Thursday, 23 December 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 December 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 December 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ डिसेंबर २०२ सायंकाळी ६.१०

****

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देश दीडशे कोटी मात्रांच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचा ओ-मायक्रॉन हा नवा प्रकार आढळून आल्यानं, चिंता वाढली आहे. सर्वांना आवाहन आहे की, लसीच्या दोन्ही मात्रा वेळेवर घ्या, तसंच ज्यांनी अद्याप लस घेतली नाही, त्यांना लस घेण्यासाठी सहकार्य करा. आपली आणि आसपासच्या सर्वांची काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. कोविड 19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      शक्ती फौजदारी कायदा विधेयकाला विधानसभेत एकमतानं मंजुरी.

·      लोकप्रतिनिधींना धमक्यांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करणार - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील.

·      नांदेड जिल्ह्यात `स्वजलधारा` अभियानाअंतर्गत झालेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांची चौकशी होणार.

आणि

·      डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हे कधी दाखल होणार - आमदार विक्रम काळे यांची विधानपरिषेदत विचारणा.

****

महिला आणि बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला आळा घालण्यासाठी नव्यानं तयार करण्यात आलेला ‘शक्ती फौजदारी कायदा विधेयक’ राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. मागील आधिवेशनात मंजूर केलेला हा कायदा विधीमंडळाच्या संयुक्त समितीकडं पाठवण्यात आला होता. या समितीचा अहवाल काल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत मांडला होता. या कायद्यात समाजमाध्यमांवर महिलांची बदनामी, अॅसीड हल्ला, विनयभंग आदी गुन्हे अजामीनपात्र करण्यात येणार आहेत. तसंच यासंदर्भातले खटले एका महिन्यात निकाली काढणं, प्रत्येक जिल्ह्य़ात स्वतंत्र तपास यंत्रणा आणि विशेष न्यायालय स्थापन करणं या तरतुदींचा यात समावेश आहे.

****

लोकप्रतिनिधी, मंत्र्यांना मिळणाऱ्या धमक्यांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक ‘एसआयटी’ची स्थापना केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत केली.

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणी बंगळुरूतून एकाला अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. आरोपीच्या कर्नाटक संबंधावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भारतीय जनता पक्ष सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर तसंच ज्येष्ठ कम्युनीस्ट नेते गोविंद पानसरे, संपादक गौरी लंकेश यांच्या हत्येचे धागेदोरे कर्नाटकमध्ये आहेत, याकडे शिवसेनेचे सदस्य सुनील प्रभू यांनी लक्ष वेधलं. आपल्यालाही धमक्या येत असून या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे कर्नाटकशी जोडले असल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी नमुद केलं. भारतीय पोलिस सेवेतला अधिकारी असलेल्या `एसआयटी`च्या माध्यमातून याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. सनातन संस्थेवर मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले. धमकी प्रकरणाला आता राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर केली.

****

जिल्हा पुरवठा अधिकारी संवर्गातली रिक्त पदं भरण्याची कार्यवाही सुरु असून याबाबत अधिक पाठपुरावा करण्यात येईल, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत सांगितलं. बीड जिल्हा सार्वजनिक वितरण पुरवठा विभागाकडून शिधापत्रिका गहाळ झाल्याबाबतचा तारांकित प्रश्न संदीप क्षीरसागर, प्रशांत बंब आणि प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला होता, त्याच्या उत्तरात भुजबळ यांनी ही माहिती दिली. बीड तहसील कार्यालयामधून पाच हजार ४९८ शिधापत्रिका विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता वितरित झाल्याचं निदर्शनास आलं आहे. याप्रकरणी बीड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दोषी असलेल्या तत्कालिन सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार, तत्कालीन अव्वल कारकून यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे देण्यात आला आहे. त्याशिवाय बीड जिल्हा पुरवठा अधिकारी हे रिक्त पद भरण्याची कार्यवाही देखील सुरु आहे, असं भुजबळ म्हणाले. राज्य परिवहन महामंडळातल्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आणि मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना वेळेवर निवृत्तीवेतनाचा लाभ मिळण्यासाठी महामंडळ सकारात्मक असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत सांगितलं. राज्य परिवहन महामंडळातल्या निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या वारसांना मागील काही वर्षांपासून निवृत्तीवेतन मिळालं नसल्याबाबतचा तारांकित प्रश्न मेघना साकोरे बोर्डीकर, राजेश पाटील यांनी उपस्थित केला होता. कंपन्यांच्या प्रदुषणामुळं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असेल आणि याबाबत चौकशी केल्यानंतर हे सिद्ध होत असेल तर अशा कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी अन्य एका प्रश्र्नाच्या उत्तरात विधानसभेत दिली.

