Wednesday, 5 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 05.04.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 April 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ एप्रिल २०१ दुपारी .००वा.

*****

विधानसभेमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर निवेदन केलं. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, ही कर्जमाफी  देण्यासाठी काय व्यवस्था करावी लागेल, याचा अभ्यास सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यासंदर्भात राज्य सरकारनं केंद्र सरकारला आर्थिक मदत मागितली असून, ती मिळाली नाही, तरी आम्ही आमच्या  पातळीवर हा प्रश्न सोडवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

****

चार दिवसांच्या खंडानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू झालं. लोकसभाअध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी, लोकसभेच्या या सत्राचं कामकाज आतापर्यंत सुरळीतपणे सुरू ठेवल्याबद्दल सर्व सदस्य आणि पक्षांचे आभार मानले.

औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज लोकसभेमध्ये कम्युनिटी रेडिओ संदर्भात सरकारला प्रश्न विचारला. कम्युनिटी रेडिओ तसंच सिलोन रेडिओचे कार्यक्रम औरंगाबादला कधी ऐकता येतील, या त्यांच्या प्रश्नाला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सकारात्मक उत्तर दिलं.

भाजपचे जुगल किशोर शर्मा यांनी विचारलेल्या रेल्वेस्थानकांच्या नूतनीकरणाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी, लवकरच या कामाची सुरूवात करण्यात येईल, असं सांगितलं. देशभरातल्या रेल्वे स्थानकांनजीक वृक्षलागवड करण्याचा सरकारचा विचार असल्याचंही प्रभू यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

राज्यसभेमध्ये, काँग्रेसचे दिग्विजय सिंह आणि बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी, उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफारीचा मुद्दा मांडला. यावर मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी, विरोधी पक्षांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे जावं, निवडणूक आयोगानं या मुद्यावर याआधीच स्पष्टीकरण दिलं आहे, असं उत्तर दिलं. या मुद्यावरून विरोधी पक्ष सदस्यांनी गोंधळ केल्यामुळे राज्यसभेचं काम साडेअकरापर्यंत स्थगित करावं लागलं.

****

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नीतिन गडकरी यांनी ईशान्य भारतातल्या पहिल्या एक्स्प्रेस वे प्रकल्पाची काल घोषणा केली. ईशान्य भारताचा विकासाला सरकार प्राधान्य देत असल्याचं त्यांनी नमूद केलं. एक हजार तीनशे किलोमीटर्स लांबीच्या या महामार्गाला सुमारे चाळीस हजार कोटी रूपये लागणार आहेत.

****

पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. जम्मू काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात नियंत्रणरेषेलगत आज पाकिस्ताननं उखळी तोफांचा मारा केला. गेल्या अठ्ठेचाळीस तासात पाकिस्ताननं चार वेळेला शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. भारतीय सैन्य प्रत्युत्तराची कारवाई करत आहे.

****

३१ मार्च २०१७ ला संपलेल्या आर्थिक वर्षात देशात आठ लाख सत्तर हजार कोटी रूपये इतका प्रत्यक्ष कर जमा झाला असून, त्यामागच्या वर्षीच्या तुलनेत त्यात चौदा पूर्णांक दोन टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय महसूल विभागानं दिली आहे. अप्रत्यक्ष करापोटी आठ लाख त्रेसष्ट हजार कोटी रूपये जमा झाले असून, त्यात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २२ टक्के वाढ झाल्याचंही या विभागानं सांगितलं आहे.

****

आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली येत्या अकरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत, ‘मुख्यमंत्री ते पंतप्रधान’ या शीर्षकाखाली शेतकरी आसूड यात्रा काढण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. येत्या अकरा तारखेला नागपूर इथून सुरू होऊन ही यात्रा औरंगाबादमार्गे गुजरातच्या वडनगर इथं एकवीस तारखेला  पोहचेल. राज्यातल्या अपंगांना मोफत घरकूल आणि दरमहा दोन हजार रूपये मानधन देण्यात यावं, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतीची सर्व कामं रोजगार हमी योजनेअंतर्गत आणावीत, यासह इतर मागण्यांसाठी ही आसूड यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रहार संघटनेकडून देण्यात आली आहे.

****

नाशिक  जिल्हा परिषद विषय समित्यांच्या निवडणुकीत मोठे राजकीय फेर बदल झाले असून सत्तारूढ काँग्रेस मध्ये फूट पडली आहे. या पक्षाचे तीन सदस्य भाजपा राष्ट्रवादी आघाडीला मिळाल्यानं आता विरोधकांकडे बहुमत झालं आहे. आज दुपारी  विषय समित्यांची निवडणूक होत असून त्यामध्ये शिवसेना- काँग्रेसला नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात २१ तारखेला झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र आले आणि माकपच्या दोन सदस्यांच्या मदतीनं अध्यक्षपद शिवसेनेला तर उपाध्यक्षपद काँग्रेसला मिळालं होतं.

//********//

No comments: