आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
३ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
पाच
कोटी रुपयांपेक्षा अधिक कर चोरी हा आता दखलपात्र अजामीनपात्र गुन्हा म्हणून नोंदवण्यात
येणार आहे. अशा गुन्ह्यासाठी पोलिस करचोरांना वॉरंट शिवायही अटक करू शकतील. येत्या
जुलै महिन्यापासून लागू होणाऱ्या वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत केंद्रीय वस्तू सेवा
कर कायद्यात ही तरतूद करण्यात आली आहे.
****
परभणी
तसंच लातूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे.
दुपारी दोनवाजेपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. परभणी महापालिकेसाठी
आतापर्यंत १६२ तर लातूर महापालिकेसाठी आतापर्यंत २०७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
प्राप्त अर्जांची परवा पाच तारखेला छाननी होणार असून, येत्या शुक्रवारी सात तारखेपर्यंत
अर्ज मागे घेता येणार आहेत. येत्या १९ तारखेला या दोन्ही महापालिकांसाठी निवडणूक होणार
आहे.
****
बौद्ध
साहित्यातून जगण्याची प्रेरणा मिळत असल्याचं, ज्येष्ठ विचारवंत डॉ.जनार्धन वाघमारे
यांनी म्हटलं आहे. काल बीड जिल्ह्यात परळी इथं आयोजित चौथ्या बौद्ध साहित्य संमेलनात
ते बोलत होते. नागपूर इथले साहित्यीक प्रा.डॉ.प्रदिप आगलावे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी
होते. या संमेलनात फुले-शाहु-आंबेडकरांचे देशासाठी योगदान या विषयावर परिसंवाद तसंच
परिवर्तनवादी कवींचं काव्यवाचन सादर झालं.
****
भारताची
टेनिसपटू सानिया मिर्झा आणि झेक प्रजासत्ताकाची बारबोरा स्ट्राइकोव्हा यांची जोडी मियामी
टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत उपविजेती ठरली आहे. कॅनडाची गॅब्रियला डाब्रोवस्की आणि
चीनची झू यिफान या बिगर मानांकित जोडीनं सायना बारबोरा जोडीचा ६-४, ६-३ असा पराभव केला.
पुरुष एकेरीत रॉजर फेडररनं राफेल नदालचा ६-३, ६-४ असा पराभव करत विजेतेपद पटकावलं.
//******//
No comments:
Post a Comment