Tuesday, 4 April 2017


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

४ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

ज्येष्ठ गायिका किशोरी अमोणकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. अमोणकर यांचं संगित क्षेत्रातलं कार्य सदैव स्मरणात राहील, असं पंतप्रधानांनी शोक संदेशात म्हटलं आहे. अमोणकर यांच्या निधनानं प्रयोगशिलता आणि संवेदनांना जपणाऱ्या एका ख्यातनाम आणि महान शास्त्रीय गायिकेला आपण मुकलो आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. किशोरी आमोणकर यांचं काल मुंबईत राहत्या घरी निधन झालं. 

****

वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, या मागणीचा माजी केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पुनरुच्चार केला आहे. ते काल औरंगाबाद इथं एका कार्यक्रमात बोलत होते. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, त्याला सन्मानानं जगता यायला हवं, असं पवार यावेळी म्हणाले. पारंपारिक शेतीपद्धतीत बदलाची गरज नमूद करत, पवार यांनी बँकांनी शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज उपलब्ध करून द्यावं, असं आवाहन केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूच्या नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा तसंच प्रशासन सज्ज असल्याचं, जिल्हाधिकारी डॉ निधी पांडेय यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात स्वाईन फ्ल्यू उपचारासाठी स्वतंत्र कक्ष सुसज्ज असून, नागरिकांनी सर्दी, खोकल्यासह इतर लक्षणं आढळल्यास, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात स्वाईन फ्ल्यू सदृष्य ३१ रुग्ण आढळले असून, त्यापैकी तीन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, उर्वरित रुग्णांवर योग्य उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

//*****//




No comments: