Monday, 17 January 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 17.01.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 January 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत १५० कोटी मात्रा देण्याचा विक्रम करत देश या मोहिमेत पुढे वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      राज्यात शाळा सुरू करण्याबाबत १५ दिवसांनी आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल- आरोग्य मंत्री राजेश टोपे

·      कोविड १९ प्रतिबंधक देशव्यापी लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण, आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त नागरिकांना लसीची मात्रा

·      राज्यात ओमायक्रॉनचे आठ तर कोविडचे ४१ हजार ३२७ नवे रुग्ण, मराठवाड्यात दोन हजार ५२३ बाधित 

·      हिंगोली जिल्हात कुरुंदा गावात कोविड बाधितांची संख्या वाढल्यामुळे सात दिवटाळेबंदी लावण्याचा प्रशासनाचा निर्णय

·      प्रसिद्ध कत्थक नर्तक पंडित बिरजू महराज यांचं निधन

·      उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे राज्याच्या अनेक भागात थंडीचा कडाका 

·      कवी वीरा राठोड यांच्या ‘हाडेल हप्पी, जादूची झप्पी’ या पुस्तकाला अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा पुरस्कार

आणि

·      भारतीय खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनला पुरुष एकेरीचं, तर सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला पुरुष दुहेरीचं विजेतेपद

****

राज्यात बंद करण्यात आलेल्या शाळा सुरू करण्याबाबत १५ दिवसांनी आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. ते काल जालन्यात बोलत होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं ते म्हणाले. सध्या वाढती रुग्ण संख्या पाहता, राज्यातल्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी कोविड रुग्ण नाहीत तिथे पन्नास टक्के क्षमतेनं शाळा पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी होत आहे. ते म्हणाले,

 

पालकवर्गाचे दोन मतप्रवाह आहे, की बाबा काही मुलांना पाठवा असं म्हणणारे पालक देखील आहेत, काही मुलांच्या काळजीच्या दृष्टीकोनातून शाळा बंद ठेवावी, असं म्हणणारे देखील पालक आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटते एकंदर हॉस्पिटलायझेशन कमी आहे, एकंदर मुलांचं बाधित होण्याचं प्रमाण कमी आहे, भरपूर चर्चा कॅबिनेट मध्ये सुद्धा झाली, आणि या चेर्चेच्या अंती एवठंच ठरलं की आठ ते पंधरा दिवसाचा एक विंडो जो आपण बंद केलेला आहे, तेवढा आपण विंडो ठेऊया, पुन्हा आपण त्याचा पुनर्विचार करुया आणि नंतर माननीय मुख्यमंत्री मोहोदयांच्या विचारांच्या अंती आणि पंधरा दिवसांच्या नंतर होऊ घातलेली जी काही परिस्थिती आहे, त्या अंती पुन्हा शाळा चालू ठेवायच्या की बंद करायच्या यासंदर्भातला योग्य तो निर्णय पुन्हा एकदा विचारांती घेण्यात येईल.

दरम्यान, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टिस असोसिएशन - 'मेस्टा' या संघटनेनं, आजपासून राज्यभरातल्या शाळा सुरु करणार असल्याचं सांगितलं आहे. काल नागपूर इथं या संदर्भात एक बैठक घेण्यात आली, त्यानंतर संघटनेच्या वतीनं, डॉ. निशांत नारनवरे यांनी ही माहिती दिली. पालकांच्या सहमतीनं, कोरोना नियमांचं संपूर्ण पालन तसंच सविनय कायदेभंग करत शाळा सुरू करण्यात येणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. संपूर्ण राज्यात मेस्टा संघटनेच्या १८ हजार शाळा असून, त्यापैकी किमान ५० टक्के शाळा सुरू होण्याची शक्यता नारनवरे यांनी व्यक्त केली.

****

कोविड १९ प्रतिबंधक देशव्यापी लसीकरण मोहिमेला काल एक वर्ष पूर्ण झालं. १६ जानेवारी २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचं उद्घाटन केलं होतं. देशात आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त नागरिकांना कोविड लसीची मात्रा देण्यात आली आहे. यात ६५ कोटी ४८ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.

लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेशी संबंधित सर्वांचं कौतुक केलं आहे. कोविड १९ विरुद्धच्या लढ्याला या मोहिमेतून मोठं बळ मिळालं, अनेकांचे प्राण वाचले, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

राज्यातल्या सुमारे १४ कोटी ३० लाख नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा मिळाली असून, पावणे सहा कोटींहून अधिक जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. राज्याच्या लोकसंख्येचा विचार करता ९० टक्के जणांना लसीची पहिली मात्रा, तर ६५ टक्के नागरिकांना लसीची दुसरी मात्रा मिळाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्यात आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना, कोविड लसीचा बुस्टर डोस द्यायलाही सुरुवात झाली आहे. सुमारे सव्वा तीन लाखांहून अधिक जणांनी याचा लाभ घेतला आहे. १५ ते १८ वयोगटातल्या राज्यातल्या ४२ टक्क्यांहून अधिक, म्हणजे २५ लाखांपेक्षा अधिक मुलामुलींनी,सीची पहिली मात्रा घेतली आहे. तरी ज्या ठिकाणी लसीकरणाचं प्रमाण कमी आहे, तिथे लसीकरण वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

****

राज्यात काल ओमायक्रॉनचे आठ रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण पुणे जिल्ह्यातलेसू, पाच पुणे महापालिका हद्दीतले, तर तीन पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतले आहेत. यामुळे राज्यातल्या ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या एक हजार ७३८ झाली आहे. यापैकी ९३२ रुग्ण संसर्गमुक्त झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४१ हजार ३२७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७२ लाख ११ हजार ८१० झाली आहे. काल २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार आठशे आठ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९६ शतांश टक्के झाला आहे. काल ४० हजार ३८६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६८ लाख ९०० रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ३ दशांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन लाख ६५ हजार ३४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल दोन हजार ५२३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात काल ६५८ रुग्ण आढळले. त्यात महानगरपालिका क्षेत्रातले ५१९, तर ग्रामीण भागातले १३९ रुग्ण आहेत. नांदेड जिल्ह्यात ६४३, लातूर ५४३, उस्मानाबाद १९४, जालना १८५, बीड १२५, परभणी १०१, तर हिंगोली जिल्ह्यात काल ७४ नव्या रुग्णांची नोंद झाली.

****

हिंगोली जिल्हाच्या वसमत तालुक्यातल्या कुरुंदा गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे, जिल्हा प्रशासनाने या गावात सात दिवसांसाठी टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गावात आजपासून सात दिवसांसाठी सर्व व्यापारी आस्थापना, बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नागरीकांनी सूचनेचं पालन करुन सहकार्य करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. त्याचबरोबर मास्कचा वापर करणं, सुरक्षित अंतर ठेवणं, सॅनिटायझरचा वापर करणं, आदी सूचनाही देण्यात आल्या आहेत.

****

प्रसिद्ध कत्थक नर्तक पंडित बिरजू महराज यांचं काल रात्री उशीरा दिल्ली इथं निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते.

पंडित बिरजू महाराज  यांचं मूळ नाव हे ब्रिजमोहन मिश्रा, असं होतं. ते कथ्थक नृत्याच्या  अलाहाबादच्या कालका-बिंदादिन घराण्याचे निपुण नर्तक आहेत. कथक नर्तकांच्या महाराज घराण्याचे ते वंशज आहेत, ज्यात त्यांचे दोन काका  शंभू महाराज  आणि  लच्छू महाराज  आणि त्यांचे वडील आणि गुरु, अचन महाराज यांचा समावेश आहे. नृत्य हे त्याचे पहिले प्रेम असले तरी ते  हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा  अभ्यासक होते. एक गायक म्हणूनही त्यांची ओळख आहे.

वयाच्या १३ व्या वर्षापासून त्यांनी दिल्लीतील संगीत भारती या संस्थेत अध्यापनास सुरुवात केली. भारतीय कला केंद्र, संगीत नाटक अकादमीचे कत्थक केंद्र या ठिकाणी ते शिकवत असत. निवृत्तीनंतर त्यांनी 'कलाश्रम' ही नृत्य नाट्य संस्था सुरु केली.

