Sunday, 9 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.01.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 09 January  2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०९ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

देशात १५ ते १८ वयोगटातल्या मुलांच्या लसीकरण अभियानानं २ कोटींचा आकडा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य यंत्रणेचं आणि मुलांचं कौतुक केलं आहे. नागरिकांनी कोविड नियमांचं पालन करावं तसंच लसीकरण करुन घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. उत्तम! माझ्या तरुण मित्रांनो खूप छान कामगिरी. ही गती अशीच पुढे चालू ठेवू या, असं मोदी यांनी ट्वीटर संदेशात म्हटलं आहे.

****

देशात काल दिवसभरात एक लाख ५९ हजार ६३२ नवीन कोरोना विषाणू संसर्ग झालेले रुग्ण आढळले. त्याच वेळी ४० हजार ८६३ रुग्णही बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत बाधित रुग्णांपैकी ३२७ जणांचा मृत्यू झाला. दैनंदिन बाधितांच प्रमाण वाढून ते १० पूर्णांक २१ शतांश टक्के झालं आहे. आतापर्यंत देशात ३ कोटी ४४ लाख ५३ हजार ६०३ जण कोविड बाधित झाले. तर ४ लाख ८३ हजार ७९० लोकांचा या संसर्गजन्य आजारात मृत्यू झाला. देशात सध्या ५ लाख ९० हजार ६११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

देशात आतापर्यंत ३ हजार ६२३ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून त्यापैकी एक हजार ४०९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या एक हजार ९ रुग्णांपैकी ४३९ लोक बरे झाले आहेत.

देशात आतापर्यंत एकूण १५१ कोटी ५८ लाख इतकं लसीकरण झालं आहे. काल दिवसभरात ८९ लाख २८ हजार ३१६ डोस देण्यात आले.

दरम्यान, आरोग्य कर्मचारी, प्रत्यक्ष रुग्णांच्या संपर्कात येणारे कार्यकर्ते आणि ६० वर्षांवरील आजारग्रस्त नागरिकांना उद्यापासून कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे.

****

ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत यांचं काल रात्री वृध्दापकाळानं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार असलेले पंडित रामदास कामत हे मूळचे गोव्याचे. ‘संगीत संशय कल्लोळ, या नाटकानं आपल्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची त्यांनी सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी ‘संगीत शारदा’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत मानापमान’ अशा अठरा संगीत नाटकांमधून काम केलं होतं. ‘संगीत मत्स्यगंधा’ हे त्यांचं अत्यंत गाजलेलं नाटक असून ‘गुंतता हृदय हे’, ‘नको विसरू संकेत मिलनाचा’ यासारखी त्यांची अनेक नाट्यपदे गाजली. त्यांनी गायलेली ‘जन विजन झाले’, ‘अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला आहे’, ‘देवा तुझा मी सोनार’ अशी कितीतरी गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. २०१५ साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना मानाच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. २००९ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात बर्दापूर फाट्याजवळ आज राज्य परीवहन महामंडळाची एक बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर बर्दापूर आणि अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दोन्ही वाहनांना क्रेनच्या सहाय्याने बाजुला करून जखमींना बाहेर काढण्यात आले. ही बस लातूरहून औरंगाबादकडे जात होती. अपघाताचे कारण अद्याप समजून आलेलं नाही.

****

आज प्रवासी भारतीय दिवस. उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू यांनी प्रवासी भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रवासी भारतीयांकडून देशाच्या विकासात दुप्पट योगदानाच्या अपेक्षा केल्या आहेत. प्रवासी भारतीयांनी देशाच्या सांस्कृतिक राजदुताच्या भूमिकेत कार्यरत रहावं असं म्हटलं आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही प्रवासी भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

शिखांचे दहावे गुरु श्री गुरुगोविंदसिंह यांची आज ३५५वी जयंती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकाशपर्वा निमितं सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गुरुगोविंदसिंह यांचं जीवन आणि विचार हे लाखो लोकांना बळ देतात, असं मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. गुरू गोविंद सिंह यांचे साहिब जादे जोरवार सिंह आणि फतेहसिंह २६ डिसेंबर रोजी शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही गुरुगोविंदसिंह यांना आदरांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गुरु गोविंदसिंह यांना अभिवादन करुन जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...