Friday, 14 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 14.01.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 January 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत १५० कोटी मात्रा देण्याचा विक्रम करत देश या मोहिमेत पुढे वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      जनतेमधील लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर रण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन

·      राज्यात ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण नाही, कोविड संसर्गाचे नवे ४६ हजार ४०६ रुग्ण, मराठवाड्यात चाजणांचा मृत्यू तर एक हजार ७२६ बाधित

·      जल जीवन मिशन अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ३२ पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता

·      परभणी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार विजय गव्हाणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

·      केपटाऊन इथं सुरु असलेला तिसरा कसोटी क्रिकेट सामना जिंकण्यासाठी आफ्रिकेला १११ धावांची आवश्यकता   

णि

·      दिल्लीत सुरु असलेल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेनागपूरच्या मालविका बनसोडकडून सायना नेहवाल पराभूत

****

लसीकरणाविषयी नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करावे, लसीकरणाविषयी अफवा पसरू देऊ नका, असं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशातल्या कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी काल सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या ९२ टक्के जनतेनं लसीची पहिला मात्र घेतली असून, सुमारे ७० टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. संपूर्ण देशवासियांचं लसीकरण पूर्ण व्हावं यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करणाऱ्या, हर घर दस्तकमोहिमेवर भर देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. कठीण भौगोलिक परिस्थितीतही ग्रामीण भागात आणि दुर्गम भागात लसीकरण केलेल्या आशा कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. ओमायक्रॉन प्रकारच्या विषाणूबाबत पूर्वी असलेला संभ्रम आता दूर होताना दिसतो आहे. त्यामुळे नागरिकांनी जागरुक रहावं, घाबरुन जाऊ नये, सणासुदीच्या काळातही खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष करु नये असं आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केलं आहे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या जास्त असेल तिथे अधिकाधिक चाचण्या करा, गरजेनुसार केवळ स्थानिक पातळीवर निर्बंध लादा, गृहविलगीकरण वाढवून घरीच उपचार देणं कसं वाढवता येईल, यावर लक्ष देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी केल्या आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे या बैठकीला उपस्थित होते. कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढवणं आवश्यक असून, लसींच्या मात्रांचा पुरवठा करण्याची मागणी पंतप्रधानांनकडे केली असल्याचं, टोपे यांनी सांगितलं. राज्यातल्या निर्बंधाबाबत केंद्र सरकारने विशेष कार्यपद्धती ठरवावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

****

राज्यात काल ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या  एक हजार ३६७  झाली आहे. त्यापैकी  ७७५ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४६ हजार ४०६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७० लाख ८१ हजार ०६७ झाली आहे. काल ३६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार ७३७ झाली असून, मृत्यूदर दोन टक्के झाला आहे. काल ३४ हजार ६५८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६६ लाख ८३ हजार ७६९ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ३९ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २ लाख ५१ हजार ८२८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल एक हजार ७२६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन, तर जालना जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ५७३ नवे रुग्ण आढळले. यात शहरातल्या ३८२ तर ग्रामीण भागातल्या १९१ रुग्णांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यात ४२१, नांदेड ४००, उस्मानाबाद १४०, जालना ६४, परभणी ५६, बीड ४५, तर हिंगोली जिल्ह्यात काल २७ नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

कोविड नियमांचा भंग केल्या प्रकरणी औरंगाबाद शहरातल्या जालना महामार्गावर असलेल्या `राज क्लॉथ` या कापड दुकानावर प्रशासनानं कारवाई केली आहे. सहायक कामगार उपायुक्त वाय. एस. पडीयाल आणि महापालिकेच्या पथकानं हे दुकान पुढील आदेशापर्यंत बंद केलं आहे. औरंगाबादेत रुग्ण संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं नियमांचा भंग करणारे उपहारगृह, मॉल्स आणि विविध स्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं पैठण इथलं नाथमंदिर आज आणि उद्या बंद ठेवण्याचा निर्णय संस्थाननं घेतला आहे. मकर संक्रातीला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेतला असल्याचं संस्थानतर्फे कळवण्यात आलं आहे.

****

नांदेड शहरात आजपासून कोविड प्रतिबंधात्मक नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. या नियमावलीचा भंग करून खाजगी शिकवणी वर्ग सुरू ठेवल्याबद्दल महानगरपालिकेनं शहरातल्या चार खाजगी शिकवणी वर्गांना ९५ हजार रुपये दंड ठोठावला आहे.

****

मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे तर उपाध्यक्षपदी भाजपच्या विठ्ठल भोसले यांची निवड झाली आहे. ११ विरुद्ध नऊ मतांनी कांबळे जिंकून आले. उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर आणि विठ्ठल भोसले यांना समान मतं पडली होती, त्यानंतर चिठ्ठी टाकून झालेल्या निर्णयात भोसले यांनी बाजी मारली. यापूर्वी मुंबई बँकेचं अध्यक्षपद विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे होतं.

****

जल जीवन मिशन अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ३२ पाणीपुरवठा योजनांना काल प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. योजनांच्या कामाला गती देण्यासाठी संबंधित गावातल्या पाणीपुरवठा योजनांचे आराखडे, राज्य शासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करुन, तसंच मराठवाड्यात गेल्या ३० वर्षातल्या अवर्षण आणि अतिवृष्टीचा अभ्यास करून करावेत, असंही त्यांनी सांगितलं. ग्रामस्थांना आणि जनावरांना शासन नियमानुसार देय असलेल्या पाण्याच्या अनुषंगानं, ३० किंवा १५ वर्षातील संभाव्य लोकसंख्या आणि जनावरांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन आराखडे करावेत, असंही दिवेगावकर यांनी यावेळी नमूद केलं.

****

राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी आगारातल्या १४९ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ आणि ३७८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. परभणी विभागातल्या चौदा कर्मचाऱ्यांची प्रशासकीय बदली करण्यात आली तर तेरा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. ३७८ कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं तर २९७ कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. १९४ कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे तर १४९ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं. यात ६३ चालक, ६८ वाहक, १४ यांत्रिकी विभागातले आणि प्रशासकीय विभागातल्या चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संपकऱ्यांपैकी १२९ कर्मचारी काल कामावर परतले आहेत.

****

परभणी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार विजय गव्हाणे यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबतच वर्धा, नांदेड तसंच पैठणमधील अन्य पक्षाच्या कार्यकत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशाचं स्वागत केलं.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान केपटाऊन इथं सुरु असलेला तिसरा कसोटी क्रिकेट सामना जिंकण्यासाठी भारताला दक्षिण आफ्रिकेचे आठ गडी बाद करणं, तर दक्षिण आफ्रिकेला १११ धावांची आवश्यकता आहे. सामन्याच्या कालच्या तिसर्या दिवशी भारतीय संघ दुसर्या डावात १९८ धावांवर सर्वबाद झाला. विराट कोहली आणि के. एल. राहुल वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला १० पेक्षा अधिक धावाही करता आल्या नाहीत. कालचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्या डावात दोन बाद १०१ धावा झाल्या होत्या.    

****

दिल्लीत सुरु असलेल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये नागपूरच्या मालविका बनसोडनं सायना नेहवालला पराभूत केलं. मालविकानं दुसऱ्या फेरीच्या सामन्यात सायनाचा २१-१७, २१-९ असा पराभव केला. त्यामुळे सायनाचं या फेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. पी. व्ही सिंधू आणि एच. एस. प्रणोय़ यांनी एकेरी उप-उपांत्य फेरीत प्रवेश केल आहे.

****

लातूर जिल्हा वार्षिक योजनेतल्या निधीचा काटेकारपणे उपयोग करण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. २०२२-२०२३ या वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्याला यावेळी मंजुरी देण्यात आली. लातूर जिल्ह्यातल्या अर्धवट कामाचा तालुकानिहाय आढावा घेऊन ती तातडीनं पूर्ण करावीत, तसंच चालू आर्थिक वर्षातला अखर्चित निधी वेळेत योग्य पद्धतीनं खर्च करुन योजना पूर्ण कराव्यात, अशी सूचना देशमुख यांनी केली.

****

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते नांदेड -`तपोवन` जलद रेल्वे गाडी आज आणि उद्या मनमाड ते दौलताबाद दरम्यान तीस मिनिटं उशिरा धावणार आहे. औरंगाबाद ते दौलताबाद दरम्यान असलेल्या रेल्वे उड्डाण पुला शेजारी नवा उड्डाण पूल उभारण्यात येत आहे. त्यामुळे गाडीला हा उशीर होणार असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं दिली आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २८ वा `नामविस्तार दिन` आज विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या थीएटर अकादमीचे प्राध्यापक मंगेश बनसोड यांचं ऑनलाईन व्याख्यान आज सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आलं आहे. नामविस्तार आणि सामाजिक न्यायाची अपेक्षाया विषयावर ते व्याख्यान देणार असल्याचं विद्यापीठ प्रशासनानं कळवलं आहे.

****

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातल्या जवळपास ९६ टक्के शाळांना, तर ९२ टक्के अंगणवाड्यांना नळ जोडणी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत ही माहिती दिली.

****

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीनं आजपासून २८ जानेवारी पर्यंत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगानं औरंगाबाद शहरातल्या श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं मराठवाडा पातळीवर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...