नांदेड जिल्ह्यात धर्माबाद तालुक्यातल्या स्वजलधारा अभियानाअंतर्गत झालेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांची चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल, असं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितलं. सध्या नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद तालुक्यात एकूण तेरा योजना मंजूर करण्यात आल्या असून त्यातल्या आठ योजनांची कामं बंद आहेत. उर्वरित पाच योजनांच्या कामांद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. तसंच पाणीपुरवठा नियमित होत नसलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत येत्या एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल तसंच चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल, असं पाटील म्हणाले.

****

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १२७ कोटी रुपयांचा झालेला भ्रष्टाचार, कुलगुरूंनी घेतलेली महागडी गाडी यावर विक्रम काळे यांनी आज विधान परिषदेत टीका केली. संबंधितांवर गुन्हा कधी दाखल होणार अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. अशा खरेदीबाबत डॉ. धामणसकर समिती स्थापन केली, मात्र दोन वर्ष त्याचा अहवाल राज्यपालांना गेला नाही. महिन्याभरापूर्वी तो पाठवण्यात आल्याचं तसंच या विद्यापीठासह अनेक विद्यापीठांचे वार्षिक अहवाल प्रलंबित असल्याची माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावर दिली. मुंबई विद्यापीठाचाही यात समावेश आहे. यावर १५ दिवसात निर्णय घेऊन कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सिल्लोड तालुक्यातल्या उंडणगाव पेट्रोलपंपाजवळ एक चारचाकी आणि एक दुचाकी वाहनादरम्यान समोरासमोर झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. औरंगाबाद - जालना महामार्गावर वरुड फाटा इथं एका चारचाकी वाहनाच्या धडकेनं अन्य दुचाकीस्वार जागीच ठार झाला. पैठण मार्गावर गेवराईजवळ झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी असून त्याला औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय रुग्णालय - घाटीत उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.                                                         

****

औरंगाबाद शहरातील टाकाऊ बांधकाम साहित्य डिसेंबर अखेरपर्यंत उचला अन्यथा यापुढे टाकाऊ बांधकाम साहित्य रस्त्यावर आढळल्यास बांधकाम निरीक्षकावर कारवाई करणार असल्याचा ईशारा महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिला आहे. शहरातील कचऱ्याबरोबरच रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागेवर बांधकाम मालमत्ता धारक टाकाऊ बांधकाम साहित्य आणि मलबा टाकत असल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळं वार्डातील बांधकाम निरीक्षकांनी याबाबतीत दक्ष रहावं अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं पाण्डेय यावेळी म्हणाले.

****

जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. इतर मागास वर्गाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोवर कोणत्याही निवडणुका घेण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. आंदोलनामुळं या मार्गावरची वाहतूक काही वेळ विस्कळित झाली होती.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात केंद्र सरकारच्या `जल जीवन मिशन` या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत शाळा आणि अंगणवाड्यांना पिण्याचं शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवण्यासाठी प्राधान्य दिलं जात आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील १५६६ शाळांपैकी १५१६ शाळांमध्ये शाश्वत पाणीपुरवठ्याच्या नळजोडण्या पुर्ण झाल्या आहेत. यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आता घरुन शाळेत येताना पाणी आणण्याची गरज नाही. शाळेतच स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळू लागल्यामुळं विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीडच्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेची आर्थिक स्थिती चांगली असुन ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता बँक प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन शासन नियुक्त प्रशासक मंडळानं केलं आहे. अनुत्पादक मालमत्ता आणि प्रशासकीय बाबी वगळता ही बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निकषांची पूर्तता करत असल्याचं मंडळानं म्हटलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...