आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१८
जूलै २०२४ सकाळी
११.०० वाजता
****
गडचिरोली
जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या यशस्वी कारवाईबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली
पोलीस अधीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक आणि अन्य
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांचं अभिनंदन केलं आहे. काल झालेल्या या कारवाईत १२ नक्षलवादी ठार झाले. ही कारवाई
गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षलवादी हालचालींवर निर्णायक आघात ठरणारी असून, विकासाला प्राधान्य देऊन हिंसाचाराला ठाम विरोध करणं, हे सरकारचं धोरण असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. गडचिरोली जिल्हा
संपूर्णपणे नक्षलमुक्त करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
वादग्रस्त
प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पौंड पोलिसांनी आज
रायगडमधून ताब्यात घेतलं. बंदूक रोखून एका शेतकऱ्याला धमकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल
झाल्यानंतर त्या फरार होत्या.
****
जवाहरलाल
नेहरू बंदर प्राधिकरणाच्या सामाजिक दायित्व निधीतून ३८ एकलव्य मॉडेल विद्यालयांमध्ये
राबवायच्या संगणकीय प्रकल्पासंदर्भात एका सामंजस्य करारावर काल मुंबईत राज्यपाल रमेश
बैस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या प्रकल्पामुळे आदिवासी विद्यार्थी
आजच्या स्पर्धात्मक युगाला आत्मविश्वासानं सामोरं जाऊ शकतील, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.
****
परभणी
जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या जोगवाडा सोस परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळे पिकांचं
मोठं नुकसान झालं आहे. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची
मागणी शेतकरी करत आहेत.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं महानगरपालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचं बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला
रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकल्याप्रकरणी दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. नागरिकांना
तसंच रहदारीला त्रास होईल, अशा
रितीने बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकू नये, असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.
****
पॅरिस
ऑलिंपिकसाठी भारतीय संघाच्या यादीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं शिक्कामोर्तब केलं
आहे. संघात ११७ खेळाडूंचा समावेश असून सोबत १४० तज्ञ, अधिकारी आणि कर्मचारी असतील. एथलेटिक्स प्रकारात सर्वाधिक २९ खेळाडूंची निवड झाली
असून, नेमबाजीसाठी २१, हॉकीसाठी १९ खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करतील.
****
No comments:
Post a Comment