Wednesday, 5 April 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 05.04.2017 6.50am


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 April  2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ एप्रिल २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      शेती क्षेत्रात भरीव गुंतवणूक करून शेतकऱ्यांचं उत्पन्न येत्या चार वर्षात दुप्पट करण्याचा मुख्यमंत्र्यांचा पुनरूच्चार

·      उत्तर प्रदेश सरकारचा शेतकऱ्यांचं एक लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय; राज्यातल्या शेतकऱ्यांचही कर्ज माफ करण्याची शिवसेनेची मागणी

·      शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा संघर्ष यात्रेच्या समारोप प्रसंगी विरोधी पक्षांचा निर्धार

आणि

·      आदर्श गृहनिर्माण संस्था घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरील कारवाई संदर्भात बदलेल्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून विचारणा

****

शेती क्षेत्रात भरीव गुंतवणूक करून शेतकऱ्यांचं उत्पन्न पुढच्या चार वर्षात दुप्पट करू, या भूमिकेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनरुच्चार केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मूल इथं माजी मुख्यमंत्री मारोतराव उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांच्या पुतळ्याचं तसंच स्मारकाचं अनावरण आणि श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं, यावेळी आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

गेल्या दोन वर्षात केलेल्या कामामुळे राज्याच्या कृषी विकास दरात झालेल्या वाढीकडे लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीऐवजी सिंचन, वीज तसंच वीज पंपांची उपलब्धता, मागेल त्याला विहीर, शेतमालाला बाजारपेठ, हमी भाव आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान पुरवण्यावर शासनाचा भर असल्याचं सांगितलं.

कर्जमाफी दिल्यावर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची भीती असल्याचं सांगत, उत्पन्नाची साधनं दिल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो, चांगल्या सुविधा दिल्याशिवाय शेती फायद्यात येणार नाही, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

****

उत्तर प्रदेश सरकारनं राज्यातल्या अडीच कोटी शेतकऱ्यांचं एक लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय काल घेतला. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उत्तरप्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं, या आश्वासनाची पूर्ती सरकारनं पहिल्याचं मंत्रीमंडळ बैठकीत केली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे केली आहे. उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकते तर महाराष्ट्रानंही याबाबत मागे राहू नये असं ठाकरे म्हणाले.

राज्यात नापिकी, अवकाळी पाऊस, गारपीट या नैसर्गिक आपत्तींबरोबरच कर्जबाजारीपणा यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, ही शिवसेनेची मागणी असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

****

दिलेला शब्द पाळायचा नाही, ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती असल्यामुळे शेतकरी कर्जमाफी किंवा धनगर आरक्षण हे दोन्ही प्रश्न सोडवले जात नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. शेतकरी संघर्ष यात्रेचा काल पनवेल इथं समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, असं आवाहनही पवार यांनी यावेळी केलं. काँग्रेस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी यावेळी केलेल्या भाषणात नऊ हजार शेतकरी आत्महत्या प्रकरणी विद्यमान मुख्यमंत्र्यांवर गुन्हे कधी दाखल होणार असा सवाल केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी कर्जमाफी जाहीर होईपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, रिपब्लीकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर नेते यावेळी उपस्थित होते.

****

पंतप्रधानांच्या मन की बात या आकाशवाणी कार्यक्रमाच्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरचित्रवाणीद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’  असं या कार्यक्रमाचं नाव असून, या श्रृंखलेच्या पहिल्या भागाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं, येत्या रविवारी हा कार्यक्रम सह्याद्री वाहिनीसह मराठी वृत्त वाहिन्यांवरून प्रसारित होण्याची शक्यता आहे. या पहिल्याच कार्यक्रमासाठी व्हॉट्सॲपवर १८ हजार आणि ई मेलवर एक हजार २५० प्रश्न प्राप्त झाल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाची निर्मिती केली गेल्याचं सांगण्यात आलं आहे.

****

शिक्षण क्षेत्राची संस्थात्मक वाढ झाली मात्र गुणात्मक वाढ झाली नाही, अशी खंत खासदार शरद पवार यांनी वर्तवली आहे. काल पुण्यात भारती विद्यापीठानं पवार यांना डी लीट पदवी प्रदान केली, त्यावेळी ते बोलत होते. खासगी शिक्षण क्षेत्रावर आवश्यकता भासल्यास नियंत्रण आणावं, मात्र त्यांच्या श्वास कोंडला जाऊ नये, असं त्यांनी नमूद केलं. ‘मेक इन इंडिया’प्रमाणे ‘थिंकींग इंडिया’ ही काळाची गरज असल्याचं पवार म्हणाले.

