Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 April 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ एप्रिल २०१७ दुपारी १.००वा.
*****
पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत आगामी
तीन वर्षात पाच कोटी महिलांना मोफत गॅस जोडणी देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. सध्या या
योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दोन कोटींपर्यंत पोहोचली आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र्य
रेषेखालील कुटुंबातल्या महिलांना स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी मोफत दिली जाते. या योजनेच्या
यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
****
जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या बराक
क्षेपणास्त्राच्या निर्मितीला सरकारनं मान्यता दिली आहे. यामुळे देशाचं सागरी सामर्थ्य
वाढवण्यास मदत होणार आहे. संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
संरक्षण परिषदेच्या बैठकीत बराक क्षेपणास्त्र निर्मितीसह आठ अब्ज साठ कोटी रुपयांच्या
खरेदी प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली.
****
अजमेर बॉम्बस्फोटाप्रकरणी राष्ट्रीय
तपास यंत्रणा - एन आय ए नं खटला बंद करण्याचा अहवाल - क्लोजर रिपोर्ट दाखल करत, साध्वी
प्रज्ञा सिंह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमारसह चार जणांना निर्दोष
ठरवलं आहे. २००७ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी या चारही जणांविरोधात खटला चालवण्यासाठी
पुरेशा प्रमाणात पुरावे मिळू शकले नाही, असं एन आय ए नं सांगितलं आहे. एन आय ए कडून
मिळालेल्या अहवालावर न्यायालय १७ एप्रिलला आपला निर्णय सांगणार आहे.
****
देशातल्या प्रमुख ११ बंदरांसाठी सध्या
अस्तित्वात असलेला प्रमुख बंदर कायदा, कामगारांचं हित लक्षात घेऊन रद्द करु नये अशी
मागणी, बंदर आणि गोदी कामगार संघटनेनं केंद्र सरकारकडे केली आहे. कामगार नेते विधिज्ञ
एस के शेट्ये यांनी मुंबई इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय श्रम आयुक्तांच्यासमोर
केंद्र सरकारनं मान्य केलेल्या बंदर आणि गोदी कामगारांच्या मागण्या, नवीन कायद्यातून
वगळण्यात आल्याचा संघटनेचा आरोप आहे.
दरम्यान, आपल्या मागण्या मान्य झाल्या
नाही, तर येत्या १९ एप्रिलला देशभरातल्या सर्व बंदर आणि गोदी कामगारांनी बेमुदत संपाचा
इशारा दिला आहे.
** **
रिपब्लिकन ऐक्य ही काळाची गरज आहे,
मात्र ऐक्याच्या नावावर नवे गट तयार करणं थांबवायला हवं, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे
अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. मुंबई इथं एका कार्यक्रमात
ते बोलत होते. दलित आदिवासींवर आजही विविध पातळीवर जातीयवादातून अत्याचार होत आहेत,
या पार्श्वभूमीवर समग्र रिपब्लिकन चळवळीचा आढावा घेतला पाहिजे, असं ते म्हणाले.
****
डॉक्टरांच्या हल्ल्याबाबत सरकार
गंभीर असून डॉक्टरांच्या संरक्षणासाठी २०१० मध्ये विशेष कायदा करण्यात आला आहे, या
कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांना सजग करणं आवश्यक असल्याचं गृह राज्यमंत्री रणजित
पाटील यांनी म्हटलं आहे. ते
काल मुंबईत बोलत होते. डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरास तीन वर्षे
कारावास आणि ५० हजार रूपयांचा दंड अशी शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये आहे. डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी राज्यातल्या
शासकीय रूग्णालयांमध्ये बाराशे पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवली असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी
ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे, त्यांना येत्या १५ एप्रिलपासून
नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष
राधेश्याम मोपलवार यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. जमीन अधिग्रहणासाठी
एकाचवेळी सर्व शेतकऱ्यांची अनुमती मिळाल्यामुळे हा निधी देण्याचा निर्णय घेतल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
यशवंत पंचायत राज
अभियानात लातूर जिल्हा परिषदेला ३० लाख रूपयांचा पहिला पुरस्कार प्राप्त झाला आहे.
२० लाख रूपयांचा दुसरा पुरस्कार सोलापूर जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून, जळगाव
जिल्हा परिषदेला १७ लाख रूपयांचा तिसरा पुरस्कार प्राप्त झाला आहे. राज्यशासनाच्या
ग्रामविकास खात्यानं काल या पुरस्कारांची घोषणा केली.
****
रामनवमी उत्सव आज सर्वत्र साजरा होत
आहे. दुपारी बारा वाजता ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये राम जन्मोत्सव साजरा झाला. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नाशिक इथल्या श्री काळाराम मंदिरात
गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या वासंतिक नवरात्राची सांगता आज होणार आहे.
दरम्यान, देवीच्या साडे तीन शक्ती पीठांपैकी
अर्धे पीठ मानल्या जाणाऱ्या वणीच्या सप्तशृंगी देवीच्या चैत्र उत्सवाला आज पासून प्रारंभ
होत आहे. उत्सव काळात सुमारे १५ लाख भाविक गडावर येण्याचा अंदाज असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय
शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन विद्यापीठाच्या वतीनं शालेय गुणवत्ता सुधारण्यासाठी, शाळासिद्धी
हा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम राबवण्यात आला. यात कोल्हापूर
जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. जिल्ह्यातल्या सहाशे
१० शाळा ‘अ’ श्रेणीत तर एक हजार १२ शाळा ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत.
//*********//
No comments:
Post a Comment