Saturday, 13 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.09.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 13 September 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १३ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      डिसेंबर २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार

·      राज्यातल्या बारव आणि विहिरींचं जिल्हा निहाय सर्वेक्षण करण्याचा सरकारचा निर्णय 

·      अहिल्यानगर बीड रेल्वे मार्गावर उद्यापासून तीन दिवस जलद रेल्वेची चाचणी

·      नांदेडच्या कवयित्री सुचिता खल्लाळ यांना ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार जाहीर

आणि

·      हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक-चिराग जोडीची अंतिम फेरीत धडक 

****

डिसेंबर २०२६ पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनरुच्चार केला आहे. आज यवतमाळ इथं, ३३५ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण तसंच भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्यांनी ही बाब नमूद केली. ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

यवतमाळ जिल्ह्यात पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे पूर्ण होताच त्यांच्या खात्यात मदत वर्ग केली जाईल, घर आणि शेती अशा दोन्ही नुकसानासाठी शासनाकडून मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

दरम्यान, परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानं पूर्ण परिसर जलमय झाला आहे. पूर्णा तालुक्यातील ढोणे पांगरा इथल्या शाळेत पावसाचं पाणी शिरलं, दरम्यान, नागरिक आणि शिक्षकांच्या सतर्ककतेनं विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. पूर्णा शिवारात समृद्धी महामार्गाचं काम चालू असून यंत्रावर काम करताना थूना नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये चौघेजण अडकले होते. जिल्हा प्रशासनाच्या पथकानं पुरात अडकलेल्या या कामगारांना सुखरूप वाचवलं.

परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर, पिंगळी, परभणी ग्रामीण, पूर्णा, ताडकळस, कात्नेश्वर, पालम, बनवस, पेठशिवणी या नऊ मंडळात जोरदार पाऊस झाला असून कात्नेश्वर मंडळात सर्वाधिक १४७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

****

राज्यातल्या बारव आणि विहीरींचं जिल्हा निहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज जाहीर केलं. आज मुंबई इथं तज्ज्ञांसोबत शेलार यांनी बैठक घेऊन बारव संवर्धन, संरक्षण याबाबत आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि पुराणकाळापासून ज्यांच्या नोंदी आहेत असे तीन हजारपेक्षा अधित बारवं आहेत.  ज्यांचे ऐतिहासिक मूल्य आहेत. त्यांचं स्थापत्यशास्त्र दुर्मिळ आहे, असं शेलार म्हणाले. जलसंवर्धन आणि जलसंधारण याचं कार्यही होतं असून, त्याचा पाण्यासाठी उपयोग झाला पाहीजे, असं शेलार यांनी सांगितलं. बारव जतन, संवर्धन आणि उपयोगिता यांची स्पष्ट उद्दिष्ट्ये आणि हेतू असलेला शासन निर्णय जारी करण्यात येईल, अशी माहिती शेलार यांनी दिली.

****

अहिल्यानगर बीड या मार्गावर १७ सप्टेंबरपासून DEMU रेल्वे सेवा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर अंमळनेर ते बीड या मार्गावर उद्या १४ तारखेपासून पुढचे तीन दिवस जलद रेल्वेची चाचणी घेतली जाणार आहे. या रेल्वे मार्गाजवळ राहणाऱ्या रहिवाशांनी या काळात सतर्क राहावं, रेल्वे रुळांवर चालू नये, किंवा जनावरे रेल्वे रुळांवर येऊ देऊ नये, असं आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आलं आहे.

****

राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी आज नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागात बोट अँम्ब्युलंन्सने नर्मदा नदीतून प्रवास करत तिथल्या रुग्णांशी संवाद साधला. भुषा पॉईंट इथं तैनात असलेल्या तरंगत्या दवाखान्याची पाहणी करत, परिसरातल्या रुग्णांना सिकलसेलच्या औषधांच्या नियमित पुरवठ्याचा आबीटकर यांनी आढावा घेतला. दरम्यान, तरंगत्या दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांसाठी विमा कवच उपलब्ध करण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं.

****

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्राच्या वतीने देण्यात येणारा ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार नांदेडच्या कवयित्री सुचिता खल्लाळ यांना जाहीर झाला आहे. मुंबई इथं कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्काराची घोषणा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पुरस्कारांचं हे दुसरं वर्ष असून मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात येत्या २६ सप्टेंबर रोजी या पुरस्कारांचं समारंभपूर्वक वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सुळे यांनी दिली. सुचिता खल्लाळ यांचे पायपोळ, तहहयात, प्रलयानंतरची तळटीप हे तीन काव्यसंग्रह, 'स्त्री कविचेचं भान : काल आणि आज' हा समीक्षापर ग्रंथ आणि 'डिळी' कादंबरी ही प्रकाशित आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून २ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत युवकांमध्ये क्रीडा मंत्रालयाच्या वतीने फिटनेस इंडिया सुदृढ भारत निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी देशभरातील ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉन आयोजित करण्यात आलं आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज बुलडाणा इथं ही माहिती दिली....

बाईट - रक्षा खडसे, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दुबई इथं होणारा हा रात्री आठ वाजता सुरु होणार आहे.

दरम्यान, या सामन्याविरुद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. ते आज मुंबई इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एकीकडे पाकिस्तान भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करत असून, केंद्र शासनाने ऑपरेशन सिंदूर राबवलं, अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट कसं खेळलं जावू शकतं, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. दरम्यान, उद्या पक्षाच्या महिला आघाडीकडून राज्यभर ठिकठीकाणी माझं कुंकू, माझा देशहे निषेध आंदोलन राबवण्यात येणार आहे.

या राज्यव्यापी आंदोलनांतर्गत छत्रपती संभाजीनगर महिला आघाडी शाखेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील तमाम माता-भगिनींच्या वतीने सिंदूर भेट देण्यासाठी सकाळी साडे दहा वाजता क्रांती चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीविषयी काँग्रेस पक्षाच्या कथित वादग्रस्त चित्रफितीचा आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर इथं निषेध करण्यात आला. या चित्रफितीविरोधात क्रांती चौक इथं तीव्र आंदोलन करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाल्या.

****

मराठा समाजासाठी लागू करण्यात आलेलं हैदराबाद गॅझेट रद्द करण्याच्या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातल्या वांगदरी इथं आजपासून गावकऱ्यांनी उपोषण सुरु केलं आहे. नुकतच वांगदरी इथं भरत महादेव कराड यांनी आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज कराड यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. राज्य सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल केल्याची टीका हाके यांनी यावेळी केली.

****

वीजबिलाच्या थकबाकीसाठी महावितरणने कायमस्वरूपी खंडित केलेला वीजपुरवठा परस्पर जोडून घेतल्याने महावितरणच्या जालना कार्यालयाने ३० ग्राहकांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला. जिल्ह्यात भोकरदन तसंच बदनापूर या तालुक्यात ही कारवाई करण्यात आली आहे. ३० ग्राहकांकडे वीजबिलांची ३ लाख ७७ हजार रुपयांची थकबाकी असल्याने महावितरणने त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला होता. आतापर्यंत महावितरणने ४६ ग्राहंकांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

सामाजिक न्याय विभागाने हाती घेतलेल्या विविध योजना आणि उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांची साथ अत्यावश्यक असल्याचं, सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या दोन दिवसीय बैठकीचे उद्घाटन आज शिरसाट यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. समाज कल्याणासाठी योगदान देणाऱ्या पत्रकारांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं शिरसाट यांनी यावेळी जाहीर केलं.

****

सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय जोडीनं आज सकाळी उपांत्य फेरीत चायनीज तैपेईच्या चेन चेंग कुआन आणि लिन बिंग-वेई यांचा २१ विरुद्ध १७, २१ विरुद्ध १५ असा पराभव केला. दरम्यान, या स्पर्धेच्या पुरुष एकेरीत लक्ष्य सेननं अंतिम फेरीत धडक मारली आहे, उपांत्य फेरीत त्याने, २३-२१, २२-२० असा विजय मिळवला.

****

चीनमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या ईशा सिंह हिने दहा मीटर एयर पिस्टल प्रकारात स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. जागतिक स्पर्धेत ईशाचं हे पहिलंच सुवर्णपदक आहे. या पदकामुळे भारत पदकतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे

****

जालना शहराजवळच्या खडकतलाव खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, ही घटना आज दुपारी घडली. सिध्दार्थ हरबळे आणि जस्मितसिंग रिहाल, अशी मृतांची नाव आहेत. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

****

पैठणच्या जायकवाडी धरणातून, पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. आता धरणाचे आठ दरवाजे अर्धा फूट उघडून सुमारे चार हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. विभागात ईसापूर धरणातून साडे आठ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे.

****

हवामान

राज्यात आज विदर्भ, मराठवाडा तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव तसंच बीड जिल्ह्यांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...