Friday, 2 September 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.09.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 September 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ सप्टेंबर २०२२ दुपारी १.०० वा.

****

आयएनएस विक्रांत हे भारतीय सामर्थ्याचं प्रतीक आणि प्रत्येक भारतीयासाठी स्वाभिमान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशातल्या पहिल्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या आय एन एस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचं आज कोची इथल्या गोदीमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते जलावतरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. हे लोकार्पण म्हणजे संरक्षण मंत्रालयाचं आत्मनिर्भरतेच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी नमूद केलं. विमानवाहू युद्धनौका तयार करणार्या देशांमध्ये आता भारताचा देखील समावेश झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. या स्वदेशी युद्धनौकेची बांधणी भारतीय नौदलाच्या डिझाईन विभागाने केली असून, त्याची निर्मिती कोचीन शिपयार्ड लिमिटेड या भारतीय कंपनीनं केली आहे.

ही युद्धनौका अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आणि सुविधांनी युक्त असून, भारतीय नौदलाच्या इतिहासातील सर्वात मोठी युद्धनौका आहे. यामुळे भारतीय नौदलात आता दोन विमानवाहू युद्धनौका कार्यरत राहणार असून, यामुळे भारताची सागरी सुरक्षा अधिक मजबूत होण्यासाठी बल मिळणार आहे.

भारतीय नौदलाचा समृद्ध वारसा लक्षात घेऊन संपूर्णपणे नव्याने बनवण्यात आलेल्या नौदलाच्या नवीन बोधचिन्ह आणि ध्वजाचं अनावरणही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. हा ध्वज पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला आहे. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी, शिवाजी महाराज आणि त्यांच्या आरमार दलाचा उल्लेख केला. भारतीनं आज गुलामगिरीची निशाणी उतरवली, असं पंतप्रधान म्हणाले. 

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २२ लाख ४० हजार १६२ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २१२ कोटी ७५ लाख २३ हजार ४२१ मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या सहा हजार १६८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर नऊ हजार ६८५ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ५९ हजार २१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.

****

बाऴासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण पीरवर्तन प्रकल्पांगर्गत राज्यभरातल्या बाजार समित्यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयानं जारी केली आहे. राज्यातल्या ३०५ कृषी उत्पन्न बाजार समित्यापैंकी नाशिक जिल्ह्यातली लासलगाव बाजार समिती अव्वल ठरली, तर वर्धा जिल्ह्यातली हिंगणघाट आणि वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा यांनी अनुक्रमे दुसरं आणि तिसरं स्थान पटकावलं आहे. 

****

ठाण्यात जमिनीचा झोन दाखला देण्यासाठी २४ हजार रुपयांची लाच घेताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण -एम एम आर डी ए चा उपनियोजक शिवराज पवार याला, काल रंगेहाथ अटक करण्यात आली. तक्रारदारांच्या परिचयाच्या दोन व्यक्तींच्या जमिनीचा झोन दाखला देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांचे केवायसी संकलित करून त्यांचं नूतनीकरण करण्याच्या मोहिमेत नाशिक जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यात केवायसी नूतनीकरणाचं ७६ टक्के काम पूर्ण झालं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, गोदावरी नदीला पूर आला आहे. रामकुंड परिसरात अडकलेल्या चार जणांना महापालिकेच्या जीवरक्षक पथकानं बाहेर काढलं.

सिन्नर तालुक्यात काल रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. निफाड तालुक्यातल्या सायखेडा इथं वीटभट्ट्या पाण्याखाली गेल्या, तर इगतपुरी तालुक्यात पाझर तलाव फुटला आहे. नांदगाव तालुक्यातल्या एका शेतकऱ्याच्या शेतात वीज कोसळल्यानं त्याच्या घोड्याचा मृत्यू झाला. मालेगाव, बागलाण, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर इथंही जोरदार पाऊस झाला.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे, पाण्याची आवक सतत वाढत आहे. त्यामुळे पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी अकरा वाजता धरणाचे १८ दरवाजे अडीच फुटावरुन तीन फुटावर स्थिर करण्यात आले असून, ५६ हजार ५९२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक सातत्यानं वाढत असल्यानं पाटबंधारे विभागानं नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

****

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या एच एस प्रणॉयचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आज झालेल्या उपान्त्य पूर्व फेरीच्या सामन्यात प्रणॉयला तैवानच्या काउ तिएन छेनकडून १७-२१, २१-१५, २०-२२ असा पराभव पत्करावा लागला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...