आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१२ जानेवारी २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
स्वामी विवेकानंद यांची जयंती आज राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली
जात आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज २५ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन
करणार आहेत. विवेकानंद यांनी राष्ट्र निर्माणासाठी देशातल्या युवकांना प्रेरित केलं
असल्याचं सांगून, पंतप्रधानांनी, स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली आहे.
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या औरंगाबाद विभागीय
कार्यालयाच्या वतीनं, कोविड-19 दिशानिर्देश आणि लसीकरण जनजागृती चित्ररथाचं जिल्हाधिकारी
कार्यालयात आज उद्घाटन होणार आहे.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्तही आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात
आलं आहे.
****
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काल देशभरातल्या १२० तज्ञ
डॉक्टरांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. देशातल्या कोविड-19 च्या सद्यस्थितीबाबत
त्यांनी चर्चा केली. यावेळी आरोग्य मंत्र्यांनी तज्ञांच्या सूचना ऐकून घेतल्या, तसंच
त्या अनुषंगानं काही सूचना दिल्या.
****
देशभरात खाद्यतेलाच्या दरात लीटरमागे पाच ते वीस रुपयांपर्यंत कपात झाली
आहे. कच्च्या पाम तेलावरचं शुल्क साडे सात टक्के तसंच कच्च्या सोयाबिन आणि सूर्यफुल
तेलावरचं शुल्क पाच टक्के केल्यानंतर देशभरातल्या प्रमुख तेल कंपन्यांनी तेलाच्या दरात
प्रतिलीटर १५ ते वीस रुपये कपात केल्याचं, ग्राहक कार्य तसंच सार्वजनिक वितरण मंत्रालयानं
सांगितलं आहे.
****
भारतानं काल समुद्रावरुन समुद्रावर मारा करणाऱ्या ब्राह्मोस स्वनातीत
क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीमुळे भारतीय नौदलाच्या भक्कम सज्जतेवर
शिक्कामोर्तब झालं असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
****
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओनं काल मॅन पोर्टेबल अँटी-टँक
गाईडेड क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. स्वदेशी विकसित हे टँकविरोधी क्षेपणास्त्र
कमी वजनाचे आणि एकदाच वापरता येणारे आहे.
****
लातूर जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस झाला. चाकूर तालुक्यातल्या घरणी परिसरात
गारपीट झाली. नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी काल पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातल्या
पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
****
No comments:
Post a Comment