Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 17 January 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना
खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात
मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित
राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा
आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय
हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
·
राज्यात जिल्हा परिषदा तसंच पंचायत समित्यांमध्ये अनारक्षित
झालेल्या जागांसाठी उद्या मतदान.
·
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांचं
निधन; उद्या अंत्यसंस्कार.
·
राज्यातल्या शाळा ५० टक्के क्षमतेनं सुरु करण्याच्या मागणीसाठी
मेसा संघटनेची निदर्शनं.
आणि
·
वायदे बाजारावरची बंदी हटवण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचा
आंदोलनाचा इशारा.
****
राज्यात
जिल्हा परिषदा तसंच पंचायत समित्यांसाठी उद्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. इतर
मागास वर्गासाठीच्या आरक्षित जागा वगळता, उर्वरित जागांसाठी गेल्या महिन्यात पहिल्या
टप्प्यात मतदान झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे
अनारक्षित झालेल्या या जागांसाठी उद्या सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या वेळेत
मतदान होणार आहे. मतमोजणी परवा १९ तारखेला होणार आहे.
****
शेतकरी
कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांचं आज कोल्हापुरात एका खासगी रुग्णालयात
निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या राजर्षी छत्रपती शाहू
कॉलेजच्या मैदानावर अंत्यसंस्कार होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी २ दरम्यान त्यांचं अंत्यदर्शन
घेता येईल. कोविड नियमांनुसार फक्त २० जणांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार
केले जाणार असल्यानं, गर्दी न करता अंत्यदर्शन घेण्याचं आवाहन त्यांच्या कुटुंबियांनी
केलं आहे.
एन.
डी. पाटील यांच्या निधनानं शेतकरी आणि कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपल्याची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. बेळगावसह सीमा भाग अखंड महाराष्ट्रात
यावा हा त्यांचा ध्यास होता, असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांनी एन डी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. शिक्षण, समाजकारण
आणि राजकारण यांसह विविध क्षेत्रांमध्ये वावर असलेल्या एका प्रामाणिक लोकनेत्याला आपण
मुकलो आहोत, अशा शब्दात राज्यपालांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या शोक संदेशात, राज्यातल्या शेतकरी,
कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ
आणि निस्वार्थी नेता हरपला, असं म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री
अजित पवार, विधानसभेतले विरोधी पक्षनेते, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, यांनीही एन डी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण
केली आहे.
****
राज्यातल्या
शाळा ५० टक्के क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी द्यावी, तसंच आरटीईची थकीत रक्कम तातडीने
वितरीत करावी आदी मागण्यांसाठी, महाराष्ट्र इंग्रजी स्कूल असोसिएशन - मेसा संघटनेतर्फे,
आज औरंगाबाद इथल्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर, काळे कपडे परिधान करुन डोक्यावर छत्री
घेऊन निदर्शनं करण्यात आली. या मागण्यांचं निवेदन शिक्षण विभागाला देण्यात आलं. कोविड
साथीमुळे ५० टक्के क्षमतेने उपहारगृह, मॉल, नाट्यगृह, चित्रपटगृहांना परवानगी देण्यात
आली आहे. त्याप्रमाणेच ५० टक्के क्षमतेने दिवसाआड किंवा दुबार सत्रात शाळा सुरु करण्याची
परवानगी देवून, विद्यार्थ्यांचं होत असलेलं नुकसान टाळावं, २५ जानेवारीपूर्वी शाळा
सुरु करण्यास शासनाने परवानगी द्यावी, अन्यथा २७ जानेवारीपासून शाळा सुरु करण्यात येतील
असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे.
****
भारतीय
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि संत ज्ञानेश्वरांच्या ७२५ व्या संजीवन जन्मशताब्दीच्या
निमित्तानं आज उस्मानाबाद इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं जिल्हास्तरीय
प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनाची प्राथमिक फेरी घेण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक
राजेंद्र अत्रे यांच्या हस्ते या विद्यार्थी साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तपस्वी चँरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अँडव्होकेट मिलिंद
पाटील हे होते. उस्मानाबाद इथल्या वेंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत
चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या साहित्य संमेलनात विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी
काव्य सादरीकरण, तसंच स्वच्छता अभियान या विषयावरच्या नाटकांचं सादरीकरण केलं.
****
जालना
जिल्ह्यात आज कोविड संसर्ग झालेले १०९ नवीन रुग्ण आढळून आले. तर कोरोना विषाणूमुक्त
झालेल्या ३७ रुग्णांना सुटी देण्यात आली. बीड जिल्ह्यात आज १२९ तर नांदेड जिल्ह्यात
४२० नवे कोविडग्रस्त आढळून आले आहेत.
****
आमदार
बाबाजानी दुर्राणी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. आपली प्रकृती उत्तम असून,
आपल्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घेण्याचं आवाहन दुर्राणी यांनी केलं आहे.
****
शेतीमालावर
लादलेली वायदे बाजारावरील बंदी हटवावी तसंच जीएम तंत्रज्ञानाला परवानगी द्यावी, या
मागण्यांसाठी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष आंदोलन करणार आहे. स्वतंत्र भारत
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
शेतकरी संघटनेने यापूर्वी अनेक वेळा विनंती करून ही सरकारने जीएम वाणांवरची बंदी हटवलेली
नाही, ही बंदी न हटविल्यास येत्या १७ फेब्रुवारीला आपल्या शेतात बी. टी. वांग्याची
जाहीर लागवड करणार असल्याचा इशारा अनिल घनवट दिला आहे. शेती सुधारणांबाबत स्वतंत्र
भारत पक्षाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहिणार असल्याचं
घनवट यांनी सांगितलं आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यासह शहरात कोविड रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची
संख्या कमी आहे. अनेक रुग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांशी महापालिकेच्या
नियंत्रण कक्षातून नियमितपणे संपर्क साधला जात असल्याचं औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील
चव्हाण यांनी सांगितलं आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणाची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. शहर आणि ग्रामीण भागातील १ ते १६ जानेवारी
पर्यंत वाढलेल्या रुग्णसंख्येचा विश्लेषणात्मक अभ्यास करावा आणि अहवाल सादर करावा असे
निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिले. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - आयसीएमआरच्या
मार्गदर्शक तत्वानुसार सर्व यंत्रणांनी काम करावं, लसीकरणाचं उद्दिष्ट्य पूर्ण करावं
आणि कोविड लसीची दुसरी मात्रा प्रलंबित असलेल्या नागरिकांनी लसीकरण पूर्ण करून घ्यावं,
असं आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केलं.
****
औरंगाबाद
शहरात कोविड आणि ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचं निमित्त साधून प्रशासन मनमानी कारवाई करत
असल्याचा आरोप जिल्हा व्यापारी महासंघाने केला आहे. महासंघाचे अध्यक्ष विजय जैस्वाल
यांनी आज महासंघाच्या बैठकीनंतर प्रशासनाच्या या कारवाईविरोधात कठोर पावलं उचलण्याची
गरज व्यक्त केली. कोविड नियम भंग करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून दुकान
सुरू करण्याची परवानगी द्यावी, असंही जैस्वाल यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असल्याचं विजय जैस्वाल यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment