आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२० ऑगस्ट
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची आज जयंती. हा दिवस देशभरात “सद्भावना
दिवस” म्हणून साजरा केला जातो. याअनुषंगाने २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत “सामाजिक
ऐक्य पंधरवडा” साजरा केला जाणार आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण केली आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात ख्रिउ क्षेत्रात आज पहाटे झालेल्या
चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि जम्मू काश्मीर
पोलिसांनी राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान ही चकमक झाली.
****
ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक ओम नंबियार यांचं काल निधन झालं, ते ८९ वर्षांचे
होते. प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा हिच्यासह अनेक खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षित केलं
होतं. भारत सरकारनं १९८५ मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार देण्यास सुरुवात केली, तेव्हा
पहिला पुरस्कार नंबियार यांना देऊन त्यांचा सन्मान केला होता.
****
केंद्र तसंच राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जबाबदारी पार
पाडत नसल्याचा आरोप करत, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ पाटील कपाटे
आणि माधव पाटील ताटे यांनी, काल नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल
ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी
त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं.
****
लातूर महानगर पालिकेची अतिक्रमण विरोधी मोहिम सुरु असून, या मोहिमेअंतर्गत
हरित पट्ट्यावरील आरक्षित भागात अतिक्रमण केलेल्या नागरिकांविरुद्ध काल गुन्हा दाखल
करण्यात आला. महापालिकेच्या ताब्यातील किंवा हरित पट्ट्यासाठी आरक्षित जागांवर नागरिकांनी
अतिक्रमण करू नये, यापुढे अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल,
असा इशारा आयुक्त अमन मित्तल यांनी दिला आहे.
****
महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या पर्यटन
मार्गदर्शक ऑनलाईन प्रशिक्षणात आतापर्यंत राज्यातल्या ७०० हून अधिक युवक-युवतींनी सहभाग
घेतला आहे. या प्रशिक्षणात सहभागाची संधी अजूनही उपलब्ध असल्याचं पर्यटन संचालक डॉ.
धनंजय सावळकर यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment