Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 01 April 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ एप्रिल मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.
****
·
वैद्यकीय
अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा - एनईईटी साठीची वयोमर्यादा शिथील
·
एप्रिल
ते जून या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरच्या व्याजदरात कपात
·
मनोधैर्य
योजनेअंतर्गत पीडितेला देण्यात येणारी मदत तीन लाखावरून दहा लाख रुपये करण्याचा सरकारचा
प्रयत्न
·
पेट्रोल
तसंच डिजेलच्या दरात घट
आणि
·
शेतकरी
कर्जमाफीच्या मागणीसाठी निघालेली संघर्ष यात्रा मराठवाड्यात दाखल
*****
वैद्यकीय
अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा - एनईईटी साठी अर्ज करण्यासाठी
वयोमर्यादा शिथील करण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं या परीक्षेसाठी
उमेदवारांची वयोमर्यादा २५ वर्ष निश्चित केली होती, त्याविरोधात दाखल याचिकेवर काल
झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं ही वयोमर्यादा पुढच्या शैक्षणिक वर्षापासून
निश्चित करण्याचे निर्देश देत, या वर्षी २५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले इच्छुकही परीक्षेला
पात्र असतील, असं स्पष्ट केलं. परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदतही न्यायालयानं पाच एप्रिलपर्यंत
वाढवून दिली आहे.
****
केंद्र सरकारनं एप्रिल ते जून या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांवरचे व्याजदर एक
दशांश टक्क्यानं कमी केले आहेत. नवीन दरानुसार पीपीएफ अर्थात सार्वजनिक भविष्य निधी
आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर सात पूर्णांक नऊ दशांश टक्के, किसान विकास पत्रावर
सात पूर्णांक सहा दशांश टक्के, तर सुकन्या समृध्दी योजनेवर आठ पूर्णांक चार दशांश टक्के
दरानं व्याज मिळेल. एक ते पाच वर्ष कालावधीच्या
ठेवींवर सहा पूर्णांक नऊ दशांत ते सात पूर्णांक सात दशांश टक्के व्याजदर राहील.
****
राज्याचा २०१७-२०१८ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प काल विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर
झाला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात विनियोजन विधेयक मांडलं. विरोधकांच्या
गैरहजेरीमुळे ते एकमतानं मंजूर झालं.
****
मनोधैर्य योजनेअंतर्गत
पीडित महिलेला देण्यात येणारी तीन लाख रुपयांची मदत दहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा
सरकारचा प्रयत्न असल्याचं, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
त्या काल विधान परिषदेत बोलत होत्या. या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी न्यायालयानं
दिलेल्या निर्देशाचं पालन करुन व्यापक योजना लवकरात लवकर आणली जाईल असं त्यांनी सांगितलं.
यासाठी विविध विभाग तसंच विधीमंडळातल्या महिला सदस्यांची समिती स्थापन केली जाईल, त्या
माध्यमातून पीडितेला जास्तीत जास्त मदत मिळावी यासंदर्भात प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर
मांडला जाईल अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.
****
विधीमंडळाची दोन्ही सभागृह संविधानानं तयार
केलेली सार्वभौम सभागृह आहेत. त्यामुळे आमदारांना सभागृहाचा अवमान करणारं मत
मांडता येणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. विधानसभा
सदस्य अनिल गोटे यांनी केलेल्या विधानावर विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी आक्षेप घेत घोषणाबाजी केली, त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत
होते.
दरम्यान, काँग्रेस तसंच राष्ट्रवादी
काँग्रेसच्या १९ आमदारांचं निलंबन आज मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी
काल पीटीआयशी बोलताना तसे संकेत दिले.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या
कन्नड तालुक्यातले शेतकरी रामेश्वर भुसारे यांचे बँकेकडे असलेले कर्जप्रकरण मार्गी
लावण्याचा शासनाचा प्रयत्न असून, त्यांना मदत करण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल,
असं गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधान परिषदेत सांगितलं.
****
राज्य सहकारी
बँकांमधील गैरव्यवहारांच्या जवळपास दोन हजार प्रकरणांची चौकशी वेळेत व्हावी यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक
करण्यात येईल, असं सहकार मंत्री सुभाष देशमुख
यांनी काल विधानसभेत प्रश्नोतराच्या तासात
सांगितलं.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राजर्षी
छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी बारावीच्या परीक्षेत ६० टक्के
गुणांची अट योग्य असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं
आहे. काल विधानपरिषदेत आमदार सतीश
चव्हाण यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना ते
बोलत होते.
****
राज्यात बिअर बार
तसंच मद्य विक्री केंद्रांना महापुरुष, गडकिल्ले आणि देवदेवतांच्या नावाचे फलक लावण्यास
प्रतिबंध करणारा कायदा येत्या पावसाळी अधिवेशनात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं उत्पादन
शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानपरिषदेत दिली.
