि नवजात बालकांच्या सुक्षेसाठी
पूर्ण तयारी करावी, असे निर्देश राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग - एनसीपीसीआरनं
राज्यांना दिले आहेत. आयोगाचे प्रमुख प्रियांक कानुनगो यांनी केंद्रीय आरोग्य सचिव
राजेश भूषण यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. राष्ट्रीय आपत्ती परिवहन सेवेला पुनर्गठीत
करण्यावर, तसंच नवजात बालकं आणि लहान मुलांसाठी रुग्णवाहिका आणि इतर सेवा तयार करण्याचे
निर्देश देण्यावर आयोगानं भर दिला आहे.
****
देशात आतापर्यंत
१९ कोटीहून अधिक नागरिकांचं कोविड लसीकरण झालं आहे. काल देशभरात १४ लाख ८२ हजार नागरीकांना
लस टोचण्यात आली. यापैकी १८ ते ४४ वयोगटातल्या सात लाख ३६ हजार जणांचा समावेश आहे.
****
केंद्र सरकारने
म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराचा साथरोगात समावेश केला आहे. महाराष्ट्रासह
देशातील अनेक राज्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव आढळला असून रुग्णांचं प्रमाण दिवसेंदिवस
वाढत आहे. या आजाराला साथीच्या कायद्या अंतर्गत अधिसूचित करून त्यानुसार सर्व प्रकरणांची
नोंद करावी असे निर्देश केंद्रानं दिले आहेत.
****
कोविड प्रतिबंधाच्या
बाबतीत राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने सारखं केंद्राकडे बोट न दाखवता, योग्य ते
प्रयत्न केले पाहिजेत, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
यांनी दिला आहे. ते काल रत्नागिरी इथं वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्रात सर्वात
जास्त जे लसीचे डोस देण्यात आले, ते डोस केंद्रांकडूचन प्राप्त झाले, असं आठवले म्हणाले.
****
राज्यातल्या
ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून वित्तीय
वर्ष २०२१- २२ मधल्या पहिल्या हप्त्यापोटी ८६१ कोटी ४० लाख रुपयांचा अबंधीत निधी प्राप्त
झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून, तत्काळ पंचायत समित्या
आणि ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
यांनी दिली.
****
बीड इथल्या न्यू
होप चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं कोविड काळात अविरत मृतदेहाची ने-आण करणाऱ्या बीड जिल्हा
रुग्णालयातल्या रुग्णवाहीका चालकांचा सन्मान करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके
आणि न्यू होप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष फादर संजय गायकवाड यांच्या हस्ते या कोरोना
योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
****
नांदेड जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकहमी संदर्भात बँकेने राज्य शासनाकडे प्रस्ताव दिला असून,
त्या प्रस्तावानुसार बँकेला रक्कम देण्याचा शासनस्तरावर लवकरच निर्णय घेणार असल्याची
माहिती, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पवार यांच्या अध्यक्षतेखाली
काल मुंबईत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.
शेतीसाठी अल्पमुदतीच्या पतपुरवठा करताना राज्यातल्या मध्यवर्ती सहकारी बँकांना एक टक्का
तूट येत असून, ही तूट राज्य सरकारने भरून काढण्याची मागणी पालकमंत्री चव्हाण यांनी
यावेळी केली.
****
नांदेड शहरातल्या
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरातल्या मिश्र खत उत्पादक कारखान्यांना
काल कृषी तसच महसुल विभागातल्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकानं अचानक भेट दिली. यावेळी
त्यांनी उत्पादित मिश्र खताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यापुढेही वेळोवेळी अशी
अचानक भेट देऊन खतांची गुणवत्ता तपासली जाणार आहे, अशी माहिती प्रसिद्धीस देण्यात आलेल्या
पत्रकात देण्यात आली आहे.
****
नानाजी देशमुख
कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत उस्मानाबाद तालुक्यातल्या तिसऱ्या टप्यात निवडण्यात आलेल्या
अंबेजवळगा गावामध्ये खरीप हंगामाच्या पूर्व तयारीसाठी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचं
आयोजन करण्यात आलं होतं. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सोयाबिन पिकाचं घरगुती बियाणं
उगवण क्षमता तपासणी करुनच वापरावं, अशी सूचना उपविभागीय कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद
यांनी यावेळी दिली.
****
No comments:
Post a Comment