Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 14 July 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
ओडीशात जगन्नाथ पुरीच्या भगवान श्री जगन्नाथाचा खजिना म्हणजे रत्न भंडार आज उघडलं जाणार असल्याची माहिती राज्याचे कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी दिली आहे. तब्ब्ल ४६ वर्षांनी ही घटना घडत असून हा पुरीच्या सांस्कृतिक - धार्मिक वारशात एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे. उच्चस्तरीय समितीच्या मानक कार्यप्रणाली शिफारसीनुसार मंदिर मुख्य प्रशासकांच्या नेतृत्वात भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण तसंच सेवक आणि समिती सदस्यांचं पथक यासाठी गठित करण्यात आलं आहे. या भंडाराचं कुलुप प्रथमत: किल्लीने आणि तसे न उघडल्यास न्यायाधीशांच्या उपस्थितीत तोडलं जाईल. यासह आवश्यक सुरक्षिततेबाबत बंदोबस्त करण्यात आला असून सर्व वस्तुंची नोंद असलेला अहवाल तयार केला जाणार आहे.
****
अमरनाथच्या हिमलिंगाच्या दर्शनासाठी आता नव्यानं चार हजार ८८९ यात्रेकरुंचा जत्था रवाना झाला आहे. जम्मुच्या भगवतीनगर आधार शिबीरातुन यात्रेकरुंची रवानगी झाली. यातील काही जण बालतालसाठी तर काही पहलगामसाठी मार्गस्थ झाले आहेत.
****
दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे प्रशासकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी पुजा खेडकर यांच्या विरोधात दिव्यांग कर्मचारी संघटनेनं राज्य दिव्यांग आयुक्तालयाकडं तक्रार केली आहे.
पुजा खेडकर यांनी अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयातुन ३ वेळा दिव्यांगत्व प्रमाणपत्र प्राप्त करून केंद्रीय लोकसेवा आयोगाला सुपुर्द केले आहे. हे प्रमाणपत्र संशयास्पद असल्यामुळं त्यांची चौकशी करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.
****
माजी केंद्रीय गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांची आज जयंती. यानिमित्त नांदेड इथं त्यांच्या समाधीस्थळी त्यांना अभिवादन करण्यासाठी नागरीकांनी हजेरी लावली. माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी सहकुटंबीय समाधीस्थळी अभिवादन केलं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रातर्फे मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षात शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवार पासूनच पावसाची संततधार सुरू आहे. सखल भागात पाणी भरल्यामुळे काही ठीकणी वाहतूक ठप्प झाली आहे. तेरेखोल नदीन धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान विभागानं जिल्ह्यात आज रेड अलर्ट जाहीर केला आहे. किनारपट्टी भागात वाऱ्याचा जोर वाढला असून ताशी ४५ ते ५५ किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातल्या लोकांनी काळजी घ्यावी अस आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
दरम्यान, मराठवाड्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह तसंच विदर्भातही आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
बिकानेर ते पुणे एक्स्प्रेस रेल्वे गाडी आता मिरज जंक्शन रेल्वे स्थानकापर्यंत धावणार असल्याची माहिती सांगलीचे माजी खासदार संजय पाटील यांनी दिली आहे. तसंच या रेल्वेला पुणे ते मिरज दरम्यान कराड, सातारा आणि लोणंद इथंही थांबे देण्यात आले आहेत.
****
भारतानं ३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड-२०२४ या स्पर्धेत एका सुवर्ण पदकासह तीन रौप्य पदकं पटकावली. कझाकस्तानमध्ये सात जुलै ते काल १३ जुलै दरम्यान ही स्पर्धा झाली.यात मुंबईच्या वेदांत साक्रेनं सुवर्ण पदक, तर रत्नागिरीच्या इशान पेडणेकर चेन्नईच्या श्रीजीथ शिवकुमार आणि बरेलीच्या यशश्वी कुमारनं रौप्य पदक मिळवलं. ८० देशांच्या ३०५ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज हार्मोन्सची हार्मनी या आरोग्य विषयक व्याख्यानात आर्युवेदाचार्य-मानसोपचार समुपदेशक अंकुश सुद्रिक मार्गदर्शन करणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता उस्मानपुऱ्यातील भानुदासराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होईल.
****
भारत- झिम्बाब्वे क्रिकेट टी-व्टेंटी पाच सामन्यांच्या मालिकेतला पाचवा सामना आज दुपारी साडेचार वाजता सामना सुरु होत आहे. भारतानं या मालिकेत तीन-एक अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
इंग्लंडमध्ये आयोजित विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज, पुरुष ऐकरीसह मिश्र दुहेरीचे अंतिम सामने खेळले जाणार आहेत.
****
No comments:
Post a Comment