आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१७ जानेवारी २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
प्रसिद्ध कथ्थक
नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं काल दिल्ली इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं,
ते ८३ वर्षांचे होते. लखनऊ घराण्यातले बिरजू महाराज यांचं खरं नाव ब्रिजमोहन मिश्रा
होतं. त्यांचा जन्म चार फेब्रुवारी १९३८ रोजी लखनऊ इथं झाला होता. ते हिंदुस्थानी शास्त्रीय
संगीताचे देखील अभ्यासक होते. वयाच्या १३ व्या वर्षापासून त्यांनी दिल्लीतल्या संगीत
भारती या संस्थेत अध्यापनास सुरुवात केली. निवृत्तीनंतर त्यांनी ‘कलाश्रम’ ही नृत्य
नाट्य संस्था सुरु केली. शतरंज के खिलाडी, देवदास, उमराव जान, बाजीराव मस्तानी इत्यादी
चित्रपटात त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. बिरजू महाराज यांना संगीत नाटक अकादमीसह,
१९८३ मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
पंडित बिरजू
महाराज यांच्या निधनानं कला क्षेत्राची खूप मोठी हानी झाली असल्याची भावना व्यक्त करत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.
****
अर्थसंकल्पपूर्व
चर्चेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल भाजपच्या विविध राज्यातल्या
पदाधिकाऱ्यांच्या अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या. या चर्चेत उद्योग,
व्यावसायिक, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ज्ञ सहभागी झाले होते. यामध्ये आदिवासी आणि मागासवर्गीय
तसंच महिलांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. या चर्चेत २५ राज्यांचे प्रतिनिधी सहभागी
झाले होते, असं भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गोपाल कृष्ण अग्रवाल यांनी सांगितलं.
****
नांदेड-संत्रागछी-नांदेड
एक्स्प्रेसच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. बिलासपूर विभागात रेल्वे उड्डाण
पुलाचं काम सुरू असल्यामुळे नांदेडहून सुटणारी ही गाडी आज तसंच येत्या २४ तारखेला धावणार
नाही. परतीच्या प्रवासात ही गाडी १९ तसंच २६ जानेवारीला धावणार नसल्याचं, दक्षिणमध्य
रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
****
राजस्थानमधल्या
उदयपूर इथं झालेल्या ‘ज्युनियर नॅशनल पॉवरलिफ्टींग’ स्पर्धेत मुंबईच्या समृद्धी देवळेकर
हीनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत समृध्दीनं तीन सुवर्ण
पदकं आणि एक रौप्य पदक जिंकलं आहे.
****
No comments:
Post a Comment