आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
५ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
चार दिवसांच्या खंडानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचं
कामकाज आज सुरू होत असून, राज्यसभेमध्ये वस्तू आणि सेवाकर विधेयकांवर चर्चा होणार आहे.
केंद्रीय वस्तू आणि सेवाकर विधेयक, एकात्मिक वस्तू आणि सेवाकर विधेयक, राज्यांना नुकसान
भरपाई विधेयक, तसंच केंद्रशासित वस्तू आणि सेवा कर विधेयक ही चार विधेयकं लोकसभेत गेल्या
आठवड्यात मंजूर झाली आहेत. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली आज लोकसभेत, कर
कायदा सुधारणा विधेयक २०१७, मांडणार आहेत.
****
देशाचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांची आज
एकशे दहावी जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगजीवनराम यांना आदरांजली अर्पण
केली आहे. बाबू जगजीवनराम यांनी केलेली देशाची सेवा आणि समाजाच्या मागासलेल्या वर्गाच्या
हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या या संदर्भातल्या
ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
****
कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं शेतकरी शास्त्रज्ञ
मंच उपक्रमांतर्गत उद्या ६ एप्रिलला औरंगाबादमध्ये ‘डाळिंब आणि मोसंबी लागवड तसंच उन्हाळ्यात
घ्यावयाची बागेची काळजी’, या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या
कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात सकाळी अकरा वाजल्यापासून हे चर्चासत्र होणार असून
सोलापूर राष्ट्रीय डाळिंब संशोधनालयाचे माजी संचालक डॉ. व्ही.टी. जाधव आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ
डॉ.एम.बी. पाटील यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चर्चासत्राचा
फायदा घ्यावा, असं आवाहन कृषी केंद्राच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
इंडियन प्रीमिअर लीग या क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या
दहाव्या हंगामाला आजपासून सुरूवात होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर आज रात्री
८ वाजता हैदराबाद सनरायजर्स आणि बेंगळुरूच्या रॉयल चॅलेंजर्स या संघांदरम्यान साखळी
फेरीतल्या पहिल्या सामन्याला सुरूवात होईल.
//****//
No comments:
Post a Comment