****

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी आमोणकर यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. आमोणकर यांचं सोमवारी रात्री राहत्या घरी निधन झालं, त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह समाजाच्या सर्वच स्तरातून शोक व्यक्त झाला.

****

मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी रामपत्री या वनस्पतीपासून कर्करोगावर औषध तयार केलं आहे. या औषधामुळे कर्करोगाच्या गाठी नष्ट होऊन पेशी पुनरुज्जीवीत होण्यास मदत होते. ही वनस्पती देशाच्या पश्चिम सागरी किनारपट्टीच्या प्रदेशात आढळते. या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात हे औषध कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त असल्याचं निष्पन्न झालं आहे.  

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

मुंबईतल्या वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण संस्था घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई संदर्भात राज्यपालांनी भूमिका का बदलली, असं मुंबई उच्च न्यायालयानं विचारलं आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयनं डिसेंबर २०१३ मध्ये तत्कालीन राज्यपाल के शंकरनारायणन यांच्याकडे चव्हाण यांच्यावर कारवाईची परवानगी मागितली होती, मात्र त्यावेळी परवानगी नाकारण्यात आली. मात्र फेब्रुवारी २०१६ मध्ये विद्यमान राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी सीबीआयला कारवाईची परवानगी दिली. या दरम्यानच्या काळात परिस्थितीत काय फरक पडला, असं न्यायालयानं विचारलं आहे.

****

रामनवमीचा उत्सव काल सर्वत्र मोठ्या भक्तीभावानं साजरा झाला. औरंगाबाद शहरात कुंभारवाडा, समर्थनगर, अयोध्यानगरी तसंच जसवंतपुरा भागातल्या राममंदिरात दुपारी बारा वाजता रामजन्माचा सोहळा पार पडला. मराठवाड्यात बीड तसंच परभणी सह सर्वत्र रामनवमी साजरी झाली. यानिमित्तानं राम कथा वाचन, रथयात्रेसह विविध धार्मिक कार्यक्रम तसंच रक्तदान शिबीरासह विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. लातूर जिल्ह्यात रामेश्वर रुई इथं सोनावळा नदीवर उभारण्यात आलेल्या रामरहीम मानवता सेतूचं काल परम संगणकाचे जनक डॉ विजय भटकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.

****

जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात अवैध वाळू उपसाप्रकरणी एका मंडळ अधिकाऱ्यासह दोन तलाठ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. हसनाबादचे मंडळ अधिकारी व्ही बी जायभाये, हसनाबाद सजाचे तलाठी पी डी देशमुख, सिरसगाव वाघ्रूळ सजाचे तलाठी बी एम काकड यांचा यात समावेश आहे.

****

औरंगाबाद इथं एका खंडणीखोराला काल पोलिसांनी अटक केली. पंकज संकपाळे असं याचं नाव असून, तो भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचा कार्यकर्ता असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. संकपाळे यानं एका वकिलाकडून पाच लाख रुपये खंडणी मागितली होती, यापैकी २० हजार रुपये घेताना, त्याला अटक करण्यात आली.

****

लातूर तसंच परभणी महापालिका निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार असून वैध अर्जांची यादी जाहीर होणार आहे. उमेदवारांना परवा सात तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, आठ तारखेला अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे.

****

बुलडाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातल्या हिवरा आश्रम इथले शुकदास महाराज यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी समाधी संस्कार करण्यात आले. शुकदास महाराजांचं काल पहाटे औरंगाबाद इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. आरोग्य, शिक्षण, कृषी आणि अध्यात्मिक आदी क्षेत्रात त्यांनी मोलाचं योगदान दिलं.

****

जळगाव इथले ज्येष्ठ उद्योजक कांतिलाल जैन यांचं काल मुंबईत निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मुंबईत खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जैन उद्योग समुहाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या वाटचालीत कांतिलाल जैन यांचा मोठा सहभाग होता.

///****///

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...