Tuesday, 11 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 11.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

११ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला प्रभावीपणे सामोरं जाण्यासाठी आरोग्य विषयक पायाभूत सुविधा वाढवण्याची आणि आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची सूचना, केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर वाजवी दरांमध्ये उपचार होतील, याची खातरजमा करण्याची सूचनाही त्यांनी केली.

****

राज्यात कोविडची तिसरी लाट आलेली असून, दररोज ४० हजारांवर नवे रुग्ण आढळत आहेत. जानेवारीच्या अखेरीस या लाटेत सर्वोच्च रुग्णसंख्या समोर येईल, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. रुग्ण संख्या वाढत असली तरीही, आरोग्य यंत्रणेवर कोणताही ताण आलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

****

मराठवाड्यात काल ८७३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात ३१७, नांदेड जिल्ह्यात १६४, लातूर १५५, उस्मानाबाद १०४, परभणी ६८, जालना ३७, बीड १६, तर हिंगोली जिल्ह्यात काल १२ नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या तीन जणांना औरंगाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल जेरबंद केलं. रियाज सय्यद, तबरेज खान, आणि शेख मुजहित अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांकडून साडे ४७ हजार रुपये रोख आणि २८ हजार रुपयांचे मोबाईल, असा एकूण ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

****

निवडणूकविषयक जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरण मंजुरीकरता नाशिक इथल्या खासगी कंत्राटी वाहनचालकाला ७० हजार रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. गणेश बाबूराव घुगे असं या वाहनचालकाचं नाव असून, नाशिक-पुणे महामार्गावर सामाजिक न्याय संकुलाच्या आवारात लाचेची रक्कम घेताना त्याला पकडण्यात आलं. 

****

इगतपुरी-भुसावळ मेमू एक्स्प्रेसला कालपासून प्रारंभ झाला. मनमाड जंक्शन तसंच नाशिकरोड रेल्वे स्थानकांत या रेल्वे गाडीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ही गाडी सुरू झाल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातून प्रवास करणारे चाकरमानी आणि प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 July 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...