Monday, 3 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 03.04.2017 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 April 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ एप्रिल २०१ दुपारी .००वा.

*****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या नागरिकांना राज्याचा वारसा असलेल्या सुफी संस्कृतीला जपण्याचं आवाहन केलं आहे. उधमपूर इथं सभेला संबोधित करताना ते बोलत होते. काश्मीर भारताचा अभिमान असून, नागरिकांना इथली सभ्यता आणि संस्कृतीशी जोडलं पाहिजे, असं ते म्हणाले. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.

तत्पूर्वी पंतप्रधानांनी श्रीनगर - जम्मू राष्ट्रीय महामार्गावरच्या चेनानी नाशरी या देशातल्या सगळ्यात मोठ्या बोगद्याचं लोकार्पण केलं.  

****

भारतीय जनता पक्ष कोणत्याही धार्मिक गटाचं समर्थन करत नसल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. पाच राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेलं यश हे उत्तम प्रशासनामुळे असल्याचं ते म्हणाले. केंद्रात भाजप सरकारच्या तीन वर्षाच्या काळात एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नसल्याचं त्यांनी नमूद केलं.     

****

श्रीनगर विमानतळावर लष्कराच्या एका जवानाला सामानात दोन ग्रेनेड आढळून आल्यामुळे अटक करण्यात आली आहे. भोपाल मुखिया असं त्याचं नाव असून, तो उरी इथं नियंत्रण रेषेजवळ तैनात असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. याप्रकरणी जवानाची चौकशी सुरु आहे.  

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये पूँछ जिल्ह्यातल्या दिगवार भागात आज सकाळी पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. सीमेपलिकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भारतीय जवानांनीही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं.

****

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन आराखडा - एन आय आर एफ अंतर्गत शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता क्रमवारी यादी जाहीर करणार आहेत. देशातल्या सगळ्या उच्च शिक्षण संस्थांची अध्ययन, अध्यापन आणि संसाधनांच्या निकषांवर गुणवत्ता क्रमवारी तयार करण्यात येते. या योजनेत यावर्षी ८०० पेक्षा जास्त नवीन संस्थांनी सहभाग घेतला आहे.

****

निवडणूक आयोग आधुनिक तंत्रज्ञान युक्त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र खरेदी करणार आहे. या यंत्रात काही फेरफार करण्याचा प्रयत्न केला, तर ते लगेच बंद पडेल. केंद्रीय कायदा राज्यमंत्री पी पी चौधरी यांनी ही माहिती दिली. हे यंत्र अधिक पारदर्शकरित्या काम करेल, असं ते म्हणाले. हे यंत्र खरेदी करण्यासाठी एक हजार ९४० कोटी रुपयांची आवश्यकता असून, २०१८ मध्ये याचा उपयोग करता येईल, असं त्यांनी सांगितलं. 

****

युवाशक्ती देशाचा सर्वोत्तम विकास करु शकते, त्यामुळे देशाला महासत्ता बनवण्यासाठी उद्दात्त हेतूनं प्रेरित होऊन खऱ्या अर्थानं परिवर्तन दूत बना, असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना दिला आहे. पुणे इथं महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या ग्रामीण विकास फेलोशिपचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. विविध योजनांचं एकत्रीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही, त्यामुळे वेगवेगळ्या जलसंधारणाच्या १४ योजनांना एकत्र आणून जलयुक्त शिवार अभियान सुरु केलं. परिणामी या अभियानाच्या माध्यमातून मोठे यश मिळत असल्याचं ते म्हणाले.

****

दरम्यान, वाशिम जिल्ह्यातलं बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवीचा विकास करण्यासाठी ७३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं. पोहरादेवी इथं सुरू असलेल्या विश्व शांती लक्षचंडी यज्ञाच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. या आराखड्यात बंजारा समाजाची  संस्कृती, सण, उत्सव, पेहराव आणि भाषा यांचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असं ते म्हणाले.

****

धुळे इथं हजार आणि पाचशेच्या चलनातून बाद झालेल्या ५० लाख रुपयांच्या नोटांसह एक कार पोलिसांनी जप्त केली असून, तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यात शहादा इथल्या भाजपाच्या दोघा नगरसेविकांच्या पतींसह एका वाळू तस्कराचा समावेश आहे. आयकर विभागाकडून पुढील कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस उपअधीक्षक हिंमत जाधव यांनी सांगितलं.

****

उस्मानाबाद इथल्या सोलापूर रोडवरच्या एस टी बस डेपोला आज सकाळच्या सुमारास आग लागली. डेपोत असलेल्या जुन्या टायरला आग लागून ती सगळीकडे पसरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत कोणतीही जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही.  लातुर

//********//

No comments: