Friday, 2 September 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.09.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  02 September  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ सप्टेंबर २०२२   सायंकाळी ६.१०

****

·      आयएनएस विक्रांत ही युद्धनौका आत्मनिर्भर भारताचं प्रतिबिंब-पंतप्रधानांचं प्रतिपादन; नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवरायांना समर्पित.

·      कोविड प्रतिबंधक लसीकरणानंतर झालेल्या मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची सीरम इन्स्टिट्यूट तसंच राज्य सरकारला नोटीस.

·      शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ रद्द करुन कोरडवाहू शेतकऱ्यांना आमदारकीची संधी द्यावी - आमदार प्रशांत बंब यांची मागणी.

आणि

·      पैठणच्या जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे चार फूट उघडले; ७५ हजार ४५६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू.

****

आयएनएस विक्रांत ही युद्धनौका आत्मनिर्भर भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या पहिल्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचं आज पंतप्रधानांच्या हस्ते केरळमध्ये कोची इथल्या बंदरात जलावतरण झालं, त्यावेळी ते बोलत होते. विमानवाहू युद्धनौका तयार करणाऱ्या देशांमध्ये आता भारताचा देखील समावेश झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. नौदलात महिलांच्या भरतीबाबत असलेल्या मर्यादा हटवल्या जात असून, अनेक महिला सैनिकही देशाच्या सुरक्षेत तैनात होतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

पारतंत्र्याच्या खुणा असलेला नौदलाचा ध्वजही पंतप्रधानांच्या हस्ते बदलण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरित चिन्हात नौदलाचं घोषवाक्य ‘शं नो वरुण:’ तसंच बोधचिन्ह असलेल्या ध्वजाचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण केलं, महाराजांनी उभारलेल्या आरमाराचा गौरवपूर्ण उल्लेख करत नौदलाचा हा नवा ध्वज पंतप्रधानांनी शिवरायांना अर्पण केला. ते म्हणाले –

 

अब तक भारतीय नौ सेना के ध्वज पर गुलामी की पहचान बनी हुई थी। लेकिन अब आज से छत्रपती शिवाजी महाराज से प्रेरीत नौ सेना का नया ध्वज समंदर और आसमान मे लहरायेगा। आज इसी ध्वज वंदना के साथ, मै ये नया ध्वज नौ सेना के जनक छत्रपती वीर शिवाजी महाराज को समर्पित करता हूं।

 

संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचं जलावतरण, हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय नौदलाचं अभिनंदन केलं आहे. हा क्षण भारतीय संरक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक आणि स्वर्णीम क्षण असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने सागरी सुरक्षा आणि नौदलाची प्रथम निर्मिती केली होती. त्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण आणि शिवकार्याचा यथार्थ गौरव पंतप्रधानांनी केला, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

कोविड प्रतिबंधक लसीकरणानंतर झालेल्या मृत्यू प्रकरणी सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला, बिल गेटस् आणि राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे. कोविशील्डची लस पूर्णपणे सुरक्षित असून त्याचा काही दुष्परिणाम होत नाही, म्हणून डॉ. स्नेहल लुणावत या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीनं मागील वर्षी २८ जानेवारीला कॉलेजमध्ये कोविशिल्ड लस घेतली, त्यानंतर लगेचच १ मार्चला या तरुणीचा मृत्यू झाला होता. या तरुणीचे वडील दिलीप लुणावत यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि लस उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूटच्या चुकीमुळे आपल्या मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. लुणावत यांनी नुकसानभरपाई म्हणून सिरम कंपनीवर एक हजार कोटी रुपयांचा दावा केला आहे. यासोबतच त्यांनी गुगल, युट्यूब, मेटा सारख्या कंपन्यांनी लसीमुळे होणाऱ्या मृत्यूंचे आकडे लपवून ठेवल्याच सांगत त्यांच्या विरुध्दही केंद्राने कारवाई करावी अशी मागणी याचिकेत केली आहे.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.

****

राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ रद्द करुन त्याऐवजी कोरडवाहू शेतकऱ्यांना आमदारकीसाठी संधी देण्यात यावी असं मत औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केलं आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्हा परिषदेचे शिक्षक नियुक्ती असलेल्या गावात राहत नाहीत या संदर्भात बोलतांना, आमदार हे शिक्षकांना पाठीशी घालत असून यामुळं देशाच्या भावी पिढीचं नुकसान होण्याची भीती आमदार बंब यांनी व्यक्त केली. शिक्षकांच्या घरभाड्यापोटी तीस हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला असून तो वसूल करण्यात यावा, अशी मागणी आमदार बंब यांनी केली. प्रत्यक्ष नियुक्तीच्या ठिकाणी राहणाऱ्या शिक्षकांचा येत्या शिक्षक दिनी त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणीच सत्कार करण्यात येणार असल्याचं आमदार प्रशांत बंब यांनी यावेळी सांगितलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात सिंदफळ या गावी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली आहे. चाकणकर यांनी संबंधित पीडिता आणि तिच्या नातेवाईकांची आज उस्मानाबाद इथं जिल्हा शासकीय रुग्णालयात भेट घेतली, त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. या घटनेतलं आरोपपत्र पंधरा दिवसात दाखल करून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी राज्य महिला आयोगाने शिफारस केली असल्याचं चाकणकर यांनी सांगितलं.

****

सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे पालक गमावलेल्या ३ ते १८ वर्षे वयोगटातील बालकांना शैक्षणिक खर्चासाठी दहा हजार रूपये देण्यात येणार आहेत. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी डॉ.विजय खोमणे यांनी केलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात आणखी वाढ करण्यात आली आहे. धरणाचे अठरा दरवाजे साडे तीन फुटावरुन चार फुटावर स्थिर करण्यात आले असून, धरणातून सध्या ७५ हजार ४५६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडलं जात आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागानं दिला आहे.

****

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, गोदावरी नदीला पूर आला आहे. रामकुंड परिसरात अडकलेल्या चार जणांना महापालिकेच्या जीवरक्षक पथकानं बाहेर काढलं. जिल्ह्यात सिन्नर तालुक्यात काल रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं जनजीनव विस्कळीत झालं आहे. इगतपुरी तालुक्यात पाझर तलाव फुटला आहे. मालेगाव, बागलाण, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर इथंही जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या एच एस प्रणॉयचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आज झालेल्या उपान्त्य पूर्व फेरीच्या सामन्यात प्रणॉयला तैवानच्या काउ तिएन छेनकडून १७-२१, २१-१५, २०-२२ असा पराभव पत्करावा लागला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...