Sunday, 16 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 16.01.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 January 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या १ अब्ज मात्रा देण्याचं काम पूर्ण झाल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं पुरवठादार आणि दात्यांचं अभिनंदन केलं आहे. हा अभिमानाचा क्षण असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं एका ट्वीट संदेशात म्हटलं आहे. जगभरातल्या सगळ्या देशांमध्ये लसींचं समान वाटप व्हावं आणि सगळ्या देशांमध्ये लवकरात लवकर ७० टक्के लसीकरण करण्यात यावं असं ही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

****

सिडको महामंडळाच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या पहिल्या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोची सुरक्षाविषयक चाचणी उद्या आणि परवा मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या पथकाकडून घेण्यात येणार आहे. या मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता मेट्रो रेल्वे सुरक्षा - सीएमआरएस यांच्याकडून देण्यात येणारे सुरक्षाविषयक प्रमाणपत्र हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असणार आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पेंधर ते सेंट्रल पार्क मार्गावर प्रवासी वाहतुकीला सुरूवात होणार आहे.

****

देशात आतापर्यंत ७ हजार ७४३ ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत तर एका रुग्णाचा मृत्यु झाला आहे. गेल्या २४ तासांत ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत २८ पूर्णांक १७ टक्क्यानं वाढ झाली आहे. २८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असून महाराष्ट्रात सर्वाधिक १७०० ओमायक्रॉन रुग्ण आढळले आहेत. यानंतर अनुक्रमे राजस्थान, दिल्ली, केरळ आणि कर्नाटकाचा क्रमांक आहे.

****

देशात पुन्हा कोरोना विषाणु संसर्ग रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या २४ तासात २ लाख ७१ हजार २०२ हून अधिक बाधित रुग्ण देशभरात आढळले. या २४ तासात ३१४ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर १ लाख ३८ हजार ३३१ रुग्ण या आजारातून बरे झाले.

कोरोना विषाणू संसर्गातून आतापर्यंत देशातले ३ कोटी ५० लाख ८५ हजार ७२१ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर घटला असून सध्या ९४ पूर्णांक ५१ टक्के इतका हा दर आहे. देशात सध्या १५ लाख ५० हजार ३७७ सक्रीय रुग्ण आहेत. तर दैनंदिन संसर्ग दर १६ पूर्णांक २८ टक्के झाला आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आतापर्यंत देशात ७० कोटी २४ लाख ४८ हजार ८३८ कोविड चाचण्या केल्या असून परिषदेनं कालच्या एका दिवसात एकूण १६ लाख ६५ हजार ४०४ नमुन्यांची तपासणी केली आहे.

****

मराठी ग्रंथ प्रकाशक आणि लेखक अरुण जाखडे यांचं निधन झालं आहे. जाखडे यांनी ‘पद्मगंधा’ प्रकाशन सुरु करुन अनेक मान्यवर लेखकांची पुस्तकं प्रकाशित केली आहेत. याशिवाय जगभरातील तत्त्वज्ञान, आणि ललित कथांचे मराठी भाषेतील अनुवाद देखील प्रकाशित केले आहेत. यामध्ये अगाथा खिस्ती यांची ‘हर्क्यूल पायरट मालिका’, पाउलो कोएल्हो यांची ‘द अलकेमिस्ट’ आणि ‘द जहीर’ ही पुस्तकं, टोनी मॉरिसन यांचे ‘बिलव्हड’ हे पुस्तक, जीन पॉल सार्ट्रे यांचे ‘ली मॉट्स’ आणि सिमोन दी ब्यूवॉयर यांचे ‘द सेकंड सेक्स’ या पुस्तकांचा समावेश आहे. त्यांच्या संपादकत्वाखाली ‘पद्मगंधा’ आणि ‘आरोग्य दर्पण’ हे दिवाळी अंक प्रकाशित होत होते.

****

हिंगोली जिल्ह्यातील लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी आता सेवाभावी संस्थाही पुढे सरसावल्या असून दोन महिन्याच्या आत जिल्ह्याचं १०० टक्के लसीकरण झालं पाहिजे असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी इथं उगम ग्रामीण विकास संस्था, उमरा या संस्थेच्या लसीकरण आणि जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन करताना आज ते बोलत होते. घरोघर जाऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांना लसीकरणासाठी घरा बाहेर काढण्याचं काम उगम ग्रामीण विकास संस्था करणार असल्याचं जयाजी पाईकराव यांनी यावेळी सांगितलं.

****

दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद इथून सोलापूरकडे येत असताना स्कार्पिओ जीप झाडाला धडकून झालेल्या अपघातांमध्ये सोलापूरमधील तीन जण जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास  घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृत्यूमुखी पडलेले तिघे लाईट डेकोरेशनच्या कामासाठी औरादला गेले होते. काम संपवून घरी परतत असताना हा अपघात घडला.

****

चंद्रभागा नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये होणारे जलप्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनानं सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांनी दिले आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...