शतरंज के खिलाडी,  देवदास, उमराव जान,  बाजीराव मस्तानी  इत्यादी चित्रपटात नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आलं आहे.

****

खतांच्या वाढलेल्या किंमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी, केंद्रीय खतं आणि रसायन मंत्री मनसुख मांडविया यांना एका पत्राद्वारे केली आहे. रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातलं लागवड योग्य क्षेत्र वाढल्यानं, खतांची मागणीही वाढली आहे. मात्र अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढवल्यानं, महागडी खतं घेणं शेतकऱ्यांना परवडणारं नाही. याप्रकरणी केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलून, खतांच्या दरांचा ताबडतोब आढावा घ्यावा, आणि खतांच्या दरातील वाढ मागे घेण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करावेत, अशी मागणी भुसे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

****

उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे राज्यात अनेक भागात थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काल परभणीत किमान तापमान १२ पूर्णांक चार, तर औरंगाबादमध्ये १५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. ढगाळ वातावरण आणि शीत लहरींमुळे थंडीचा कडका वाढत आहे.

****

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे २०२०-२१ या वर्षाचे बाल वाङमय पुरस्कार काल जाहीर झाले. बाल कवितेचा पुरस्कार वीरा राठोड यांच्या ‘हाडेल हप्पी, जादूची झप्पी’ या पुस्तकाला, बाल कथा संग्रहाचा पुरस्कार, प्रा. सुहास बारटक्के यांच्या ‘बांधामधला धामण’ या पुस्तकाला, बाल एकांकिकेचा पुरस्कार प्रभाकर शेळके यांच्या, 'कोरोना राक्षस' या पुस्तकाला, बाल कादंबरीचा पुरस्कार नागेश शेवाळकर यांच्या, 'समूदादा' या पुस्तकाला, शैक्षणिक साहित्याचा पुरस्कार डॉ. नीलिमा गुंड यांच्या, 'भाषेची भिंगरी' या पुस्तकाला, तर विज्ञानविषयक पुरस्कार ,डॉ. सुनील विभुते यांच्या 'अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा' या पुस्तकाला जाहीर झाला आहे. मुलांनी लिहिलेल्या साहित्याचा पुरस्कार मुग्धा घेवरीकर हिच्या ‘मुग्धाच्या कविता’ या पुस्तकाला, तसंच पीयुष गांगुर्डे याच्या ‘काळजातली माया’ पुस्तकाला जाहीर झाला आहे.

****

छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल त्यांना अभिवादन केलं. छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचं रक्षण करत स्वराज्यविस्तार केला. युध्दनिपुण, प्रकांड पंडित छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाला आणि शौर्याला आपण मानाचा मुजरा करतो, तसंच राज्यातल्या जनतेला या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो, असंही पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांचं काल पहाटे पुण्यात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. बालवामय, विज्ञान, इतिहास आदी विषयांवर त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. जाखडे यांनी ‘पद्मगंधा’ प्रकाशनाच्या माध्यमातून, अनेक मान्यवर लेखकांची पुस्तकं प्रकाशित केली. याशिवाय जगभरातलं तत्त्वज्ञान, आणि ललित कथांचे मराठी भाषेत अनुवादही प्रकाशित केले. त्यांच्या संपादनात ‘पद्मगंधा’ आणि ‘आरोग्य दर्पण’ हे दिवाळी अंक प्रकाशित हो. जाखडे यांना विविध साहित्य संस्थाचे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.

****

भारतीय खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेननं पुरुष एकेरीचं, तर सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात लक्ष्य सेननं जगज्जेता लोह कीन यू याचा, २४-२२, २१-१७ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने, अव्वल मानांकित मोहम्मद एहसान आणि हेण्ड्रा सेतियावान या इंडोनेशियाच्या जोडीचा, २१-१६, २६-२४ असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 17 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...