Monday, 15 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 15 September 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

वक्फ सुधारणा कायदा २०२५ ला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला असून, काही तरतुदींच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सरन्यायाधीश बी आर गवई आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. सुधारित कायद्यातल्या सगळ्या तरतुदींना स्थगिती देण्यासाठी कोणताही आधार नाही, मात्र काही कलमांना संरक्षणाची आवश्यकता न्यायालयानं व्यक्त केली. वक्फ निर्माण करण्यासाठी, व्यक्ती ५ वर्षांसाठी इस्लाम धर्माचा अनुयायी असावा या तरतुदीला स्थगिती देण्यात आली असून, एखादी व्यक्ती इस्लाम धर्माचा अनुयायी आहे की नाही हे ठरवण्यासाठी नियम तयार होईपर्यंत ही तरतूद स्थगित राहील असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे वक्फ मालमत्तेनं सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण केलं आहे की नाही, या वादाचं निवारण करण्यासाठी सरकारनं नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला सक्षम करणाऱ्या वक्फ सुधारणा कायद्यातील तरतुदीलाही सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.

****

राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज मुंबईत संस्कृत भाषेतून पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च नायायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांनी त्यांना पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांनी राज्यपालांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. आचार्य देवव्रत हे २०१९ पासून गुजरातच्या राज्यपालपदी आहेत. त्याआधी १२ ऑगस्ट २०१५ ते २१ जुलै २०१९ या काळात त्यांनी हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली.

****

ज्येष्ठ अभियंते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती आज राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणून साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त विश्वेश्वरय्या यांना विनम्र अभिवादन केलं. सर्जनशीलता आणि दृढनिश्चयाद्वारे, नाविन्यपूर्णतेला चालना देणाऱ्या आणि विविध क्षेत्रांमध्ये कठीण आव्हानांना तोंड देणाऱ्या अभियंत्यांना शुभेच्छा देत असल्याचं, पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं. आमचे अभियंते विकसित भारत बांधण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत राहतील, असं ते म्हणाले.

****

देशभरात गावागावात पोहोचलेल्या दूरदर्शनच्या गौरवशाली प्रवासाची ६६ वर्ष आज पूर्ण होत आहेत. १५ सप्टेंबर १९५९ रोजी दूरदर्शनच्या माध्यमातून भारतीय प्रसारण युगाची सुरुवात झाली. आज दूरदर्शन भारतातील सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे, ज्यामध्ये स्टुडिओ आणि ट्रान्समिटर्सचं विस्तृत जाळं आहे. देशभरातली सर्व शहरं, प्रादेशिक क्षेत्रं, तसंच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत दूरदर्शन पोहोचलं असून, आता मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही दूरदर्शनचे कार्यक्रम पाहणं शक्य झालं आहे

****

भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन - एन पी सी आय नं व्यक्ती ते व्यापारी या प्रकारातील युपीआय व्यवहारांची मर्यादा प्रति दिन दहा लाख रुपयांपर्यंत वाढवली असून, हा बदल आजपासून लागू झाला. मात्र, व्यक्ती ते व्यक्ती व्यवहारांची मर्यादा लाख रुपये प्रति दिवस अशी पूर्वीप्रमाणेच कायम राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

झारखंडमध्ये हजारीबागच्या करांडी गावात आज सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत तीन नक्षलवादी कमांडर मारले गले. त्यांच्यावर सुमारे एक कोटी रुपयाचं बक्षिस होतं.

****

पुणे इथल्या मराठवाडा समन्वय समितीचा मराठवाडा भूषण पुरस्कार धाराशिव इथले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक यांना जाहीर झाला आहे. परभणीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांना देखील हा पुरस्कार जाहिर झाला असून, येत्या १७ तारखेला हैदराबाद मुक्तिसंग्रामदिनी पुण्यात या पुरस्कारांचं वितरण होणार आहे

****

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि इशान्येकडील राज्यांना पुढचे तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग आणि उत्तराखंडमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

**

मराठवाड्यातही अनेक भागात पाऊस सुरु असून, मोठ्या प्रमाणात धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे.

बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे बिंदुसरा तसंच छोटे-मोठे तलाव, नदी, ओढे तुडुंब भरले असून, पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं आणि इतर मालमत्तांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. माजलगाव धरण ९४ टक्के भरलं असून, धरणातून सध्या १९ हजार ८०४ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे सिंदफणा आणि गोदावरी नदीकाठच्या गावांनी सावध राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 20.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...