Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 August 2021
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– २० ऑगस्ट २०२१ सकाळी ७.१० मि.
****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे.
तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत
करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण
काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी
नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ
ठेवावा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५
या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी
संपर्क करू शकता.
****
·
सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना
बहाल करण्याची तरतूद असलेल्या विधेयकांला राष्ट्रपतींची मंजुरी.
·
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती अद्यापही चिंताजनक,
सूक्ष्म नियंत्रण क्षेत्र तयार करण्याची गरज - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती
पवार.
·
राज्यात पाच हजार २२५ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात चार जणांचा मृत्यू तर २४३
बाधित.
·
शाळा महाविद्यालयं सुरु करण्यासंदर्भात येत्या चार - पाच दिवसात निर्णय - आरोग्य
मंत्री राजेश टोपे.
आणि
·
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मराठवाड्यात काही धरणांच्या
जलसाठ्यात वाढ.
****
सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना
बहाल करण्याची तरतूद असलेल्या विधेयकांला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली
आहे. संसदेनं नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात या विधेयकाला मंजुरी दिली होती. विधी आणि
न्याय मंत्रालयानं हे विधेयक मांडलं होतं. या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यामुळे
राज्यातील मराठा समाजाला मागसवर्गीयांच्या कक्षेत आणण्याचे अधिकार राज्याला प्राप्त
होणार आहेत. सामान्य विमा व्यवसाय राष्ट्रीयकरण दुरुस्ती विधेयकालाही राष्ट्रपतींनी
मंजुरी दिली आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात केवळ घोषणा नको, तर कृती करावी, असा सल्ला खासदार संभाजीराजे
छत्रपती यांनी, राज्य सरकारला दिला आहे. काल औरंगाबाद इथं मराठा क्रांती मोर्चाच्या
पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकारनं राज्य
सरकारला आरक्षणाचा अधिकार दिला असून, त्यामुळे राज्य सरकारने आता टिकेल असंच आरक्षण
मराठा समाजाला द्यावं, असं ते म्हणाले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं १६ ठराव
पारित करण्यात आले.
****
मराठा समाजाच्या हितासाठी राज्य सरकारने केवळ गांभीर्यानं विचारच केलेला नाही,
तर अनेक मुद्यांवर कार्यवाही देखील केली असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं
आहे. राज्य सरकारने मराठा समाजासाठी काय केलं, असा प्रश्न खासदार संभाजीराजे छत्रपती
यांनी उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी त्यांना १५ पानी पत्र पाठवलं
आहे. आरक्षणाच्या मुद्यावर भोसले समितीच्या शिफारशीनुसार राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात
पुनर्विचार याचिका दाखल केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. याशिवाय
मराठा समाजासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली.
****
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल औरंगाबाद इथं, मराठा समाजासंदर्भात
आतापर्यंत राज्य सरकारनं काढलेल्या विविध योजनांचे शासन निर्णय फाडून आंदोलन केलं.
शासनानं काढलेले हे सर्व निर्णय फसवे असून, समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप,
मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी यावेळी केला. मराठा आरक्षण आणि समाजाच्या
विविध मागण्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत आंदोलन करत राहणार असल्याचं ते
म्हणाले. दरम्यान, पोलिसांनी रमेश केरे यांच्यासह काही आंदोलनकर्त्यांना यावेळी ताब्यात
घेतलं.
****
राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती अद्यापही चिंताजनक
आहे, त्या जिल्ह्यांमध्ये सूक्ष्म नियंत्रण क्षेत्र तयार करण्याची गरज असल्याचं मत,
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या
‘जनआशीर्वाद’ यात्रेदरम्यान त्या काल नंदुरबारमध्ये बोलत होत्या. प्राणवायू अभावी कोरोना
विषाणू बाधित किती रुग्णांचा मृत्यू झाला, याबाबत राज्याकडून केंद्राला अद्याप माहिती
मिळालेली नसल्याचं, त्यांनी यावेळी सांगितलं. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसींच्या
सर्वाधिक मात्रा महाराष्ट्राला देण्यात आल्या असून, राज्यातल्या एक लाख मात्रा वाया
गेल्याचंही त्या म्हणाल्या.
****
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची जनआशिर्वाद यात्रा काल परभणीत दाखल
झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दूत म्हणून जनतेची सेवा करणार असल्याचं, कराड यावेळी
म्हणाले. मराठवाड्याच्या विकासासाठी मोदी सरकार आणि फडणवीस सरकारनं भरभरून निधी दिला.
मात्र, महाविकास आघाडी सरकार सूडानं वागून मराठवाड्याच्या विकासात खीळ घालण्याचा प्रयत्न
करत असल्याची टीका, कराड यांनी केली.
जालना जिल्ह्यातील वाटूर इथं जन आर्शिवाद यात्रेत डॉ. भागवत कराड यांनी जनतेला
संबोधित केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले –
बरीचशी कामं झालेली असतील, झाले नसतील तरीही मला सांगावसं वाटतं की मोदी साहेबांच्या
येणाऱ्या काळामधे ते पूर्ण कामं होतील. आणि आपला भारत देश, आपला मागासलेला मराठवाडा
सुद्धा विकसित होईल. मी अर्थखात्याचा मंत्री आहे. आणि युवकांना जी मुद्रा योजना आहे,
त्या मुद्रा योजनेमधे लोन मिळायला बराचसा त्रास होतो असं मला बऱ्याच ठिकाणी, नांदेड
असेल, हिंगोली असेल इथं सांगण्यात आलं. आपण त्याच्यातल्या अडीअडचणी दूर करून त्याच्यामधे
काही बदल करून जास्तीत जास्त ही योजना सुलभ कशा करता येतील आणि युवकांना मदत कशी होईल
यासाठी मी प्रयत्न करेन.
दरम्यान, कराड यांची ही यात्रा आज औरंगाबाद जिल्ह्यात येणार आहे. उद्या कन्नड
इथं यात्रेचा समारोप होईल असं सूत्रांनी सांगितलं.
****
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रेला,
काल मुंबईत प्रारंभ झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या यात्रेला
हिरवा झेंडा दाखवला. यात्रेदरम्यान राणे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक,
चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरे
यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं.
****
राज्यात काल पाच हजार २२५ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या ६४ लाख ११ हजार ५७० झाली आहे. काल १५४ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३५ हजार
५६७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. काल पाच हजार ५७९ रुग्ण
बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६२ लाख १४ हजार ९२१ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ९३ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात
५५ हजार ५७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल २४३ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर चार जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या दोन, तर बीड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या
एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १४३ रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात
५१, औरंगाबाद २०, लातूर १५, नांदेड सात, जालना सहा, तर परभणी जिल्ह्यात एक रुग्ण आढळला.
हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रूग्ण आढळला नाही.
****
दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्य करण्यास सरकार कटीबद्ध असल्याचं, सामाजिक
न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. विकलांग व्यक्तिंना
साधन खरेदीसाठीची योजना आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत, हिंगोली इथं आयोजित सामाजिक
सक्षमीकरण शिबिराचं उद्घाटन आठवले यांच्या उपस्थितीत काल दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात
आलं, त्यावेळी ते बोलत होते. या शिबिरात ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना दोन
कोटी ७५ लाख रुपयांहून अधिक किमतीची सहाय्यक उपकरणं आणि साधनांचं वितरण करण्यात आलं.
****
पारधी कुटुंबांकडे नागरिक म्हणून आवश्यक असलेली कागदपत्रं नाहीत ती येत्या तीन
महिन्यात शिबिरं घेऊन देण्यात यावीत, असे निर्देश राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा
समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी दिले आहेत. ते काल उस्मानाबाद इथं बोलत होते. उस्मानाबाद
जिल्ह्यात अडीच हजार पारधी कुटुंबं आहेत. त्यापैकी काही कुटुंबांकडे अद्यापही नागरिकांची
ओळख असलेली कागदपत्रं नसल्यानं त्यांनी हे निर्देश दिले. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
यांनी येत्या तीन महिन्यात शिबिरं घेऊन ही कागदपत्र देण्यात येतील असं म्हटलं असून,
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती, आदिवासी
क्षेत्र आढावा समितीच्या अध्यक्षांनी यावेळी दिली.
****
उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या आवाहनानुसार, श्री तुळजाभवानी
मंदीर संस्थानच्या समितीतर्फे रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना,
देवीच्या पंचवीस हजार साड्यांची मदत पाठवण्यात येणार आहे. मंदीर संस्थान समितीनं हा
निर्णय घेतला आहे. समितीच्या या निर्णयाचं गडाख यांनी कौतूक करून केलं आहे. मंदिर संस्थान
समितीकडे दहा ऑगस्टपर्यंत शिल्लक असलेल्या नऊवार एक हजार आणि सहावार चोवीस हजार साड्यांचे
नग आहेत. त्यांना पूरग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयांकडे वाटपासाठी पाठवण्यात येणार
आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी, राज्याच्या
लोकायुक्त पदाची काल शपथ घेतली. राजभवन इथं एका शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित
पवार, राजशिष्टाचार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते.
