Thursday, 6 January 2022

Text : आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 06.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०६ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेत १५ ते १८ वर्षाच्या मुलांना आतापर्यंत लसीच्या एक कोटी २४ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी आपल्या ट्विटर संदेशाद्वारे, किशोरवयीन मुलांमध्ये लसीकरणाबाबत असलेल्या उत्साहाचं कौतुक केलं आहे, तसंच या लसीकरणाचा एवढा टप्पा गाठल्याबद्दल मुलांचं अभिनंदन देखील केलं आहे.

****

सौम्य लक्षणं असलेल्या कोविड रुग्णांच्या गृहविलगीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोविड चाचणी अहवाल बाधित आल्यावर, रुग्णानं किमान सात दिवस विलगीकरणात राहणं गरजेचं आहे, मात्र त्याला सलग तीन दिवस ताप आलेला नसावा, असं यात नमूद आहे. सात दिवसांच्या गृहविलगीकरणानंतर पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही. रुग्णांच्या निकटसंपर्कात आलेल्यांपैकी ज्यांना काहीही लक्षणं नसतील, त्यांनी कोविड चाचणी करुन घेण्याची आवश्यकता नाही, असंही या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे.

****

देशाचा कोविड संसर्ग दर पाच पूर्णांक शून्य तीन दशांश टक्के तर महाराष्ट्राचा संसर्ग दर, ११ टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. देशभरात कोविड संसर्गाचं प्रमाण वाढत असलं तरीही, रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण पूर्वीच्या तुलनेत कमी असल्याचं त्यांनी सांगितलं.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना, कोविड प्रतिबंधक लसीकरणात बुस्टर डोस हा आधी घेतलेल्या लसीचाच दिला जाईल, असं स्पष्ट केलं. कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना कोव्हॅक्सिनचा तर कोव्हीशील्ड लस घेतलेल्यांना कोव्हीशील्डचा बुस्टर डोस मिळेल, असं डॉ पॉल यांनी सांगितलं.

****

परभणी शहर महापालिकेच्यावतीने प्रभाग समिती अ, ब, क अंतर्गत शहरातल्या विविध भागांमध्ये कोरोना नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर काल दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये ११२ नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला. तसंच पोलिसांनी २६ जणांवर ऑनलाईन पद्धतीनं कारवाई केली.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 07 July 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...