आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१९ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता
*****
विवादित बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे
नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यावरचे वगळलेले गुन्हेगारी
आरोप पुन्हा दाखल करावेत, अशी मागणी करणाऱ्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज आपला
निर्णय देईल, अशी शक्यता आहे. गेल्या सहा तारखेला, सर्व संबंधितांचे जवाब पूर्ण झाल्यानंतर
न्यायालयानं या याचिकेवरचा निर्णय राखून ठेवला होता.
****
देशातल्या गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांचा पैसा ज्यांनी
लुटला आहे, त्यांना तो परत करावाच लागेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. ट्विटरवर एका चाहत्यानं याबाबत केलेल्या एका ट्वीटच्या उत्तरात त्यांनी हे प्रतिपादन
केलं. भारतात आता भ्रष्टाचाराला कोणतीही जागा नाही, असंही पंतप्रधानांनी या संदेशात
म्हटलं आहे.
****
लातूर, परभणी आणि चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचं
मतदान आज सकाळी सुरू झालं. वाढत्या उन्हाची स्थिती लक्षात घेत निवडणूक विभागानं मतदानाची
वेळ एक तासानं वाढवली असून, संध्याकाळी साडेसहा पर्यंत नागरिकांना मतदान करता येणार
आहे. या निवडणुकीची मतमोजणी येत्या शुक्रवारी होणार आहे.
****
लासलगाव बाजार समितीतले कांदा आणि धान्य लिलाव उद्यापासून
बेमुदत बंद ठेवणार असल्याची माहिती समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी
विक्री केलेल्या शेतीमालाची रक्कम रोख स्वरूपात देण्याला व्यापाऱ्यांनी नकार दिल्यानं
हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. व्यापारी देत असलेल्या चेकची रक्कम खात्यात
जमा होण्यास पंधरा दिवसांहून जास्त काळ लागत असल्यानं ही रक्कम व्यापाऱ्यांनी रोख स्वरूपात
द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
****
औरंगाबाद शहरामध्ये उद्यापासून तिसरी राष्ट्रीय पिस्तूल
नेमबाजी स्पर्धा सुरू होत आहे. भारतीय एअरगन संघटना आणि क्रीडा मंत्रालयातर्फे संयुक्तपणे
आयोजित ही स्पर्धा शहरातल्या गरवारे क्रीडा संकुलात, उद्या आणि परवा घेतली जाणार आहे.
या स्पर्धेमध्ये अठरा राज्यांचे संघ भाग घेणार आहेत.
//*******//
No comments:
Post a Comment