Friday, 14 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 14.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१४ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

मकर सक्रांतीचा सण देशातल्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने साजरा होत आहे. महाराष्ट्र आणि राजस्थानात मकर सक्रांती, गुजरातमध्ये उत्तरायण, तामिळनाडूसह दक्षिण भारतातल्या काही भागात पोंगल, आसाममध्ये बिहू नावाने हा सण साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना या सणांच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मकर संक्रांतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. परस्परांची काळजी घेत कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करू या आणि या संक्रमणातून बाहेर पडून आरोग्याचा गोडवा वाढवू या, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. तर यंदाची मकर संक्रात राज्यासाठी कोरोनामुक्तीची पहाट ठरो, अशा शब्दात अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

****

आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत आयुष मंत्रालयाच्या वतीनं आज मकर संक्रातीचं औचित्य साधूण जागतिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकं घेण्यात आली. या कार्यक्रमात एक कोटी नागरिक प्रत्यक्ष तसंच ऑनलाईन सहभागी झाले होते.

****

पश्विम बंगालमधल्या न्यू दोमोहानी रेल्वेस्थानकानजिक गुवाहाटी - बिकानेर एक्स्प्रेस रेल्वे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर ३६ जण जखमी झाले. काल संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

****

अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलांना तसंच वेश्या व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना शिधापत्रिका देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २८ वा ‘नामविस्तार दिन’ आज विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. यानिमित्त विद्यापीठाच्या वतीनं विविध उपक्रम घेण्यात येत आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल ५७३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात शहरातल्या ३८२ तर ग्रामीण भागातल्या १९१ रुग्णांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात काल तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...