Monday, 24 October 2022

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २४ ऑक्टोबर २०२२ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ ऑक्टोबर २०२२ सकाळी ११.०० वाजता

****

दीपोत्सावाच्या मंगल पर्वातला आजचा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा सण सर्वत्र चैतन्यमय वातावरणात साजरा होत आहे. अभ्यंगस्नान, रांगोळ्या, रोषणाई, फराळ याबरोबरच आता दिवाळी पहाट सारखे सांस्कृतिक कार्यक्रमही दिवाळीचं विशेष वैशिष्ट्य ठरत आहेत. संध्याकाळी घरोघरी, व्यापारी पेठांमध्ये पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मी पूजन केलं जाईल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरीकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी हा पवित्र सण अंधारातून प्रकाश आणि तेजाकडे जाण्याचा संदेश देतो, यानिमित्ताने हे पर्व आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदाने साजरं करा, असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान आज कारगिल इथं सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. ते कारगिलला पोहोचले असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं सांगितलं.

****

अमरावती नजिक टीमटाला ते मालखेड रेल्वे मार्गावर मालगाडीचे २० डब्बे रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. काल रात्री ही घटना घडली. या अपघातामुळे नागपूर आणि मुंबईला जाणारी वाहतूक नरखेड मार्गे वळवण्यात आली आहे. तर या रेल्वे मार्गावरील सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

****

नाशिक जिल्ह्यात शंभर गावांमध्ये बालविवाहमुक्त अभियान राबवण्यात आलं. दिल्लीच्या कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशनची सहयोगी मदन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आणि नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचं समाज कार्य महाविद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमानं हे अभियान राबवण्यात आलं. रॅलीच्या माध्यमातून यावेळी बालविवाह प्रतिबंधाचा संदेश देण्यात आला.

****

लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातल्या वलांडी इथं काल पहाटे गुढ आवाजासह जमिन हादरली. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. हे भूकंपाचे अतिसोम्य धक्के असल्याचं तहसिल प्रशासनानं सांगितलं.

****

भारताच्या मनू भाकर, रिदम सांगवान आणि अभिज्ञा पाटील यांचा समावेश असलेल्या २५ मीटर महिला पिस्तुल संघानं कैरो इथं झालेल्या आय एस एस एफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा चीनकडून शून्य - १६ असा पराभव झाला.

****

 

 

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...