Monday, 17 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 17.01.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 January 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांचं आज कोल्हापूर इथं उपचारादरम्यान निधन झालं, ते ९३ वर्षांचे होते. पाटील हे १९६० ते १९८२ या काळात १८ वर्ष राज्य विधान परिषदेचे सदस्य होते. या दरम्यान दोन वर्ष ते राज्याचे सहकार मंत्री होते. १९८५ ते १९९० दरम्यान ते कोल्हापूरचे आमदार होते. भारत सरकारच्या राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समितीचे सदस्य, मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत. पाटील यांना अनेक सामाजिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. पाटील हे महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीचे अग्रणी नेते होते. शेती, शिक्षण, सामाजिक, राजकीय अशा विविध विषयात त्यांनी लेखन केलं आहे.

****

प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिरजू महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली. बिरजू महाराज यांनी आपलं संपूर्ण आयुष्य नृत्यकलेला समर्पित करताना भारतीय शास्त्रीय नृत्य अधिक लोकाभिमुख केलं, असं सांगून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. बिरजू महाराज यांचं काल दिल्ली इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते.

****

भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला आहे. शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी कणकवली इथल्या सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयानं मनीष दळवीला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १५७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३९ लाख ४६ हजार ३४८ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १५७ कोटी २० लाख ४१ हजार ८२५ मात्रा देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ४४ लाख ४८ हजार १८३ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे. 

दरम्यान, देशात काल नव्या दोन लाख ५८ हजार ८९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ३८५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर काल एक लाख ५१ हजार ७४० रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ५२ लाख ३७ हजार ४६१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, १६ लाख ५६ हजार ३४१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

****

राज्यातल्या शाळा ५० टक्के क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी द्यावी, तसंच आरटीईची थकीत रक्कम तातडीने वितरीत करावी आदी मागण्यांसाठी, महाराष्ट्र इंग्रजी स्कूल असोसिएशन - मेसा संघटनेतर्फे, आज औरंगाबाद इथल्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर, काळे कपडे परिधान करुन डोक्यावर छत्री घेऊन निदर्शनं करण्यात आली. या मागण्यांचं निवेदन शिक्षण विभागाला देण्यात आलं. कोविड साथीमुळे ५० टक्के क्षमतेने उपहारगृह, मॉल, नाट्यगृह, चित्रपटगृहांना परवानगी देण्यात आली आहे. त्याप्रमाणेच ५० टक्के क्षमतेने दिवसाआड किंवा दुबार सत्रात शाळा सुरु करण्याची परवानगी देवून, विद्यार्थ्यांचं होत असलेलं नुकसान टाळावं, २५ जानेवारीपूर्वी शाळा सुरु करण्यास शासनाने परवानगी द्यावी, अन्यथा २७ जानेवारीपासून शाळा सुरु करण्यात येतील असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे.

****

शेतमालावर प्रक्रिया केल्याशिवाय त्यात मूल्याची वृद्धी होणार नाही, हे लक्षात घेता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषिमाल आधारित प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलं आहे. कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत, भोकर तालुक्यातल्या भोसी इथं, शेतकरी उत्पादक कंपनीच्या हळद, मसाले प्रक्रिया उद्योगाला जिल्हाधिकाऱ्यांनी काल भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत, बारड इथले शेतकरी नवनाथ देशमुख यांनी लाभ घेतलेल्या अहिल्यादेवी भाजीपाला रोपवाटिकेचं उद्घाटनही इटनकर यांच्या हस्ते झालं.

****

हिंगोली जिल्ह्यात येत्या दोन महिन्याच्या आत शंभर टक्के लसीकरण झालं पाहिजे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी दिल्या आहेत. कळमनुरी इथल्या उगम ग्रामीण विकास संस्था, उमरा या संस्थेच्या लसीकरण आणि जनजागृती कार्यक्रमाचं उद्घाटन दैने यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. हिंगोली जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी आता सेवाभावी संस्थाही पुढे सरसावल्या असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 16 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...