Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
: 22 September 2022
Time
07.10 AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· जालन्यात साडेचारशे कोटी रुपयांचं मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी
नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणामध्ये सामंजस्य
करार
· केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करण्याचा राज्य
मंत्रिमंडळाचा निर्णय
· औसा इथं दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी
· पोलिसांच्या नैमित्तिक रजांच्या संख्येत वाढ
· मराठा समाजातल्या एक हजार ६४ उमेदवारांना विविध विभागात नियुक्ती देण्याचा शासन
निर्णय जारी
· मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आपली चौकशी करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार यांचं सरकारला आव्हान
· मुंबई महापालिकेची निवडणूक महिनाभरात आणि त्याच वेळी विधानसभेची निवडणूक घेऊन
दाखवा- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
· शिवसेना ही प्रायवेट लिमिटेड कंपनी नसून, बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारा पक्ष
असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर
आणि
· इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघासोबतच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा
८८ धावांनी विजय
****
सविस्तर बातम्या
जालना इथं मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क उभारण्यासाठी नॅशनल हायवेज लॉजिस्टिक
मॅनेजमेंट लिमिटेड आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण यांच्यामध्ये सामंजस्य करार
करण्यात आला. या प्रकल्पामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाची गती वाढेल, असा विश्वास,
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. दिल्लीत काल या सामंजस्य
करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. या प्रकल्पाची
किंमत साडे चारशे कोटी रूपये असून, या प्रकल्पामुळे जालना आणि औरंगाबादसह मराठवाड्यातले
सर्व जिल्हे, तसंच बुलडाणा भागातल्या व्यापार उद्योग मालाची वाहतूक वेगवान आणि कमी
खर्चात होईल, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल,
असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, रेल्वे
राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करण्याचा निर्णय,
राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. या निर्णयामुळे
शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज तसंच कर्ज हमी याबाबतीतल्या सार्वजनिक हिताचं रक्षण
होईल. सध्या राज्य शासन विविध संस्थांना जमीन, भागभांडवल, अनुदान, कर्ज हमी देतं, त्यांच्या
मालमत्ता वेगवेगळ्या कारणास्तव संकटात सापडल्या तर त्यांच्या पुनर्निर्माणात शासनाची
भूमिका मर्यादित असल्यानं, शासनाचं नुकसान होतं. राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन
झाल्यास, अशा आजारी किंवा पारदर्शक कारभार न करणाऱ्या संस्थांचं पुनर्निर्माण शक्य
होणार आहे.
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचा प्रमाणपत्र
अभ्यासक्रम, येत्या २८ सप्टेंबरपासून सुरु करण्यास, राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या
बैठकीत मान्यता देण्यात आली. यानुसार एक वर्ष कालावधीचे सहा अभ्यासक्रम तात्पुरत्या
काळासाठी पु. ल. देशपांडे अकादमीमध्ये सुरू केले जाणार आहेत.
लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन
करून पद निर्मिती करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. यासाठी सात पदं नव्यानं
निर्माण करण्यात येतील, तर १५ पदं औसा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्याकडून हस्तांतरीत
होतील.
सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ
उपसमिती नेमणं, बार्शी इथल्या लक्ष्मी सोपान अॅग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग कंपनी
या खासगी बाजार समितीचा कांदा अनुदान योजनेत समावेश, राज्यातल्या वर्ग तीन मधल्या लिपिकांची
सर्व रिक्त पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणं, आपत्ती निवारणाच्या विविध प्रकरणांची
चर्चा तसंच निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना, आदी निर्णय मंत्रिमंडळ
बैठकीत घेण्यात आले.
राज्यातले पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा १२ वरुन २०
करण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पोलिसांवरील कामाचा वाढता ताण,
विविध सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने बंदोबस्त, व्हीआयपी ड्युट्या यामुळे या नैमित्तिक
रजा वाढवण्यात आल्या आहेत. याचबरोबर ७५ हजार पोलीसांची भरती करण्याबाबत शासनानं घोषणा
केली आहे. ही प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी, तसंच पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
****
मराठा समाजातल्या एक हजार ६४ उमेदवारांना शासनाच्या विविध विभागात नियुक्ती
देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात
आला. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे शासकीय सेवेत निवड होऊनही
गेल्या दोन वर्षापासून हे उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते.
****
मुंबईतील गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्याचं आव्हान माजी मुख्यमंत्री
शरद पवार यांनी राज्य सरकारला दिलं आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी काल या प्रकरणात
पवार यांची चौकशी करण्याची मागणी केली होती, त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या
प्रकरणी चौकशीला आम्ही तयार आहोत. लवकरात लवकर ही चौकशी करावी, मात्र आपल्यावर झालेले
आरोप हे वास्तव आणि सत्याला धरुन नसल्याचं चौकशीअंती सिद्ध झालं, तर आरोप करणाऱ्यांच्या
विरोधात काय भूमिका घेणार, हे राज्यसरकारने जाहीर करावं, असं ते म्हणाले.
****
मुंबई महापालिकेची निवडणूक महिन्याभरात आणि त्याच वेळी विधानसभेची निवडणूक घेऊन
दाखवा, असं आव्हान, माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, भाजप
नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिलं आहे. ते काल मुंबईत गोरेगाव इथं,
शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते. शिवसेना सोडून भाजपच्या सोबत सत्ता स्थापन करण्यासाठी
गेलेल्या आमदारांवर त्यांनी कडाडून टीका केली. कोविड काळासह मुंबईसाठी केलेल्या कामांचा
उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्याची जबाबदारी शिवसैनिकांवर
सोपवत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. दसरा मेळावा घेण्याचा निर्धारही ठाकरे यांनी बोलून
दाखवला. शिवसेनेच्या विविध राज्यप्रमुखांनी यावेळी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जोरदार
शक्तिप्रदर्शन केलं.
****
शिवसेना ही प्रायवेट लिमिटेड कंपनी नसून, बाळासाहेबांच्या विचार पुढे नेणारा
पक्ष असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल महाराष्ट्र
सदनात शिवसेनेच्या देशभरातल्या राज्यप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांचा
राजस्थानी साफा घालून तसंच महाराणा प्रताप यांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही सत्तेच्या लोभाने तत्त्वाशी तडजोड केली नाही, आम्ही बाळासाहेब
ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांची विचारधारा जपणारे कार्यकर्ते असल्याचं शिंदे म्हणाले.
शिवसैनिकांना, आमदारांना ज्यांनी मदत करायला हवी होती, त्यांनी केली नाही. मुख्यमंत्री
शिवसेनेचा असूनही शिवसैनिकांवर अन्याय होत होता, त्यामुळे उठाव करावा लागला, असं ते
म्हणाले. कोणी कितीही टीका केली, तरी जनता आणि मतदार हे सर्वज्ञ असल्याचं, मुख्यमंत्री
शिंदे यांनी नमूद केलं.
****
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादीत करणाऱ्या खेळाडूंना राज्य
शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षीसांच्या रकमेत पाचपट वाढ करण्यात आल्याचं, मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - २०२२ मध्ये सहभागी
होणाऱ्या खेळाडूंना काल मुंबईत मंत्रालयात ध्वज प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत
होते. १७ वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धा - २०२२ च्या यजमान शहराच्या
बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ६४० रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख १७ हजार २४ झाली आहे. काल या संसर्गानं पाच रुग्णांचा
मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक
लाख ४८ हजार ३१९ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल ८०१
रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ६४ हजार ६५५ रुग्ण या संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या
चार हजार ५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ५२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
१९, औरंगाबाद १५, लातूर १४ जालना, हिंगोली, परभणी, आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी
एका रुग्णाचा समावेश आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये एक सप्टेंबरपासून पोषण
माह अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून काल आणि आज सर्व जिल्ह्यांमध्ये
स्वस्थ बालक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. याविषयी माहिती देत आहेत महिला आणि बाल
कल्याण विभागाचे उप - मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रसाद मिरकले…
Byte..
पोषण माहचाच एक भाग म्हणून २१ आणि २२ तारखेला सर्व जिल्ह्यामध्ये स्वस्थ बालक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. अंगणवाडी केंद्रातील नोंदीत आणि अनोंदीत लाभार्थ्यांची वजन आणि उंची घेऊन त्यांच्यासाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. स्थानिक पातळीवरती, गाव पातळीवरती सर्व नागरिकांचा सहभाग घेऊन ही स्पर्धा आणि हा उपक्रम चांगल्या पद्धतीनं आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं आहार प्रात्यक्षिकाची काही असेल, मुलांसाठी काही स्पर्धा असेल त्या मुलांसाठी स्पर्धादेखील पोषणविषयक काही संकल्पना आहेत त्या रुजाव्यात यादृष्टीनं वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
कृषी विज्ञान केंद्रामार्फत देखिल औरंगाबाद मधल्या अंगणवाडी केंद्रांना पोषण
संच आणि बियांच्या किटचं वाटप करण्यात आलं असल्याची माहितीही मिरकले यांनी दिली.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सध्या सरकार टिकवणं हेच एकमेव काम असल्याची टिका,
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. ते काल उस्मानाबाद
इथं वार्ताहरांशी बोलत होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आरोप करुन त्यांना बदनाम
करण्याचं काम भाजप करत असल्याचं ते म्हणाले. आपण जलसंपदा मंत्री असताना उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या दोन्ही उपसा सिंचन योजनांना गती दिली असून, विनाअडथळा या दोन्ही योजना
पूर्ण होतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
****
जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी
मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. सोलापूर इथं हुतात्मा चौक ते डॉ
बाबासाहेब आंबेडकर चौक या परिसरात मोटार सायकल फेरी काढण्यात आली. या आंदोलनात विविध
प्रकारच्या ७० संघटनाचे तीन हजार कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी शासकीय कर्मचारी
संघटनेच्या प्रतिनिधींनी उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांना विविध मागण्यांचं निवेदन
सादर केलं.
औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर वाहन रॅली काढण्यात आली. शहरातल्या भडकल
गेट इथून या रॅलीला सुरुवात झाली होती. राज्य शासनाच्या सेवेत २००५ नंतर जे कर्मचारी
रुजू झाले आहेत त्यांना जुनी पेन्शन लागू करावी या प्रमुख मागणीचं निवेदन यावेळी प्रशासनाला
सादर करण्यात आलं.
लातूर इथंही कमर्मचारी संघटनांच्या वतीनं वाहन रॅली काढण्यात आली.
****
भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात कँटबेरी इथं सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय
सामन्यात भारतानं ८८ धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच तीन सामन्यांच्या मालिकेत
भारतीय महिला संघानं दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. काल झालेल्या सामन्यात
प्रथम फलंदाजी करत भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी ३३४ धावांचं आव्हान ठेवलं. कर्णधार
हरमनप्रीत कौरनं ११५ चेंडुत १४३ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला इंग्लंडचा संघ
४४व्या षटकात २४५ धावांवर सर्वबाद झाला.
****
शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख उद्धव
ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काल औरंगाबाद इथं कदम यांच्या
छायाचित्राला जोडे मारा आंदोलन करण्यात आलं. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी कदम यांच्या
विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या छायाचित्राचं दहन केलं.
****
नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या बारड इथं खड्डे चुकवताना चालकाचा ताबा
सुटल्यानं टेम्पो उलटून झालेल्या भीषण अपघातात तीन भाजीपाला विक्रेत्यांचा मृत्यू झाला,
तर १२ जण जखमी झाले. काल सकाळी हा अपघात झाला.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर इथला नारंगी - सारंगी धरणात सध्या ९६ टक्के पाणीसाठा
असून पाण्याची आवक सतत सुरुच असल्यानं कुठल्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे
नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा पाटबंधारे विभागानं दिला आहे.
****
No comments:
Post a Comment