Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 19 April 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ एप्रिल २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
देशातल्या सर्व उच्चपदस्थ व्यक्तींच्या
वाहनांवरचे लाल दिवे काढून टाकण्याचा निर्णय, केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. या
निर्णयाची येत्या एक मे पासून अंमलबजावणी होईल. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीनंतर,
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. आपल्या वाहनावरचा दिवा काढून
टाकणारे गडकरी हे पहिले केंद्रीय मंत्री ठरले आहेत. अग्नीशमन दल आणि रुग्णवाहिका अशा
आणीबाणीच्या सेवा देणाऱ्या वाहनांवर मात्र निळा दिवा लावता येईल, असं गडकरी यांनी स्पष्ट
केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या निर्णयाचं स्वागत करत, आपण तत्काळ लाल दिवा वापरणं बंद करत असल्याचं, ट्वीटरवरून सांगितलं आहे.
****
पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठ्या
प्रकल्पांचं काम करणाऱ्या सरकारी संस्था आता थेट परदेशी मदत घेऊ शकतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या
आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे, मुंबई महानगर क्षेत्र विकास
प्राधिकरण - एमएमआरडीएला, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्टसाठी जपानच्या
संस्थेकडून थेट कर्ज घेण्याचा अधिकार मिळाला आहे. सुमारे अठरा हजार कोटी रुपयांच्या
या प्रकल्पाला जिका ही जपानी कंपनी पंधरा हजार कोटींचं कर्ज देणार आहे.
****
विवादित बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी, भारतीय
जनता पक्षाच्या नेत्यांवर अपराधिक षडयंत्र रचल्याचा आरोप ठेवावा, ही मागणी करणारी केंद्रीय
अन्वेषण विभागाची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज मंजूर केली आहे. त्यामुळे
कल्याणसिंह यांनी राजस्थानच्या राज्यपाल पदाचा तसंच उमा भारती यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा
राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. या नेत्यांनी राजीनामे न दिल्यास,
पंतप्रधानांनी त्यांना पदावरून दूर करावं, असं काँग्रेस प्रवक्ते राशीद अल्वी यांनी
म्हटलं आहे.
****
जलयुक्त शिवार योजनेसह शेततळ्यांची
कामं येत्या दोन महिन्यांत मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृष्य संवाद
प्रणालीच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळं, आदी योजनांचा सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून
आढावा घेतला, त्यावेळी जलयुक्त आणि शेततळे योजनेअंतर्गत कामं मंजूर करण्याची प्रक्रिया
तातडीनं पूर्ण करण्यास सांगितलं. पुढील दोन महिन्यांच्या काळात शेती तसंच शेतीपूरक
कामांना प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली. प्रधानमंत्री आवास योजनेचाही मुख्यमंत्र्यांनी
आढावा घेऊन आवश्यक सूचना केल्या.
****
राज्य शासनाचे चित्रपट क्षेत्रासाठीचे
जीवनगौरव तसंच विशेष योगदान पुरस्कार आज मुंबईत जाहीर झाले. ‘राजकपूर जीवनगौरव पुरस्कार’
ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना, तर ‘राजकपूर विशेष योगदान पुरस्कार’ प्रसिध्द
अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे. ‘चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार’
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना, तर ‘चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार’
प्रसिध्द अभिनेते अरुण नलावडे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद
तावडे यांनी आज मुंबईत ही घोषणा केली. पाच लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं जीवनगौरव
पुरस्काराचं स्वरूप असून, विशेष योगदान पुरस्काराचं स्वरुप तीन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह
असं आहे.
****
परभणी महानगरपालिकेच्या आज होत
असलेल्या निवडणुकीत बोगस मतदानावरून उमेदवारांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. यात एक
जण जखमी झाला, एका प्रभागात गोंधळ घालणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात
घेतलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
लातूर इथं मात्र शांततेत मतदान
सुरू आहे. लातूर इथं दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरासरी एकोणचाळीस टक्के तर परभणीत सुमारे
त्रेचाळीस टक्के मतदान झालं.
****
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग
प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ४२ शेतकऱ्यांच्या नावे कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या
आहेत. सर्वेक्षण आणि मोजणीत अडथळा आणण्याबद्दल, विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी या
नोटीसा बजावल्या आहेत. शेतकऱ्यांना वकिलामार्फत
आपलं म्हणणं मांडण्यासाठी दंडाधिकारी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.
****
गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी
पुरून ठेवलेला स्फोटकांचा साठा पोलिस दलानं हस्तगत केला. यामध्ये तीन किलो स्फोटकं,
२ डिटोनेटर, १ बॅटरी आदी साहित्य आहे. पोलिस कोठडीत असलेल्या एका नक्षलवाद्यानं चौकशी
दरम्यान दिलेल्या माहितीवरून, श्वानपथकाच्या सहाय्यानं ही स्फोटकं शोधून काढण्यात आली.
****
No comments:
Post a Comment