Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 September 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ सप्टेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
· पत्राचाळ प्रकरणी चौकशी करण्याचं
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचं राज्य सरकारला आव्हान.
· केंद्र सरकारच्या धर्तीवर
राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.
· राष्ट्रीय पोषण माह अभियानात
औरंगाबाद जिल्ह्यात स्वस्थ बालक स्पर्धा.
आणि
· जुन्या निवृत्ती योजनेसाठी
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचं आंदोलन.
****
पत्राचाळ
प्रकरणात चौकशी करण्याचं आव्हान माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी राज्य सरकारला दिलं
आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी काल या प्रकरणात पवार यांची चौकशी करण्याची मागणी
केली होती, त्या पार्श्वभूमीवर पवार आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रकरणी
चौकशीला आम्ही तयार आहोत. लवकरात लवकर ही चौकशी करावी, मात्र आपल्यावर झालेले आरोप
हे वास्तव आणि सत्याला धरुन नसल्याचं चौकशीअंती सिद्ध झालं, तर आरोप करणाऱ्यांच्या
विरोधात काय भूमिका घेणार, हे राज्य सरकारने जाहीर करावं, असं आव्हानही शरद पवार यांनी
दिलं. संबंधित बैठक ज्यावेळी झाली, त्या बैठकीचं इतिवृत्त पवार यांनी माध्यमांसमोर
मांडलं. तपास संस्था न्यायालयात काय मांडते आणि राज्यसरकारची त्यावेळी जी चर्चा झाली
त्याची टिप्पणी काय आहे, हे यावरून स्पष्ट होईल, असं पवार म्हणाले.
****
केंद्र
सरकारच्या धर्तीवर राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं
घेतला आहे. या निर्णयामुळे शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज तसंच कर्ज हमी या बाबतीतल्या
सार्वजनिक हिताचं रक्षण होईल. सध्या राज्य शासन विविध संस्थांना जमीन, भागभांडवल, अनुदान,
कर्ज हमी देते. त्यांच्या मालमत्ता वेगवेगळ्या कारणास्तव संकटात सापडल्या तर त्यांच्या
पुनर्निर्माणात शासनाची भूमिका मर्यादित असल्यानं, शासनाचं नुकसान होतं. राज्य मालमत्ता
पुनर्रचना कंपनी स्थापन झाल्यास अशा आजारी किंवा पारदर्शक कारभार न करणाऱ्या संस्थांचं
पुनर्निर्माण शक्य होणार आहे.
भारतरत्न
लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम येत्या
२८ सप्टेंबरपासून सुरु करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यानुसार
एक वर्ष कालावधीचे सहा अभ्यासक्रम तात्पुरत्या काळासाठी पु. ल. देशपांडे अकादमीमध्ये
सुरू केले जाणार आहेत. त्यामध्ये एकूण १५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील.
लातूर
जिल्ह्यातील औसा इथं दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर न्यायालय स्थापन करून पद निर्मिती
करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यासाठी ७ पदं नव्याने निर्माण करण्यात येतील
तर १५ पदं औसा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्याकडून हस्तांतरीत होतील. यासाठी सुमारे
६५ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.
सफाई
कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमणं,
बार्शी इथल्या लक्ष्मी सोपान अॅग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कंपनी या खासगी बाजार
समितीचा कांदा अनुदान योजनेत समावेश, राज्यातील वर्ग ३ मधील लिपिकांची सर्व रिक्त पदं
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणं, आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची चर्चा तसंच
निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना, आदी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत
घेण्यात आले.
७५
हजार पोलीसांची भरती करण्याबाबत शासनाने घोषणा केली आहे. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण
व्हावी, तसंच पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
कोविड
लसीकरणामध्ये देशात महाराष्ट्र सर्वप्रथम असावा यादृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभागाने
प्रयत्न करावेत असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आतापर्यंत राज्यभरात
एकूण १७ कोटी ६४ लाख ४७ हजार ८०० लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
****
उच्च
कार्यक्षमतेच्या सौर पीव्ही मॉड्यूल आधारित उत्पादनांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनेला
केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह
ठाकूर यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती
दिली. सौर ऊर्जेची निर्मिती गीगावॅट मध्ये व्हावी, यासाठी ही योजना राबवली जाणार आहे.
यासाठी १९ हजार पाचशे कोटी रुपये खर्च होणार आहेत. वार्षिक ६५ हजार मेगावॅट अर्थात
६५ गीगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी, सुमारे ९४ हजार कोटी रुपयांची
गुंतवणूक होईल, असं ठाकूर यांनी सांगितलं.
****
प्रसिद्ध
विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. राजू श्रीवास्तव
यांचं आज दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं, ते ५८ वर्षांचे होते. हृदयविकाराचा
झटका आल्यानंतर गेल्या सुमारे दीड महिन्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु
होते.
****
मुंबईत
न्हावाशेवा बंदराजवळ २२ टन अंमली पदार्थ हेरॉईन आज जप्त करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय
बाजारपेठेत याची किंमत एक हजार ७२५ कोटी रुपये असल्याचं दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त
एच. जी. एस. धालीवाल यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांच्या
आत्महत्या, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, अतिवृष्टीच्या मुद्यावर विधान परिषदेचे
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांना आज निवदेन देण्यात आलं. राज्यात कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न,
सत्ताधारीच हातात कायदा घेतात अशी टीका विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यावेळी
माध्यमांशी बोलताना केली.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाडीकेंद्रांमध्ये एक सप्टेंबरपासून पोषण माह अभियान राबवण्यात
येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून आज आणि उद्या सर्व जिल्ह्यांमध्ये स्वस्थ बालक
स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. याविषयी माहिती देत आहेत महिला आणि बाल कल्याण विभागाचे
उप-मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रसाद मिरकले –
पोषण माहचाच एक भाग म्हणून
२१ आणि २२ तारखेला सर्व जिल्ह्यामध्ये स्वस्थ बालक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
अंगणवाडी केंद्रातील नोंदीत आणि अनोंदीत लाभार्थ्यांची वजन आणि उंची घेऊन त्यांच्यासाठी
स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. स्थानिक पातळीवरती, गाव पातळीवरती सर्व नागरिकांचा
सहभाग घेऊन ही स्पर्धा आणि हा उपक्रम चांगल्या पद्धतीनं आयोजित करण्यात आलेला आहे.
त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं आहार प्रात्यक्षिकाची काही असेल, मुलांसाठी काही स्पर्धा
असेल त्या मुलांसाठी स्पर्धादेखील पोषणविषयक काही संकल्पना आहेत त्या रुजाव्यात यादृष्टीनं
वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
कृषी
विज्ञान केंद्रामार्फत देखिल औरंगाबाद मधील अंगणवाडी केंद्रांना पोषण किट आणि बियांच्या
किटचं वाटप करण्यात आलं असल्याची माहितीही प्रसाद मिरकले यांनी दिली आहे.
****
जुनी
सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती
संघटनेच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं.
सोलापूर
इथं हुतात्मा चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या परिसरात मोटार सायकल फेरी काढण्यात
आली. या आंदोलनात विविध प्रकारच्या ७० संघटनाचे तीन हजार कर्मचारी सहभागी झाले. यावेळी
शासकीय कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांना विविध
मागण्यांचे निवेदन सादर केलं.
औरंगाबाद
इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर वाहन रॅली काढण्यात आली. शहरातल्या भडकल गेट इथून या
रॅलीला सुरुवात होवून जिल्हाधिकारी कार्यालय इथं ही रॅली विसर्जित करण्यात आली. राज्य
शासनाच्या सेवेत २००५ नंतर जे कर्मचारी रुजू झाले आहेत त्यांना जुनी पेन्शन लागू करावी
या प्रमुख मागणीचे निवेदन यावेळी प्रशासनाला सादर करण्यात आलं.
****
शिवसेनेतून
शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी
आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी आज औरंगाबाद इथं रामदास कदम यांच्या छायाचित्राला
जोडे मारा आंदोलन करण्यात आलं. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी कदम यांच्या विरोधात जोरदार
घोषणाबाजी करत त्यांच्या छायाचित्राचं दहन केलं.
****
No comments:
Post a Comment