दरम्यान, राष्ट्रीय
तसंच राज्य महामार्गांच्या लगत असलेली मद्य विक्रीची दुकानं आजपासून बंद होणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात येत आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या
संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
पेट्रोल आणि डिजेलच्या दरात घट झाली आहे. पेट्रोलच्या दरात लीटरमागे तीन रुपये
७७ पैसे तर डिजेलच्या दरात लीटरमागे दोन रुपये ९१ पैसे कपात झाली आहे. मध्यरात्रीपासून
हे नवे दर लागू झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमतीत घट झाल्यानं, ही दरकपात
झाल्याचं, पेट्रोलियम कंपन्यांकडून सांगण्यात आलं.
****
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी निघालेली संघर्ष यात्रा काल मराठवाड्यात दाखल झाली.
परभणी इथं आयोजित जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, शेतकऱ्यांना
कर्जमुक्ती मिळवून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं. विधानसभेत निलंबित झालेल्या आमदारांचा यावेळी
शेतकरी संघटनेच्यावतीनं सत्कार करण्यात आला.
हिंगोलीत इंदिरा गांधी चौकात झालेल्या जाहीर सभेत मान्यवरांची भाषणं झाली. माजी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून तूर खरेदी बंदीसह त्यांच्या
समस्या जाणून घेतल्या.
दरम्यान, ही संघर्ष यात्रा आज औरंगाबाद इथं पोहोचत असून, दुपारी शहरात आमखास मैदानावर
जाहीर सभा होणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातली तूर हमीभाव
खरेदी केंद्रं बारदान्यांअभावी बंद असल्यानं, बारदाने त्वरित उपलब्ध करून द्यावेत तसंच
खरेदी केलेल्या तुरीचे पैसे तत्काळ द्यावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं
उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची दखल घेत जिल्हा पणन
अधिकाऱ्यांनी दोन दिवसात तूर खरेदी सुरू केली जाईल, असं लेखी आश्वासन दिल्याचं राष्ट्रवादी
काँग्रेसच्या उस्मानाबाद शाखेकडून सांगण्यात आलं.
****
हैदराबाद स्टेट बँकेसह पाच सहयोगी बँका काल आर्थिक वर्षाच्या समारोपासोबत भारतीय
स्टेट बँकेत विलीन झाल्या. या विलीनीकरणाचा खातेधारकांच्या व्यवहारांवर कोणताही परिणाम
होणार नाही. एटीएम, डेबीट किंवा क्रेडीट कार्ड तसंच इंटरनेट बँकिंगचे पासवर्डमध्ये
कोणताही बदल होणार नाही, असं हैदराबाद स्टेट बँकेनं आपल्या खातेधारकांना पाठवलेल्या
संदेशात म्हटलं आहे.
****
राष्ट्रीय विधी आयोगाने शासनाकडे सादर केलेलं वकील कायदा दुरुस्ती विधेयक संसदेत
मांडू नये, या मागणीसाठी काल वकिलांनी सर्वत्र काम बंद आंदोलन केलं. औरंगाबाद इथं आंदोलन
शंभर टक्के यशस्वी झाल्याचं जिल्हा वकील संघटनेनं कळवलं आहे. बार कौन्सिलची निवडणूक
लढवण्यासाठी किमान दहा वर्षांचा अनुभव, वकिलांविरुध्द तक्रारींच्या चौकशीसाठी कौन्सिलच्या
सदस्यांऐवजी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती, आदी सुधारणा या विधेयकात सुचवल्या आहेत,
त्यांना वकिलांचा विरोध आहे.
****
नांदेड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांना
कामकाजात अनियमिततेच्या कारणावरून निलंबित केलं आहे. केंद्रे यांच्याकडे मुख्य कार्यकारी
अधिकारी म्हणून पदभार असताना, कामकाजात अनियमितता आढळून आल्यानं, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम
भापकर यांनी चौकशीअंती ही कारवाई केली. केंद्रे यांचा काल सेवानिवृत्तीचा दिवस होता.
****
सीटू कामगार संघटनेचे औरंगाबाद इथले
संस्थापक सदस्य कॉम्रेड छगन साबळे यांचं काल औरंगाबाद इथं हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं
निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. काल संध्याकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार
करण्यात आले.
****
लातूर आणि रेणापूर तालुक्यात सिंचन तसंच पेयजल पुरवठ्यासाठी मांजरा प्रकल्पातून
नदीपात्रात विसर्ग करण्याची मागणी आमदार त्र्यंबक भिसे यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे
केली आहे. मागणी मान्य न झाल्यास, तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
****
मराठवाड्यात काल नांदेड
इथं सर्वाधिक ४२ पूर्णांक पाच अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. परभणी इथं ४२ पूर्णांक
तीन, औरंगाबाद तसंच बीड इथं ४१ अंश तर उस्मानाबाद इथं ३८ पूर्णांक सात अंश सेल्सियस
तापमान नोंदवलं गेलं.
****
भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही
सिंधूने उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. दिल्लीत सुरू असलेल्या या स्पर्धेत सिंधूने
काल झालेल्या उपांत्यफेरीत सायना नेहवालचा २१-१६, २२-२० असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव
केला.
//********//
No comments:
Post a Comment