****
राज्यातल्या ज्या जिल्ह्यांमध्ये टाळेबंदीचे निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत,
त्या जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयं आणि खाजगी शिकवणी सुरू करण्याची परवानगी द्यावी,
अन्यथा येत्या सोमवारपासून स्वनियमावली तयार करून, सुरक्षित अंतर आणि पन्नास टक्के
क्षमतेसह शाळा महाविद्यालयं सुरू करण्याचा इशारा, भारतीय जनता पक्षाचे आमदार हरीभाऊ
बागडे यांनी दिला आहे. औरंगाबादमध्ये ते काल वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले –
ज्यांच्याकडे मोबाईल नाही अशा विद्यार्थ्याला सुद्धा पुस्तकं नसल्यामुळे आज
त्याला घरीपण अभ्यास करता येत नाही, आणि त्यामुळे विद्यार्थ्याचं जर शिक्षणापासून,
अभ्यासापासून लक्ष विचलित झालं तर पुन्हा त्याची अभ्यासाची गती लागणार नाही आणि तो
अभ्यासापासून थोडा परावृत्त झाला की तो शाळेपासून थोडा दूर जाण्याची भीती वाटते. म्हणजे
पीढी बरबाद होण्याची ही चिन्हं आहेत. माझा सरकारला आग्रह आहे शाळा लवकरात लवकर सुरू
केली पाहिजे. दुसरं माझं म्हणणं असं आहे की गणित, इंग्रजी आणि सायन्स या तीन विषयांचे
तरी वर्ग सुरू केले पाहिजे.
दरम्यान, राज्यात शाळा महाविद्यालयं सुरु करण्यासंदर्भात येत्या चार - पाच दिवसांत
निर्णय होईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते.
शाळा महाविद्यालयं सुरु करण्यासंदर्भात शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण विभागांशी चर्चा
सुरु असून, येत्या चार ते पाच दिवसांत कृती दलाचा अहवाल आल्यानंतर निर्णय होईल, असं
त्यांनी सांगितलं.
****
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची आज जयंती. हा दिवस देशभरात “सद्भावना
दिवस” म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत “सामाजिक
ऐक्य पंधरवडा” साजरा केला जाणार आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित,
उन्नत भारत अभियानांतर्गत, राष्ट्रीय स्तरावरच्या कोविड जनजागृती भित्तीपत्रक आणि चित्रिकरण
स्पर्धांचे निकाल काल जाहीर करण्यात आले. यामध्ये भितीपत्रक स्पर्धेतील प्रथम पारितोषिक
बरलीन फर्नांडिस यांना, तर द्वितीय पारितोषिक मानसी बोरा आणि तृतीय पारितोषिक ऐश्वर्या
येमुल यांना जाहीर झालं आहे. चित्रिकरण स्पर्धेत प्रथम पारितोषिक रवींद्रकुमार एन टी
यांना, तर द्वितीय पारितोषिक रामय्या तनवी आणि तृतीय पारितोषिक शुभम केंद्रे यांना
जाहीर झालं आहे.
****
मराठवाड्यात अनेक भागात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे काही
धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. नांदेड जिल्ह्यातलं विष्णुपुरी आणि हिंगोली जिल्ह्यातलं
सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणातही ७९ टक्के
इतका पाणीसाठा झाला आहे. मात्र जायकवाडी, मांजरा, निम्न तेरणा, सीना कोळेगाव आणि माजलगाव
या धरणांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली नाही.
दरम्यान, कालही अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात किनवट, माहूर,
भोकर या महसूल मंडळात मुसळधार तर बिलोली, अर्धापूर, मुदखेड, मुखेड या महसुल मंडळात
मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर उमरी, नायगाव, हिमायतनगर, लोहा, धर्माबाद, कंधार या
महसूल मंडळात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. औरंगाबाद शहर आणि परिसरातही काल दिवसभर पावसाची
संततधार सुरु होती. दौलताबाद परिसरातही दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे
घाट परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. नाशिक जिल्ह्याच्या बहुतांश भागात गेल्या
दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.
****
हवामान
राज्यात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता पुण्याच्या हवामान विभागानं व्यक्त केली
आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद,
जालना, हिंगोली, नांदेड, ठाणे, पालघर, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत मध्यम ते तीव्र
पावसाची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment