Monday, 24 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा.

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 October 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

नवभारताची संकल्पना फक्त देशासाठी नाही तर बलिदान, प्रेम, सदाचार, प्रतिभा, साहस, हिंमत आणि शांततेचं एकत्रीकरण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज कारगिल इथं सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली, त्यावेळी ते बोलत होते. सीमेवर येऊन सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणं ही आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट असून, सर्व सैनिक सीमेवरील कवच असल्याचं ते म्हणाले. देशभक्ती ही देवाच्या भक्तिप्रमाणेच असते, असं नमूद करत पंतप्रधानांनी सशस्त्र दलांचं कौतुक केलं. भारतासाठी युद्ध हा कधीही पहिला पर्याय नव्हता, युद्ध ही आपल्यासाठी सदैव शेवटचा पर्याय आहे, तसे आपल्यावर संस्कार असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. आपल्या सेनेकडे सामर्थ्य आहे, रणनीती आहे, कोणी आपल्याकडे नजर वाकडी करून पाहात असेल तर आपले सैनिक जशास तसे उत्तर देण्यास समर्थ असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

****

दीपोत्सावाच्या मंगल पर्वा आज नरक चतुर्दशी पाठोपाठ लक्ष्मीपूजनाचा सण सर्वत्र चैतन्यमय वातावरणात साजरा होत आहे. आज संध्याकाळी घरोघरी, तसंच व्यापारी पेठांमध्ये पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मी पूजन केलं जाईल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरीकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी हा पवित्र सण अंधारातून प्रकाश आणि तेजाकडे जाण्याचा संदेश देतो, यानिमित्ताने हे पर्व आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदाने साजरं करा, असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ९४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम सुरु होईल.

****

दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘सिडको’ च्या नवीन महागृहनिर्माण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. नवी मुंबईतील उलवे नोडमधील बामणडोंगरी आणि खारकोपर इथं परवडणाऱ्या दरात ७ हजार ८४९ सदनिका उपलब्ध होणार आहेत. इच्छुक नागरिकांनी या सोडतीचा लाभ घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

****

दिवाळीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात पिवळ्या आणि केरी झेंडूच्या फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. सुमारे ७०० किलो पाना फुलांच्या वापरातून ही मनमोहक आरास साकारण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमधून ही मनमोहक आरास पाहून समाधान व्यक्त केलं जात आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ४२ हजार ८६४ नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत २१९ कोटी ५६ लाख ४हजार ८०७ मात्रा देण्यात आल्या आहेत.

****

राज्यातल्या शासनमान्य ग्रंथालयांना २०२३-२४ या वर्षापासून निकषानुसार ६० टक्के अनुदान देण्यार येईल, अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते काल कोल्हापूर इथं जिल्हा ग्रंथालय संघाच्या ५३व्या वार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. नव्या वर्षात दर्जावाढीसोबत नवीन ग्रंथालयांना देखील मंजूरी देण्यात येईल, त्यांना पहिल्याच दिवसापासून अनुदान लागू करण्यात येईल, असंही पाटील यांनी सांगितलं.

****

साखर विक्रीचा किमान हमीभाव तीन हजार १०० रुपयांवरुन तीन हजार ५०० रुपये करावा, अशी मागणी ऊस दर संघर्ष समितीनं पंढरपूर इथं काल झालेल्या ऊस परिषदेत केली आहे. सर्व कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करावेत, शेतकऱ्यांना खाजगी काट्यावरून वजन करून आणण्याची मुभा द्यावी, देशाला आवश्यक आहे तेवढीच साखर निर्मिती करावी बाकीची इथेनॉल निर्मिती करावी, यावर्षी उसाची पहिली उचल दोन हजार ५०० रुपये मिळाली पाहिजे, से ठराव या परिषदेत करण्यात आले.

****

स्पेनमध्ये सुरू असलेल्या २३ वर्षांखालील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अमन सेहरावत यानं सुवर्ण पदक पटकावलं. त्यानं अंतिम सामन्यात तुर्कस्तानच्या अहमत दुमान याचा १२ - चारनं पराभव केला. ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय मल्ल ठरला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसानं उघडीप दिली आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवकही मंदावली आहे. त्यामुळे धरणाच्या विसर्गात घट करण्यात आली असून, धरणाचे दहा दरवाजे आता दोन फुटावरुन दीफूट उंचीवर स्थिर करण्यात आले आहेत. धरणातून आता २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे.

****

अमरावती नजिक टीमटाला ते मालखेड रेल्वे मार्गावर मालगाडीचे २० डब्बे रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. काल रात्री ही घटना घडली.

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...