Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 April 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ एप्रिल २०१७ दुपारी १.००वा.
*****
मतदानानंतर मतदारांना पडताळणी पावती देणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्रांच्या खरेदीला
केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगानं मंत्रिमंडळाकडे अशा यंत्रांच्या
खरेदीचा प्रस्ताव दिला होता. सध्या वापरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात मतदारांना
मत पडताळणीची अशी व्यवस्था नसल्यानं, इलेक्टॉनिक मतदान यंत्रात फेरफार केला जात असल्याचा
आरोप काही राजकीय पक्षांकडून केला जातो आहे.
****
परभणी,
लातूर आणि चंद्रपूरच्या महानगरपालिका निवडणुकीसाठीचं मतदान आज सकाळी साडेसात वाजल्यापासून
सुरू झालं. सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत परभणीमध्ये सरासरी
पंचवीस पूर्णांक ऐंशी टक्के तर लातूरमध्येही
सरासरी पंचवीस
ते तीस टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
विवादित बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी १४ भारतीय जनता
पक्षाच्या नेत्यांवर अपराधिक षडयंत्र रचल्याचा आरोप ठेवावा, ही मागणी करणारी केंद्रीय
अन्वेषण विभागाची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज मंजूर केली. या निर्णयामुळे लालकृष्ण
आडवाणी, उमा भारती आणि अन्य १२ भाजप नेत्यांवर आता षडयंत्र रचल्याच्या आरोपावरून खटला
चालेल. यासंदर्भातले दोन्ही खटले लखनौमध्ये एकत्रितपणे चालवावेत आणि दोन वर्षांमध्ये
सुनावणी पूर्ण करावी, असेही आदेश न्यायालयानं दिले आहेत. मात्र, कल्याण सिंह सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत, ते राज्यपाल पदावर असेपर्यंत
त्यांच्याविरोधात यासंदर्भातला खटला, सुरू
करू नये, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
****
श्रीराम मंदिर निर्माण मुस्लिम कारसेवक मंच या संघटनेनं
उद्या, लखनौपासून अयोध्येपर्यंत कारसेवक यात्रेचं आयोजन केलं आहे. या यात्रेतून शेकडो
मुस्लिम कारसेवक, राममंदिर निर्माणाचं साहित्य घेऊन अयोध्येला जाणार आहेत आणि हे साहित्य
अयोध्येमध्ये मंदिर निर्माण समितीकउे सोपवणार आहेत, अशी माहिती, या संस्थेचे अध्यक्ष
राष्ट्रवादी आजम खान यांनी दिली आहे.
****
मद्य व्यावसायिक विजय माल्याला भारतात आणण्याचे सर्व
ते प्रयत्न सरकार करत आहे, असं केंद्रीय मंत्री एम वेंकय्या नायडू यांनी आज म्हटलं.
मल्ल्यावर भारतात अनेक प्रकरणं दाखल असल्याचं त्याचं प्रत्यार्पण करण्यात यावं, यासाठी
सरकार ब्रिटीश सरकारशी बोलणी करत असून, ब्रिटीश सरकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल,
असंही नायडू यांनी म्हटलं आहे.
****
अमेरिकेच्या H-1B प्रकारच्या व्हिसाचे नियम अधिक कडक
करणाऱ्या कार्यादेशावर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी स्वाक्षरी केली. तंत्रज्ञान
कंपन्यांनी परदेशातून तुलनेनं कमी वेतनावर अतिकुशल कर्मचारी आणल्यानं अमेरिकन नागरिकांच्या
या क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कमी होतात, या वस्तुस्थितीमुळे ट्रंप यांनी हा आदेश
जारी केला आहे. या निर्णयामुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि व्यावसायिकांवर
परिणाम होण्याची शक्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियानंही आपल्या व्हिसा धोरणामध्ये
बदल केला असून, त्याचाही परिणाम भारतीयांवर होईल, अशी शक्यता आहे.
****
ऑल इंडिया अण्णा द्रमुक या तमीळनाडूच्या सत्तारूढ
पक्षानं, वी.के. शशिकला यांना पक्षापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काल चेन्नईमध्ये
झालेल्या दोन बैठकीनंतर पक्षाच्या एका गटानं टी टी व्ही दिनाकरन आणि त्यांच्या गटाला,
पक्षाच्या तसंच सरकारच्या कामकाजातून दूर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर पक्षाच्या दोन गटांचा विलय शक्य असल्याचं, माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दिनाकरन यांनी आज चेन्नईत पक्षाच्या आमदारांची बैठक
बोलावली आहे. दुसरीकडे दिनाकरन यांनी पक्षाचं दोन पाने हे निवडणूक चिन्ह आपल्या गटाला
मिळावं, यासाठी दिल्लीत निवडणूक आयोगाला लाच देऊ केल्या प्रकरणी त्यांच्यावर दिल्ली
पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे, दिनाकरन हे अनिवासी भारतीय असल्यानं, त्यांच्या परदेशी
पळून जाण्याची शक्यता गृहीत धरून दिल्ली पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे.
****
शालान्त परीक्षेनंतरची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळण्यास
फार विलंब लागत असल्याचं निदर्शनाला आल्यामुळे, या संदर्भात एक संनियंत्रण समिती स्थापन
करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे.
काल मंत्रालयात या शिष्यवृत्तीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी असल्याचं सांगत, संनियंत्रण
समिती वाटपाच्या प्रक्रियेत सोपेपणा आणेल, असं बडोले यांनी नमूद केलं.
//********//
No comments:
Post a Comment