Wednesday, 22 December 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 December 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 December 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ डिसेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      स्पर्धा परीक्षा घोटाळा आणि इतर मुद्यांवरून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी.

·      संसदेचं हिवाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित.

·      आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानला हरवत भारतानं पटकावलं कांस्यपदक.

आणि

·      थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती “राष्ट्रीय गणित दिवस” म्हणून साजरी.

****

स्पर्धा परीक्षा घोटाळा आणि इतर मुद्यांवरून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस वादळी चर्चेचा ठरला.

 

विधानसभा अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पध्दतीने घेण्याच्या विधानसभा नियमात सुधारणा करण्याचा प्रस्ताव आज सरकारी पक्षाकडून विधानसभेत मांडण्यात आला. या बदलाबाबत हरकती सूचना देण्याची मुदत १० दिवसांवरून एक दिवस करण्याचा निर्णय यावेळी बहुमताने घेण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बदलाला सभागृहात कडाडून विरोध केला. भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनीही या बदलावर आक्षेप घेत, आपलं मत मांडताना वापरलेल्या शब्दांवर काँग्रेसचे नाना पटोले यांनी आक्षेप घेतला. सदस्यांचा वैधानिक अधिकार नाकारला जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या मुद्यावर सभात्याग केला.

 

दरम्यान, बदलाची ही शिफारस नियम समितीने केलेली नसून, सरकारनं परस्पर हा नियम बदलला. या बदलाचं कारणही सांगण्यात आलेलं नाही, असं भाजपा नेते आमदार विधीज्ञ आशिष शेलार यांनी यासंदर्भात जारी एका पत्रकात म्हटलं आहे.

दरम्यान, शून्य प्रहरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धा परीक्षा घोटाळ्याकडे लक्ष वेधत, या प्रकरणावर चर्चेची मागणी केली. या मागणीला काँग्रेसचे नाना पटोले यांनी पाठिंबा दिला. राज्याच्या जनतेला माहिती मिळावी म्हणून या घोटाळ्यावर चर्चा होणं गरजेचं आहे, असं पटोले म्हणाले.

विविध विभागात झालेल्या परीक्षा घोटाळ्याबाबत तीन निवृत्त सचिवांमार्फत चौकशी केली जाणार असल्याचं, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत घोषित केलं. सदर विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्याव्यात यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, तसंच या विद्यार्थ्यांकडून कोणतंही परीक्षा शुल्क घेतलं जाणार नाही, असंही टोपे यांनी सांगितलं. यासंदर्भातल्या पोलीस चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असून, यात मंत्र्यांच्या सहभागाबद्दल पोलिसांचा सायबर विभाग तपास करत असल्याची माहितीही टोपे यांनी दिली.

सत्ताधारी पक्षाचे सदस्य भास्कर जाधव यांनी विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याच्या कारणावरून विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक झाले. या अंगविक्षेपाबद्दल जाधव यांनी माफी मागावी किंवा अध्यक्षांनी त्यांना निलंबित करावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

 

अतिवृष्टीग्रस्तांसाठी केंद्र सरकारनं दिलेल्या निधीचं पात्र शेतकऱ्यांना पूर्ण वाटप झालेलं नसल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं. विविध गावांमधल्या वीज भारनियमनाचा मुद्दाही फडणवीस यांनी मांडला.

 

हिवाळी अधिवेशनात आज पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली. यामध्ये औरंगाबाद वैजापूरचे आर.एम.वाणी, उस्मानाबाद तुळजापूरचे सिद्रामप्पा नागप्पा आलुरे, नांदेड जिल्ह्यातल्या मुखेडचे नागनाथराव रावणगावकर, भोकरदन - जाफ्राबाद मतदार संघाचे आमदार संतोष दसपुते यांचा समावेश आहे.

 

दरम्यान, अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि इतर मुद्यांवरुन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधात घोषणाबाजी केली.

****

संसदेचं हिवाळी अधिवेशन आज अनिश्चित काळासाठी संस्थगित झालं. आज एक दिवस आधी संपवण्यात आलेल्या या अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांचे प्रश्न, लखीमपूर खेरी प्रकरण, १२ खासदारांचं निलंबन यासह अन्य मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज वारंवार बाधित झालं. अधिवेशन काळात लोकसभेत ८२ टक्के काम झालं असून, नऊ विधेयकं पारित झाल्याचं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं.

राज्यसभेत तुलनेनं अत्यंत कमी काम झाल्याचं, सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. सदनाचं कामकाज चांगल्या पद्धतीने आणि सुरळीत चालण्यासंदर्भात सदस्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज नायडू यांनी व्यक्त केली.

****

औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री नगरपंचायत पोटनिवडणुकीत दोन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पूजा ढोके या २७९ मतं घेऊन विजयी झाल्या तर शिवसेनेच्या उमेदवार अर्चना दुतोंडे या ४३४ मतं घेऊन विजयी झाल्या. सिल्लोड नगरपरिषदेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या फातमाबी जब्बार खान या २०१९ मतं घेऊन विजयी झाल्या.

नांदेड वाघाळा महापालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या मुस्काना सय्यद वाजिद विजयी झाल्या. त्यांनी एम आय एमच्या उमेदवार रेशमा बेग यांना पराभूत केलं. भाजपच्या उमेदवार लक्ष्मी जोंधळे तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

****

अहमदनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी ५१७ मतांनी विजयी झाले. शिवसेना-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार सुरेश तिवारी यांचा त्यांनी पराभव केला. भाजप मधून हकालपट्टी झालेल्या वादग्रस्त माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याची निवड रद्द करण्यात आल्यानंतर रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली.

 

धुळे महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या आरती अरुण पवार विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या अनिता देवरे यांचा दोन हजार ७९४ मतांनी पराभव केला.

यवतमाळ जिल्ह्यातील धाणकी नगर पंचायत पोटनिवडणुकीत भाजपनं दोन्ही जागा जिंकल्या आहेत.

****

आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं पाकिस्तानला हरवत, कांस्यपदक पटकावलं. बांग्लादेशात ढाका इथं आज दुपारी झालेल्या या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ४-३ असा पराभव केला.

****

थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीच्या औचित्यानं आज देशभर गणित दिन साजरा करण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर इथं जवाहर नवोदय विद्यालयात “राष्ट्रीय गणित दिवस” साजरा करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांनी रामानुजन यांच्या कार्याला उजाळा दिला.

 

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं उद्या औरंगाबाद इथं, गणित प्रात्याक्षिक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात गणितातील विविध कठीण संबोध प्रतिकृतींची उकल विद्यार्थी करणार आहेत.

****

स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण कायम राखावे या मागणीसाठी परभणी इथं संतप्त आंदोलकांनी आज गोदावरी नदीवरील अहिल्यादेवी होळकर घाटावर पाण्यात उतरुन आंदोलन केलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...